लेखांक १६८ : हाथिया-केरपाणी च्या आनंद शक्तीपीठाची शारदा अंबा व गोशास्त्रज्ञ गव्यसिद्ध निरंजन बाबा

मैयाच्या कृपेने मोठाच प्रसंग टळला . घेरा नदीवर जणू काही यमराजाचा फेरा चुकवला गेला .नुकतेच नर्मदा मातेने दिलेले नौकांचे /नावांचे ज्ञान थोडेफार कामाला आले . पुढे चालताना रामपूरा नावाचा घाट लागला . या ठिकाणी ५० एक म्हशी निवांत पोहत होत्या !मुगाच्या शेंगा काढून झालेल्या होत्या . त्यामुळे उरलेले झाडाचे खुंट खाण्यासाठी गुरांना थेट शेतामध्ये सोडले होते . हिरवागार पाला खायला मिळत असल्यामुळे गुरे देखील खुश होती . मी त्या म्हशींच्या लीला पाहत काही काळ उभा होतो .मागे कधीतरी सांगितले आहे त्याप्रमाणे म्हशी घाबरल्या की मान ताठ वर करतात ! आणि डोळे मोठे करतात . ते पाहायला फार मजा येते ! त्यानंतर तुम्ही एक पाऊल जरी पुढे टाकले तरी द्या एकदम घाबरून उधळतात . 

घाबरलेली म्हैस जेव्हा असे डोळे मोठे करून पाण्यातून माझ्याकडे बघायची तेव्हा मला तिचा तो अवतार पाहून खूप हसू यायचे !
आई घाबरली की बिचारी रेडके पण घाबरायची ! आणि मग मायलेकरे अशी मान वर करून कान बाजूला घेऊन स्तब्ध उभे राहायचे ! असो .

एका माणसाने मला प्यायला पाणी आणून दिले ! तुम्हाला त्यावेळी पाण्याची गरज आहे का नाही हा वेगळा मुद्दा आहे .परंतु आपल्या हातातले काम बाजूला सोडून जिथे उपलब्ध होईल तिथून स्वच्छ पेय जल घेऊन परिक्रमा वासीला द्यावे अशी इच्छा होणे हीच किती मोठी गोष्ट आहे ! विचार करून पहा ! 

रामपुरा घाटाचा हा उपग्रह नकाशा आहे . इथून पुढे मैय्या अचानक किती छोट्या खडकाळ भागातून वाहू लागते हे आपल्या लक्षात येईल .
इथे जागेश्वर महादेवांचे एक प्राचीन शिवालय आहे .
मंदिराची अवस्था अत्यंत वाईट होती . मंदिर पूर्णपणे मोडकळीला आलेले होते .
आपल्याकडे स्वतःसाठी एक नव्हे चार चार इमले बांधणारे इसम गावोगावी सापडतात . परंतु मंदिराला कधी एक वीट सुद्धा कोणी लावत नाही ! हीच आपल्या धर्माची शोकांतिका आहे ! आहे तितुके जतन करावे यातच आम्ही कमी पडतो आहोत . मग पुढे आणखी मेळवावे हे कधी घडायचे ! त्यामुळे आपल्या हातून सद्य परिस्थितीमध्ये जिकडे तिकडे महाराष्ट्र राज्य होणे अवघडच आहे . 
(संदर्भ : आहे तितुके जतन करावे । पुढे आणखी मेळवावे । महाराष्ट्र राज्य करावे । जिकडे तिकडे ॥ समर्थ रामदास )
रामपुरा घाटावर काठाशी असा एक प्राचीन वटवृक्ष होता . अशी मोठी झाडे लक्षात राहतात .किंबहुना ज्यांना झाडे लावायची आवड आहे त्यांना झाडे दिसतात . बाकीच्यांना ती दिसतीलच असे नसते . तुमच्यासमोर एखादे झाड आले तर तुम्हाला काय दिसते याच्यावरून तुमच्या आवडीनिवडी कळतात . एकच झाड असते .परंतु कोणाला त्याची सावली आधी दिसते . कोणाला त्याची फळे आधी दिसतात . कोणाला त्याची फुले आधी दिसतात . कोणाला पाने आकर्षित करतात . कोणाला त्याचे लाकूड आधी दिसते ! तर कोणाला मुळे दिसतात ! कोणी त्यावरील पक्षी पाहते . तर कोणी कीटक . आदरणीय रघुनाथ ढोले गुरुजीं सारखा एखादाच मनुष्य साकल्याने त्या झाडाचा अभ्यास करतो .
या भागात देखील शेतातली कुंपणे मैय्यापर्यंत होती . परंतु पाणी उथळ असल्यामुळे फारशी अडचण येत नसे . सध्या पिके सुद्धा निघाली होती . हा डोंगा पहा ! मी बुडताना वाचलो तो डोंगा एवढाच होता .

चालता चालता मैयाचा किनारा एकदम बदलून गेला . अचानक संगमरवरी दगड सुरू झाले . त्यानंतर लगेचच गुलाबी रंगाचे दगड दिसू लागले . त्यानंतर लगेच राखाडी खडक सर्वत्र दिसायला लागले . मला खूप आश्चर्य वाटले ! इतक्या कमी अंतरामध्ये खडकांमध्ये इतकी विविधता पहिल्यांदाच पाहिली .एक दीड किलोमीटर अंतर चाललो असेन आणि मग तर मग याचे वेगळेच रूप दिसू लागले !कारण इथे खूप रांजणखळगे होते .

