लेखांक ५९ : लछोरा येथील सौ. प्रतिभा सुधीर चितळे मैया यांची रेवाकुटी

२२-०२ -२०२२ ! आजचा आंग्ल दिनांक मजेशीर होता !
किनाऱ्याचा आजचा मार्ग खूपच दुर्गम आणि काटेकुटेयुक्त होता . मध्ये मध्ये मार्ग खंडित देखील झाला होता . तरीदेखील नेटाने चालत राहिलो . मध्ये येणारे ओढे नाले उड्या मारून किंवा पाण्यातून उतरून पार करत राहिलो .
याच भागातील नर्मदेला येऊन मिळणारा एक ओहोळ .
अखेरीस छोटी छीपानेर घाट आला .थोडे पुढे जाऊन मैया डावीकडे वळत होती . इथे उजव्या हाताला मोठा छीपानेर घाट आहे . हा घाट नावाप्रमाणेच छोटासा होता . परंतु गावातील वस्ती अधिक असल्यामुळे गजबजलेला काठ होता . मोठ्या संख्येने नावा असलेला हा घाट माझ्या लक्षात राहिला तो प्रामुख्याने गावकऱ्यांनी तयार केलेल्या तरंगत्या पुलामुळे ! इथे गावकऱ्यांनी एक फेरीबोट तयार केली होती जिला ते तैरता पूल म्हणायचे . एकावेळी चार-पाच मोठ्या गाड्या आणि काही लोक मावतील अशी त्याची रचना आणि क्षमता होती . 
 छोटी छीपानेर चा 'तैरता पूल '
या तरफ्यावर ट्रॉली सह एक ट्रॅक्टर आणि चार मोठ्या गाड्या आरामात बसलेल्या दिसतात पहा .
या तराफ्याची सतत ये जा सुरू असते
जिथे पूल बांधलेला नाही तिथे नदी पार करणाऱ्या लोकांना अशा साधनाशिवाय पर्याय उरत नाही .
हे त्याच भागातील एक छायाचित्र आहे . इथे वाळूमुळे पात्र विस्तीर्ण आणि उथळ आहे . तराफा चालतो त्या भागामध्ये मात्र खोली खूप जास्त आहे .
सडक मार्गाने परिक्रमा करणाऱ्या परिक्रमावासींना मात्र दुर्दैवाने हा सुंदर छोटी छिपानेर घाट तीन किलोमीटर लांब पडतो .
या संपूर्ण टापू मध्ये बंगाली मुले आणि शेळके काका व रोकडे काका हे मला पुन्हा पुन्हा मुक्कामावर भेटत राहिले . त्याच्यावरून मी गणित लावायचो की नदीच्या काठाने मनुष्य लवकर पोहोचते का सडक मार्गाने . प्रत्येक वेळेस नदीच्या काठाने चालणारा मनुष्यच अधिक चालून देखील लवकर पोहोचतो असे आमच्या लक्षात आले . आमची सर्वांची साधारण चालण्याची गती एकसारखीच होती . नदी काठावरून जाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तिचे दर्शन , स्पर्शन , श्रवण सतत होत राहते .जे सडक मार्गाने जाणाऱ्या लोकांसाठी दुरापास्त आहे .
मार्गामध्ये महर्षी सांदिपनी राष्ट्रीय वेद विद्या प्रतिष्ठान उज्जैन संचलित वेदपाठ शाळा आहे . 
श्रीकृष्ण सुदामा वगैरे मंडळी ज्या वेदपाठ शाळेमध्ये शिकली ती वेदपाठ शाळा उज्जैन नगरामध्ये आहे .सांदिपनी ऋषींच्या आश्रमामध्ये या सर्वांचे शिक्षण झाले . या आश्रमातर्फे चालविली जाणारी एक सुंदर वेदपाठ शाळा येथे छोटी छीपानेर गावात बाहेरच्या बाजूला मैय्याकाठी दिसते .परंतु मला आज पायांना गती आल्यामुळे मी तिथे न थांबता पुढे गेलो . अजून थोडेसे पुढे गेल्यावर डाव्या हाताला एक अतिशय सुंदर आश्रम दिसू लागला . घाटावर स्नान करणाऱ्या एका माणसाने आश्रम आवर्जून पाहून मगच पुढे जा असे सांगितले . जेव्हा नर्मदा नदीमध्ये उभा असलेला एखादा मनुष्य एखादा सल्ला द्यायचा तेव्हा तो मी मुकाटपणे ऐकायचो . हा आपल्यासाठी साक्षात नर्मदा मैया चा आदेश आहे असा माझा भाव असायचा . एका मोठ्या वटवृक्षाला ओलांडून पुढे गेल्यावर सुंदर असा वृक्षराजीने नटलेला आश्रम दिसू लागला . हा होता चिचोड कुटी गावातीलबजरंग दास महाराजांचा समाधी आश्रम .