या भागातले रांजण खळगे (हे व अन्य काही छायाचित्र सौजन्य : परिक्रमावासी श्री महेश माधव कुलकर्णी )

अर्थातच शिवलिंगे देखील खूप सापडत होती . मी भरपूर शिवलिंगे गोळा केली . पूर्वी मी शिवलिंग दिसले आणि आवडले तरी ते सोबत घेत नसे  कारण अजून उभी परिक्रमा चालायची आहे हे डोक्यात असायचे . परंतु आता मात्र शेवटचे काही दिवस चालणे नशिबात होते . त्यामुळे झाले वजन तर होऊ दे असा विचार करून मी मोठी शिवलिंगे सुद्धा घेतली . माझ्या पाठीवरच्या झोळीचे वजन अचानक काहीच्या बाही वाढून गेले ! एक सुंदर वळण आले . पायाखाली जिकडे बघावे तिकडे दगडच दगड ! नर्मदा खंडातील दगडांना दगड म्हणू नये असा संकेत आहे . क्योंकी वे कंकर नाही शंकर है ! 

हाच तो परिसर जिथे नर्मदा माई अचानक कमी अंतरातून वाहू लागते आणि सर्वत्र खडक खडक दिसू लागतात .
मी अगदी काठा ने चालत असल्यामुळे इथून चालणे किती कठीण झाले असेल हे तुम्हाला चित्रातले दगड पाहिल्यावर लक्षात येईल !
इथे बाजूला मातीचा किनारा होता परंतु मला दंड रेवाजलात बुडवत चालायचे असल्यामुळे मी संपूर्ण खडकातूनच चाललो ! इथे मला खूप भारी भारी शिवलिंगे  प्राप्त झाली .
इथे दूरवर एक धर्मशाळा मला दिसत होती .श्री लोधेश्वर धर्मशाळा असे तिचे नाव होते .

परंतु ती काठापासून फार लांब आहे असे मला वाटत होते . त्यामुळे मी तिकडे गेलो नाही . प्रत्यक्षामध्ये ती फार लांब नव्हती .परंतु मीच खूप दूरवर प्रवाहा जवळून चालत होतो . आणि मध्ये प्रचंड खडक होते .

हा संपूर्ण परिसर किती खडकाळ आहे हे आपल्याला लक्षात येईल . यातूनच नर्मदा माई खूप वेगाने वाहते .
अशा तप्त खडकांवरून उड्या मारत चालावे लागले .वाहून आलेली कोळ्याची जाळी कशी असतात ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल .वरून खाली चित्र बघत या . तीस टक्के अंतरावर जो खडक आहे त्यावर कोळ्याचे वाहून आलेले जाळे पडलेले आहे .पिवळसर रंगाची दिसते आहे .अशा जाळ्यात पाय अडकला की तुम्ही गेलात .

उन्हाचा तडाखा प्रचंड होता . अंग भाजून निघाले होते . कधी एकदा कुठेतरी सावली मिळते असे मला झाले होते . कारण खडकातून चालताना प्रचंड प्रस्तरावर्तित उष्मा किंवा रॉक रेडिएशन चा सामना करावा लागतो .उन्हामुळे दगड तापतात आणि प्रचंड प्रमाणात उष्णता बाहेर सोडतात . सूर्य जर एक उष्मा सोडत असेल तर हे दगड त्याच्यापेक्षा अधिक उष्णता सोडतात . कारण दगडामध्ये साठलेली उष्णता देखील बाहेर पडत असते . तसा दगड उष्णता रोधक असल्यामुळे खालच्या बाजूने तो गार असतो . परंतु पृष्ठभाग मात्र चांगलाच तापतो . त्यामुळे त्यावरून चालणाऱ्या माणसाला कधी एकदा या भट्टीतून बाहेर पडतो असे होते . वाळूमध्ये देखील असेच होते . फक्त आणि फक्त चिखलातून चालताना ,लागवडीखालील शेतातून जाताना किंवा  ओलसर मातीतून जाताना उन्हाचा त्रास होत नाही . समोरच्या बाजूला हाथिया घाट होता . तिथे खूप गर्दी होती . लोक स्नान करत होते . कोणी फोटोसेशन करत होते . परंतु उत्तर तटावर मात्र कोणीच नव्हते .कारण मुळात माणसे येऊ शकतील अशी जागाच येथे नव्हती . माझ्या हट्टामुळे मी काठावरून चाललो होतो . पाठीवरच्या झोळीचा भार असह्य म्हणता येईल अशा पातळीला पोहोचला होता . सुमारे २५ किलो वजनाची शिवलिंगे आता माझ्या पाठीवर होती .प्रचंड तापलो होतो . इतक्यात वाळवंटामध्ये पाण्याचा एखादा झाला दिसावा तसे दूरवर मला चार मोठे मोठे वृक्ष दिसले . त्यातला पहिला खूपच मोठा होता . त्याच्या सावलीमध्ये क्षणभर बसावं असा मी विचार केला . पायांची गती आपोआप वाढली . बघता बघता मी धावू लागलो ! लहान मुलासारखा ! आता ती सावली समोरच होती ! धावतच जायचे आणि झाडाखाली लोळायचे असा माझा विचार होता इतक्यात मला काही कळायच्या आत सगळे दृश्य माझ्या भोवती गोल गोल फिरले ! आणि मी राप् करून खाली आपटलो ! सर्वत्र तापलेले खडक होते ! गुळगुळीत होते परंतु प्रचंड गरम तव्यासारखे तापलेले होते ! माझे अंग भाजून निघाले . मी उठायचा प्रयत्न केला परंतु पाठीवरील २५ किलो वजनाचे ओझे मला हलू देईना . घेरा नदीमध्ये अर्धा संपलो होतो .तिथे किती शक्ती खर्च झाली हे आत्ता कळले ! मला काही केल्या त्यात तापलेल्या दगडांवरून उठताच येईना ! तव्यावर टाकल्यावर डोसा कसा भाजला जातो तशी माझी बाह्य त्वचा त्या तप्त खडकांवर भाजली जाऊ लागली ! अक्षरश: लाल भडक झाली ! ज्या सावली करता मी इतक्या गडबडीने निघालो होतो ती माझ्यापासून केवळ चार ते पाच फूट लांब होते ! आणि मी उठू देखील शकत नव्हतो ! माझ्या या अवस्थेची माझी मलाच दया आली ! मनोमन नर्मदा मातेला म्हणालो माई चार पाच फूट लांब तरी पाडले असतेस म्हणजे सावली साठी उठावेच लागले नसते ! शेवटी हलताच येत नाही हे कळल्यावर मी शांत पणे त्या तापलेल्या दगडांवर पडून राहिलो . वर्षानुवर्षे त्यातील सर्व अनावश्यक भाग वाहून गेलेला होता . आणि केवळ धातूयुक्त संयुगे मागे शिल्लक होती . ती सर्व चांगलीच तापली होती . त्यांनी त्यांची सर्व उष्णता मला देऊन टाकली ! शेवटी माझ्या अंगाला चिकटलेल्या सर्व दगडांची उष्णता पूर्णपणे माझ्यामध्ये संक्रमित होईपर्यंत मी पडून राहिलो .

हीच ती झाडे ! सुदैवाने आपले वाचक परिक्रमावासी श्री महेश माधव कुलकर्णी यांनी याच झाडांचे परिक्रमेदरम्यान अनेक फोटो काढलेले आहेत ! झाडांच्या सावलीच्या पलीकडे दगड चालू होतात तिथे मी पडलो !
या भागातला संगमरवरी खडक कसा आहे ते तुम्हाला इथे लक्षात येईल .
परिक्रमावासी खरंतर या मार्गाने जातात .परंतु मी काठाने चालत असल्यामुळे झाडांच्या खाली असलेल्या खडकातून चालत होतो .
या झाडांची सावली किती सुखद आहे पहा !
मी समोरून आलो तो काठाचा किनारा इथे दिसतो आहे ! इथे माझ्या डावीकडे वळलेली आहे . 

काठाचा पूर्ण रस्ता इथे दिसतो आहे . मागे लोधेश्वर आश्रम दिसतो आहे . फोटोमध्ये आपल्या वाचक व परिक्रमावासी सौ नेहा महेश कुलकर्णी दिसत आहेत .इथल्या खडकांचे आकार व प्रकार पहा !अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा हा भाग आहे . भेडाघाटच्या खडकाचा हा शेवट आहे असे म्हणाला हरकत नाही .किंवा इथून भेडाघाटकडे जाताना त्या संगमरवराची सुरुवात इथून झाली आहे . असो .

तापलेल्या तव्यावर पडल्या पडल्या माझा आपोआप एक जप सुरू झाला .माझे गुरु नेहमी एक जप सांगायचे . अयं न इदं शरीरं । असा जप करत राहिले ,किंवा चिंतन करत राहिले की ध्याने ध्याने तद्रूपता असे होते . हा अनुभव मी यापूर्वी अनेक वेळा घेतलेला आहे . शारीरिक क्लेश होऊ लागले की हा जप सुरू करायचा . याचा अर्थ मी ( आत्मा ) म्हणजे  हे शरीर नाही ! तर मी त्या शरीरापेक्षा वेगळा आहे ! इदं शरीरं म्हणजे काय ?भगवद्गीतेतला तेरावा अध्याय क्षेत्रक्षेत्रज्ञ योग म्हणून आहे .त्यातील क्षेत्र म्हणजे आपला देह असे भगवान श्रीकृष्ण सांगतात .

इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रम् इति अभिधीयते ।

हे पार्था , तुझे हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे . आणि तू त्याचा क्षेत्रज्ञ आहेस ! याचा अर्थ तू ते शरीर नाहीस ! मग त्या शरीराला होणारे कष्ट ,भोगावे लागणारे भोग याचा मला त्रास  व्हायचा काय संबंध !चार-पाच मिनिटे मी तसाच पडलो होतो . उठताना मला माझा एक पाय ओला झाला आहे असे वाटले म्हणून पाहिले तर माझी नडगी फुटून त्यातनं भळाभळा रक्त वाहत होते .तापलेल्या दगडांवर ते रक्त पडून वाळून सुद्धा गेले होते ! हळूहळू मी माझ्या देहाच्या भानावर आलो . अंग सगळे भाजून निघाले होते ! दोन्ही गुडघे फुटले होते ! ठेच लागली त्या बोटातून रक्त येत होते !आणि ही नडगी पण फुटली होती ! त्यामुळे उठता येईना . मग मी तसाच मगरीसारखा सरपटत सावलीमध्ये गेलो . पाठीवरची झोळी इतकी जड होती की ती उठूच देत नव्हती ! सावलीमध्ये जाऊन दहा मिनिटे पुन्हा पडलो . आकाशाकडे तोंड केले . झोळी पाठीला तशीच होती . मी परिक्रमे मध्ये झोळी फार कमी वेळा उतरवली. आता आसन लावायची जागा निश्चित झाली की मगच मी झोळी उतरवायचो . तोपर्यंत ती पाठीवरच असायची . मध्ये कुठे चहापाणी पिण्यासाठी बालभोग घेण्यासाठी थांबलो तरी झोळी पाठीलाच असायची . कुठे सावलीत बसायची वेळ आली तरी झोळीला टेकूनच बसायचो . कारण तिच्या प्रचंड वजनामुळे ती काढणे आणि पुन्हा चढवणे हे एक मोठे कष्टदायक काम होते . शिवाय ती मला आपण परिक्रमेत आहोत याची जाणीव सतत करून द्यायची . दुसरी गोष्ट म्हणजे जिथे जिथे मी गेलो तिथे मैयाला देखील आपल्या सोबत नेण्याचा भाव त्यात असायचा . सावली हळूहळू सरकू लागली आणि पुन्हा ऊन मला स्पर्श करू लागले . मग मात्र मी मनाचा हिय्या करून उठलो आणि पुढे चालू लागलो . 

देहे दुःख ते सुख मानीत जावे । विवेके सदा सस्वरूपी भरावे ॥

आपल्या देहाला होणारी सर्व दुःखे हे जणू काही सुखेच आहेत असे समजून भोगावीत आणि आपली विवेक शक्ती वापरून नेहमी स्व स्वरूपाचे चिंतन करीत जावे .असे रामदास स्वामी सांगतात . ते तर पुढे जाऊन असेही सांगतात की 

देहे बुद्धीचा निश्चयो ज्या टळेना । तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना ।

अर्थात जो मनुष्य सतत देह बुद्धीवर राहतो त्याला आत्मज्ञान कधीच होऊ शकत नाही .

देह मी वाटे ज्या नरा । तो जाणावा आत्महत्यारा ।

देहाभिमाने येरझारा । भोगील्याच भोगी ॥

मीच देह आहे . आणि मी देहच आहे असे ज्या माणसाला वाटते तो आत्महत्यारा आहे ! अर्थात त्याला आत्मस्वरूप कधी कळूच शकत नाही !

 मग या देहबुद्धीचा काय करायचं ? तेही समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे . 

देहेबुद्धिचा निश्चयो दृढ जाला। देहातीत ते हीत सांडीत गेला॥ देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी। सदा संगती सज्जनाची धरावी॥

एकदा देह बुद्धीचा दृढनिश्चय झाला अर्थात मीच देह आहे असे वाटायला लागले की त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधीही हित साधता येत नाही .भौतिक यश मिळेल देखील परंतु आत्मबळ कधी प्राप्त होत नाही . ते करण्यासाठी तुमची देह बुद्धी म्हणजे मी देह आहे जाणून-बुजून आत्मबुद्धी करावी अर्थात मी आत्मा आहे असे सतत स्वतःला समजून सांगावे ! आणि हे जर जमत नसेल तर त्यासाठी सोपा उपाय म्हणजे सज्जनांची साधू संतांची संगत ठेवावी ! 