श्री बजरंग दास महाराज समाधी आश्रम
आश्रमातील गर्द वृक्षराजी
आश्रमातील कमल कुटीर
बजरंग दास महाराज
आश्रमातील अन्य देवता
आश्रमामध्ये भरपूर बांधकामे होती व मागच्या बाजूला अशी चांगली निवास व्यवस्था साधुसंतांसाठी केलेली होती .
या आश्रमामध्ये अतिशय निरव शांतता होती . काही काळ मी सावली मध्ये बसलो परंतु कोणी आले नाही . नंतर मी आश्रमाचा परिसर फिरून पाहिला . इथे परिक्रमावासींनी परिक्रमेदरम्यान काय करावे आणि काय करू नये याचे खूप सुंदर नियम लावले होते . अखेरीस एक पंचा गुंडाळलेला साधू आला . मी कुठला काय चौकशी केल्यावर मराठी माणूस आहे ऐकल्यावर त्याने पुढच्या आश्रमात जा तिथे सर्व व्यवस्था होते असे मला सांगितले . मी त्याला आश्रमामध्ये येण्याचा माझा हेतू सांगितला . मला मुक्काम करायचा नसून फक्त महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्यायचे होते व क्षणभर विसावा घ्यायचा होता हे सांगून पुढे निघालो . पुन्हा काठा काठाने रस्ता शोधत पाय गतिमान झाले .
छीपानेर चा मोठा पूल खालून पार केला .
 छीपानेर चा पूल
 आता मैयाचे पात्र चांगलेच विस्तीर्ण झाले . आणि वाळूचे प्रमाण खूप वाढले . ही वाळू एकसारखी बारीक नव्हती तर खडे दगड मिश्रित असल्यामुळे बांधकामासाठी बिनकामाची होती .
ओबडधोबड खडक , वाळू आणि भूभागामुळे नर्मदेचे पात्र इथे वेड्यावाकड्या आकारात वाहते . त्यामुळे सलग एका रेषेत काठावरून जाण्याचा आनंद घेता येत नाही . बऱ्याचदा पुढे जाऊन पुन्हा उलटे माघारी येऊन चालावे लागते .परंतु त्यात सुद्धा आनंद आहे कारण मैया सतत शेजारी असते !
 समोर मैया चा एक मोठा प्रवाह अचानक डावीकडे वेगाने खाली वाहताना दिसला . याला प्रचंड खळखळाट होता ! इथे काही बगळे वेगाने येणाऱ्या पाण्यातील भांबावलेले मासे मटकावण्याचे काम करत बसले होते . 
हाच तो वेगवान डावीकडे वळलेला नर्मदेचा प्रवाह . बाकी नर्मदा डावीकडे दिसणारी उंच झाडे आणि उजवीकडे पुसट दिसणारी झाडांची रेषा याच्यामधून सरळ वाहते आहे .
मी इथून पुढे जाणार होतो इतक्या डावीकडे टेकाडावर एक भगवा झेंडा दिसला . या भागामध्ये शक्यतो पांढरे किंवा लाल झेंडे वापरतात . निखळ भगवा झेंडा फारसा दिसत नाही . वरती काय आहे पहावे तरी असा विचार करून मातीचा चढाव चढून  एका शेतातून वर गेलो .