हे सर्व बोलणे ठीक आहे . वाचणे पण उत्तम आहे . परंतु अशा कठीण प्रसंगी जगणे फार अवघड असते . तेच तुम्हाला नर्मदा परिक्रमा शिकवते ! ती तुम्हाला सांगते की तू तुझा देह नाहीस ! तू आत्मस्वरूप आहेस ! आणि तुझा आत्मा अजर आहे , अमर आहे !त्याला कुठलाही विकार नाही ! त्याच्यामध्ये कुठलेही चळण नाही !त्याच्यामध्ये कुठलाही दोष नाही ! याच बोधामध्ये मी पुढे चालू लागलो . माझ्या डाव्या हाताला एक टेकडी होती . त्यावरून उतरत डोक्यावरून पदर घेतलेली व डोक्यावर ओझे घेतलेली एक माताराम आडवी गेली आणि तिने एकही शब्द न बोलता फक्त त्या टेकडीच्या दिशेला हात करत तिकडे जा असे मला खुणावले . मी सरळ काठाने पुढे निघालो होतो परंतु या घटनेमुळे एखाद्या यंत्रमानवा सारखा डावीकडे वळलो . थोड्याच अंतरावर उजव्या हाताला एक आश्रम दिसला .परंतु तिने केलेला इशारा वेगळा होता . त्यामुळे मी अजून वर चढू लागलो . खरंतर पायातून रक्त वाहत असताना मला डोंगर चढायची गरज नव्हती . परंतु मी चढलो खरा . एका सुंदर आश्रमामध्ये आलो ! भरपूर झाडे लावलेली होती . एका गाईची समाधी होती . गोठ्यामध्ये जाऊन बसलो . एक अस्ताव्यस्त दाढी असलेला , अंगावर गरजेपुरतेच मांस असलेला ,कमरेला लुंगी गुंडाळलेला साधू सामोरा आला . माझ्या पायाला झालेली जखम पाहून तो धावतच आत गेला . आणि मला गोठ्यामध्ये झोपायला सांगितले . त्यांनी आतून कसलीतरी पूड आणली .आणि माझ्या पायावर टाकली . जखमेवर दाबून लावली . आणि असाच झोपून राहा म्हणून मला सांगितले . सुमारे अर्धा तास मी शवासनामध्ये पडून होतो . अर्ध्या तासाने मी उठून बसलो . आणि पायाकडे पाहिले तर माझ्या पायाचे रक्त पूर्णपणे थांबलेले होते ! मी उठलो आहे हे पाहून साधू आतून फडके घेऊन आला आणि त्याने पाय पुसून घेतला . पाहतो तर काय आश्चर्य ! नक्की कुठे जखम झाली आहे हे शोधावे लागेल इतपत ती जखम भरून आली होती ! साधारण महिन्याभराने कुठलीही जखम जेवढी भरून येते तेवढी ती अर्ध्या तासात भरून आली होती ! मला फारच आश्चर्य वाटले ! मी त्या साधूंना विचारले की तुम्ही या जखमेवर काय लावलेत ? ते म्हणाले , "सांगतो बाबाजी सगळं सांगतो . तुम्ही आधी भोजन प्रसादी घ्या . मग आपण बोलू . आता इथे चांगला दोन-चार दिवस मुक्काम करा . पुढे जायची काही गडबड नाही ! " "पण ती पावडर कसली होती ? " मी पुन्हा मूळ पदावर आलो . बाबांनी सांगितले की ती त्यांनी शोधून काढलेली गुप्तमात्रा आहे ! शुद्ध मराठीमध्ये सिक्रेट फॉर्म्युला ! आणि जो कोणी हा आश्रम सांभाळेल त्याला बाबा ती मात्रा शिकवायला तयार आहेत ! 

हे मूळचे संभाजीनगरचे मराठी कुटुंबातलेच निरंजन बाबा म्हणून गृहस्थी संत होते .ते व त्यांची पत्नी दोघे मिळून इथे राहत होते . आणि यथाशक्ती यथामती परिक्रमावासींची मनोभावे सेवा करत होते . मी आश्रमामध्ये पोहोचलो तेव्हा या दोघांचा स्वयंपाकच चालला होता . मी आलोय हे पाहून माईंनी थोडेसे जेवण वाढवले .तेवढ्यात माझ्या पायाची जखम बघून बाबांनी त्यावर उपाय केला आणि मी झोपलो . ते दोघेही माझ्यासाठी जेवायचे थांबले होते !मी उठल्यावर आम्ही तिघे जेवलो . भाकरी तूप भाजी भात आमटी लोणचे कारळ्याची चटणी ताक आणि दही साखर ! अजून काय हवे ! भोजन प्रसाद घेऊन तृप्त झालो .दोघांनाही खूप आनंद वाटला .इथे त्यांच्या मदतीसाठी अजून एक सेवेकरी येऊन राहिलेले होते . जाधव असं त्यांचं आडनाव होतं . ते मूळ केंजळचे होते व सध्या पुण्यातील संभाजीनगर किंवा डेक्कन जिमखाना येथील पुलाची वाडी येथे राहत होते .इथे अजून एक फक्कड नाथपंथी साधू येऊन काही दिवसांसाठी राहिलेला होता . हा मूळचा पाटोद्याचा होता . कुठल्याही माणसाला मूळ गाव विचारायचा मला छंदच आहे !त्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी न विचारताच कळतात ! निरंजन बाबांना परिक्रमेदरम्यान इथे राव नावाचा एक स्थानिक श्रीमंत शेतकरी भेटला होता .त्याने बाबांना परिक्रमा झाल्यावर येथे आमंत्रित केले आणि एक एकर जागा देऊन इथे डोंगरावरती आश्रम स्थापन करायला सांगितले . ही अशी जागा होती की जिथे शेती करता येत नसे . आपल्या पश्चात या क्षेत्राचे कल्याण व्हावे म्हणून राव शेठने हा अतिशय स्तुत्य निर्णय घेतला . निरंजन बाबांनी त्या टेकडीच्या सर्वोच्च बिंदू वरती एक  छोटेसेच पण अतिशय सुबक आणि सुंदर मंदिर बांधले होते . इथे मुख्य अधिष्ठात्री देवता शारदा माता होती आणि अजून अष्ट देवता होत्या . खालच्या बाजूला गोशाळा होती .लोकांनी सोडून दिलेल्या जंगलामध्ये भटकणाऱ्या मरणासन्न गाई पकडून पकडून आणून बाबा त्यांचा इथे सांभाळ करे .म्हाताऱ्या असूनही यातीलच काही गाई इथे आल्यावर दूध देऊ लागल्या होत्या .बाबा गाईंवर मनापासून प्रेम करायचे . निरंजन बाबा दिसायला अतिशय साधे होते परंतु प्रचंड हुशार होते !त्यांच्या डोळ्यांमध्ये वेगळेच तेज होते . त्यांनी स्वतः संशोधन करून गाईच्या विविध गोष्टींपासून अनेक उत्पादने बनवली होती . गोमूत्र अर्क ,गोमयाचा साबण , गोमयाच्या गोळ्या ,चूर्ण , दंतमंजन ,गाईच्या शेणापासून आणि चुन्यापासून बनवलेल्या हलक्या फुलक्या विटा , शेणाच्या विविध मूर्ती , गणेशमूर्ती ,गाईच्या शेणाचे प्लास्टर अशी एक ना अनेक उत्पादने यशस्वीपणे यांनी बनवली होती .नुसती बनवली नव्हती तर संपूर्ण आश्रम या गाईच्या शेणांच्या विटांनीच बांधलेला होता .आणि ही उत्पादने किती उपयुक्त आहेत याचा मी स्वतः अनुभव घेतलाच होता ना ! त्यांनी बनवलेले बहुउपयोगी चूर्ण कुठल्याही कामासाठी वापरता येते असे त्यांनी सांगितले ! त्या चूर्णामुळे माझी जखम खरोखरीच लगेच भरून आली होती . कोणीही यावे आणि इथे राहून हे सर्व माझ्याकडून मोफत शिकून जावे असे ते सांगायचे . बाबांनी मला रात्रभर आग्रहपूर्वक थांबवून घेतले .  निरंजन बाबा इतके पुढच्या विचारांचे होते की त्यांनी इथे सुंदर अशी गोबर गॅसची टाकी बांधून घेतली होती . विटांपासून बांधलेली ही टाकी बांधणारा कारागीर खूप तयारीचा लागतो . कारण विटांचा घुमट बांधणे सोपे नसते . आणि ते देखील त्यातून एक कण सुद्धा गोबर गॅस बाहेर जाऊ न देईल अशा दर्जाचे बांधकाम लागते . बांधकाम तयार होते आणि आत मध्ये शेण टाकायला सुरुवात केलेली नव्हती. त्यामुळे मी अंग चोरून टाकीमध्ये शिरून आतून सर्व काम पाहून आलो ! त्याच दिवशी मनामध्ये संकल्प केला की जमतील तितके गोबरगॅस प्रकल्प जागोजागी उभे केले पाहिजेत ! किंवा उभारणीस लोकांना उद्युक्त केले पाहिजे . प्रबोधन केले की लोक ऐकतात . योजकस्तत्र दुर्लभ : ।  असो . निरंजन बाबांकडे रंगाचा एक डबा पडला होता . त्या रंगाच्या सहाय्याने मी जागजागी नावे , पाट्या ,लोगो ,चित्रे इत्यादी रंगवून दिले . दूध दही ताक आश्रमामध्ये भरपूर होते ते वेळोवेळी भरपूर सेवन केले ! बाबांनी आश्रमामध्ये भरपूर झाडे लावली होती . तसेच विविध प्रकारच्या भाज्या वगैरे लावलेले होते . वरती शारदेचे मंदिर होतेच .खाली देखील एक मंदिर बांधले होते .सगळी कामे बाबा स्वतः करायचे . बांधकाम सुद्धा स्वतः करायचे .आश्रमातल्या पहिल्या गायीची समाधी त्यांनी बांधली होती . त्या खडकाळ माळरानाचा त्यांनी अक्षरशः कायापालट केला होता .आणि या कामांमध्ये त्यांना खंबीर साथ दिली होती त्यांच्या अर्धांगिनीने ! मुलाकडे राहून नातवंडांचा आनंद घ्यायचे सोडून ही माऊली तिथे जंगलात या असल्या तुफान बाबासोबत येऊन गाईगुरांचे शेण काढत होती शेतातली कामे करत होती आणि परिक्रमावासीयांसाठी राबराब राबत होती ! याला म्हणतात खरी पतिव्रता ! आपला पती ज्या कुठल्या परिस्थितीमध्ये असेल ,जिथे कुठे असेल तिथे त्याच्यासाठी खस्ता खाते ती खरी पतिव्रता ! आपल्याकडे पतिव्रता या शब्दाचा फार चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो . डाव्या लोकांचे प्राबल्य असलेल्या चित्रपटसृष्टीने मालिकांनी आणि नाटकांनी पतिव्रता असणे म्हणजे तुमच्यामध्ये काहीतरी कमतरता असणे असे "फेक नॅरेटिव्ह " गेली अनेक वर्ष उभे केलेले आहे .प्रत्यक्षामध्ये हे एक फार सोपे व्रत आहे . आपण नेहमी म्हणतो की सर्वाभूती भगवंत . याचा अर्थ परमेश्वर सगळीकडे आहे . सर्वांच्या अंतर्यामी आहे . मग हे व्रत काय सांगते ,पती ,मग तो कोणीही असो आणि कसाही असो त्याच्या ठाई भगवंताचा वास आहे अशी कल्पना करून सर्व कामे करायची . तुम्ही महिनाभर असा प्रयोग करून बघा . त्याचे प्रचंड लाभ तुम्हाला मिळायला सुरुवात होते . काहीही न करता केवळ हा एक भाव मनात असेल तर समोरची व्यक्ती आपोआप बदलायला सुरुवात होते ! तुमचे पती तुमच्या मनासारखे वागत नसतील तर तुम्ही हे व्रत महिनाभर करून पहा . ते तुमच्या मनासारखे वागू लागतील ! हीच या व्रताची फलश्रुती आहे ! काही माता-भगिनी आज-काल लड्डू गोपाल घेऊन फिरतात . त्याला सर्वस्व मानतात . मग तोच सर्व शक्तिमान परमेश्वर तुमच्या पतीच्या रूपाने किंवा त्याच्या अंतर्यामी नांदत आहे असा भाव ठेवून जगणे काय कठीण आहे ? शिलावती , सत्यवान सतीसावित्री , सीताराम , अनसूया ही आपल्या परंपरेच्या इतिहासातील पतीव्रतांची उत्कृष्ट उदाहरणे आहेत .अगदी त्या पातळीला पोहोचू नाही शकलो तरी त्याच्या अलीकडे पलीकडे जाता येणे काहीच कठीण नाही .फक्त आपल्या मनातील आवडत्या व्यक्तीच्या जागी काही काळा पुरते आपल्या पतीला स्थापित करून पहा ! मुलींना आपल्या वडिलांचा कोण अभिमान असतो ! मग त्यांच्याविषयी जसा आधार आहे तसा या माणसामध्ये ठेवून तर बघा !नाही महिनाभरात त्या व्यक्तीचे वर्तन बदलले तर सांगा ! हे व्रत अंगीकारणे आजच्या काळामध्ये कधी नव्हते इतके महत्त्वाचे झालेले आहे . मोबाईल व्हाट्सअप गेट-टुगेदर ओटीटी आणि पार्टीच्या या जमान्यात पतिव्रत नावाचे व्रत करणारी महिला जगावर राज्य करणार यात शंकाच नाही ! आणि एक सोपा सिक्रेट फॉर्मुला सांगतो ! परमेश्वराने नर आणि मादी बनवताना त्यांना काही विशेष गुण दिलेले आहेत . मनुष्य हा मुळात स्वतःचे साम्राज्य निर्माण करणारा प्राणी आहे . इंग्रजीमध्ये ज्याला टेरिटोरियल ॲनिमल म्हणतात .हे काम पूर्वी पुरुष करायचे . अशी स्वतःची हद्द निर्माण करण्यासाठी त्याच्या ठाई एक अहंकार असणे नितांत आवश्यक असते .याला मेल इगो असे म्हणतात . जगात ज्या स्त्रीला हा मेल इगो सांभाळणे जमले ती जिंकली ! माझा एक गुरुबंधू मित्र आहे . सखाराम आठवले . त्याचे हिरण्यगर्भ नावाचे पुस्तक प्रसिद्ध आहे . त्याची पत्नी मोहिनी म्हणून होती . तिने नुकतेच अवतार कार्य संपवले . तिला माझ्या गुरूंनी लोकांना ध्यान शिकविण्याचे अधिकार दिले होते इतकी तिची अध्यात्मिक पातळी चांगली होती . ती मला नेहमी हे वाक्य सांगायची . आताच्या नवीन पिढीतील लोकांच्या लग्नामध्ये धुसफुस रुसवे फुगवे का असतात ? कारण अलीकडच्या बायकांना कळत नाही की या मायाजालातून सुटण्याचे सोपे सूत्र काय आहे . ती सर्व स्त्रियांना सांगायची , "Keep pampering that male ego deliberately and you'll see miracles in your life! " तुमच्या जोडीदाराचा पुरुषी अहंकार कुरवाळत रहा . तो दुखवू नका . मग बघा तुमच्या आयुष्यात काय चमत्कार होतात ! आणि एका पातळीवर विचार करून पाहिले तर हे किती खरे आहे ! कारण मुळात सगळीच माया आहे . सगळा मायेचा बाजार भरलेला आहे .अशा बाजारात एखादेच हक्काचे स्थिर सुखासन मिळाले तर काय अडचण आहे ! ही माऊली तशीच होती ! निरंजन बाबा जे सांगतील ते काम ती करायची . त्यांनी नाही सांगितले अशी कामे देखील आपण होऊन करायची . निरंजन बाबा मुळात नि:संग होते . त्यांचा सर्व संग सुटलेला होता .परंतु या माऊलीच्या पातिव्रत्यामुळे हा बाबा संन्यास घेऊन बाहेर पडू शकत नव्हता ! अशी ताकद आहे या व्रताची ! या दोघांनी मला खूप प्रेम दिले ! इतके प्रेम दिले की परिक्रमेच्या प्रारंभबिंदूला पोहोचल्यावर जबलपूर मुक्कामी असताना पुन्हा एकदा मी यांना भेटायला येऊन गेलो ! 

महान तपस्वी कर्मयोगी श्री निरंजन बाबा .यांच्या डोळ्यातले तेज मला विशेष भावले .
त्यांची सर्वार्थाने अर्धांगिनी ! 
बाबांनी बांधलेले शारदा मातेचे सुंदर मंदिर ! मागे नर्मदा माई दिसते आहे .
शारदा मातेच्या मंदिरात बसलेले निरंजन बाबा .
मंदिर असे टेकडीवर आहे . हे छोटेसे वनक्षेत्रच आहे .
या भागात अशी भरपूर झाडी आहे . त्यामुळे जंगली शापदांचा वावर येथे असतो .
मंदिरामध्ये बाबांनी अष्ट देवता स्थापन केलेल्या आहेत . 


या भागातील नर्मदा मातेचे रूप वेगळेच आहे ! सर्वत्र खडक असल्यामुळे मैय्या अशी दिसते . डोंगे रंगवण्याची पद्धत इकडे पहायला मिळते .मी वाचवला तो डोंगा हिरव्या रंगाचा होता !
प्रचंड खडकाळ अशा घाटावर स्नान करताना निरंजन बाबा
याच ठिकाणी झोपवून निरंजन बाबांनी माझ्या पायावर उपचार केले
बाबांनी गोमयापासून अर्थात शेणा पासून बनविलेले पर्यावरण पूरक गणपती
वरती शारदा मंदिर आहे आणि खालच्या बाजूला असे छोटेसे मंदिर बांधून त्याच्या आजूबाजूला छोटासा बगीचा महाराजांनी उभा केला आहे .
आश्रमाची छोटीशी वास्तु . मी गेलो तेव्हा एवढे सुद्धा नव्हते . एक छोटी झोपडी होती . आता एक-दोन खोल्या वाढलेल्या दिसत आहेत .
दुरून पाहिल्यावर बाबांनी या वाळवंटामध्ये नंदनवन कसे फुलले आहे ते लगेच आपल्या लक्षात येते .
आता तर बाबांनी कुंपण वगैरे घालून बाग सुरक्षित केलेली आहे असे दिसते . अतिशय कष्टातून त्यांनी हा आश्रम उभा केला आहे . 
बाबांनी नंतर देखील मला मित्राच्या क्रमांकावर संपर्क केला होता . त्यांचा क्रमांक येथे चित्राच्या वरच्या कोपऱ्यात दिसतो आहे . कृपया आपण त्यांच्याशी थेट संपर्क करू शकता .  
निरंजन बाबा ७५१७ ८११ ६५०
+917517811650
वरील जि पे  क्रमांक मातारामच्या नावे आहे . निरंजन बाबांच्या अर्धांगिनीचे नाव सौ गिरीजाबाई निरंजन पाळीमकर असे आहे .

या आश्रमामध्ये माझा वेळ खूप चांगला गेला . थोडी गोसेवा केली . आश्रमातील माझ्या जोगी सर्व कामे केली . निरंजन बाबा हे खूपच निरीच्छ ब्रम्हनिष्ठ आणि साधनानिष्ठ होते . त्यांनी पूर्वी नाटकामध्ये कामे केलेली होती .त्यामुळे आवाजातील चढ-उतार योग्य पद्धतीने वापरण्याची कला त्यांना अवगत होती . मी इथे राहिलो आणि थोडीफार सेवा घडली याचा बाबांना खूप आनंद वाटला . दोघांनी मोठ्या प्रेमाने मला निरोप दिला . आणि परत कधीही इथे येऊन रहा असे आवर्जून सांगितले . सकाळी सुंदर असा चहा बालभोग घेऊन दोघांना साष्टांग नमस्कार करून पुढचा रस्ता धरला . शारदा मातेची टेकडी खूप उत्तम जागी होती . कारण या टेकडीवरून छोटी धुवाधार पण दिसायची . गरारू घाटावरील भव्य किल्ले वजामंदिर दिसायचे . आणि जबलपूर जिल्हा देखील दिसायचा ! जिथे पोहोचण्याची मला अजिबात इच्छाच नव्हती !  या टेकडीच्या मागे एक गाव होते . परंतु मला गावातून जायचे नव्हते . त्यामुळे पुन्हा एकदा अतिशय कठीण असा काठ पकडला . आणि काठाकठाने पुढे चालत राहिलो . मन निर्विचार होते . इथून पुढे नर्मदा मातेच्या काठावरील एकापेक्षा एक पौराणिक व अत्यंत महत्त्वाची स्थाने ओळीने लागणार आहेत याची मला काहीही कल्पना नव्हती ! मी फक्त चालत होतो . वन स्टेप ॲट अ टाईम ! एका वेळी एकच पाऊल ! नर्मदे हर !





लेखांक एकशे अडुसष्ठ समाप्त ( क्रमशः )




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका (Index)

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ६ः झुलेलाल आश्रम , ग्वारी घाट

लेखांक ७ : नाभिकाने केलेला जाहीर __मान !

लेखांक ९ : इंदौरी पोहा आणि गरमा गरम जलेबी !