 नर्मदापात्रातून वर येताना आश्रम असा दिसतो
 शेतामध्ये चार कुत्री होती ती सर्वजण एकदम माझ्या अंगावर धावून आली . झाडाखाली शेतकरी झोपला होता .मी आरडाओरडा करून त्याला जागे केले . त्याने देखील धावत येऊन माझ्याकडील काठी घेऊन सर्व कुत्र्यांना पळवून लावले . मालकाने हाकलले आहे कळल्यावर कुत्री शांत झाली . मग त्याने मला सांगितले की इथे समोर एक आश्रम आहे तो तुम्हाला दाखवतो . आणि चिखलाने माखलेल्या शेतातून मला आश्रमाच्या दारासमोर तो घेऊन आला . आश्रम छोटासाच पण अतिशय सुंदर होता .
चितळे मैया यांची लछोरा गावातील रेवा कुटी
 मी दारामध्ये उभा राहून नर्मदे हर असा पुकारा केला . एक तेजस्वी युवक धावतच बाहेर आला आणि मला म्हणाला , "नर्मदे हर बाबाजी । अंदर आईये । " आश्रमाच्या आत मध्ये एम एच १२ पासिंग ची एक गाडी उभी होती .युवक गोरापान आणि घाऱ्या डोळ्यांचा होता . त्याने पांढरे शुभ्र कपडे घातले होते . दाढी वाढली होती . आणि प्रकृती काटक होती . ये गाडी पुणे की है ना ? मी विचारले . "जी बाबाजी । पुना के कुछ परिक्रमावासी आये हुए है । " " बहुत अच्छी बात है । " असे म्हणत मी आश्रमाच्या ओवरीमध्ये झोळी उतरवली . माझ्या आधी काही परिक्रमा वासी येऊन बसलेले आहेत असे माझ्या लक्षात आले . बघतो तर सुमन मुजुमदार ! 
 लछोरा आश्रमामध्ये येऊन बसलेला सुमन मुजुमदार
दोघांनी आनंदाने एकमेकांना मिठी मारली ! नर्मदे हर ! पुण्यावरून कोण आले आहे याची चौकशी केली असता विवेक पंडित नावाचे प्रभात रस्त्याला राहणारे एक सॉफ्टवेअर इंजिनियर भेटले .जे अमेरिकेमध्ये ओरॅकल कंपनीमध्ये नोकरी करत होते .ते सपत्नीक गाडीने परिक्रमाला निघाले होते .आणि भोजन घेण्याकरता इकडे आले होते . ओसरी मध्ये बसून त्यांच्याशी गप्पा मारू लागलो . विवेक पंडित यांनी त्यांचे मित्र रवी गोडबोले यांच्यासोबत यापूर्वी ९६ दिवसाची पायी परिक्रमा केलेली होती . या परिक्रमे मध्ये महाराजपुर पासून पोटात दुखायला लागल्यामुळे रवी गोडबोले यांना परिक्रमा अर्धवट सोडून गाडीने पुढे जावे लागले होते . परंतु विवेक पंडित यांची परिक्रमा चांगल्या पद्धतीने पूर्ण झालेली होती .त्यानंतर अमेरिकेला नोकरीसाठी असताना त्यांनी शुलपाणीच्या झाडीमध्ये लोकांना देण्यासाठी सुमारे ५० ते ६० किलो कपडे गोळा केले होते आणि ते कपडे वितरित करण्याकरता यावेळी ते गाडीने सपत्निक परिक्रमेसाठी आलेले होते . 
आपल्या ९६ दिवसाच्या परिक्रमेचा अनुभव श्री पंडित यांनी सुंदर शब्दात शब्दबद्ध केलेला आहे . त्यांचे त्या परिक्रमेच्या शेवटी घेतलेले छायाचित्र .
परिक्रमा संपल्यावर घरी डावीकडून सौ विजया गोडबोले , श्री रवी गोडबोले , श्री विवेक पंडित आणि सौ वसुधा पंडित . सर्व चित्रे श्री विवेक पंडित लिखित नर्मदा परिक्रमा : एक स्वानुभव या अप्रतिम अनुभव कथन लेखनातून साभार .
गेल्या परिक्रमेच्या वेळी उत्तर तटावर असलेल्या चितळे मैया यांच्या जुन्या आश्रमामध्ये जाण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये होती . नेमावर गावाच्या अलीकडे दोन किलोमीटर वर हा आश्रम होता . परंतु त्यावेळेस त्या आश्रमाच्या आधी असलेल्या काली पगडी वाले बाबा यांच्या आश्रमामध्ये त्यांनी मुक्काम केला आणि सकाळी पुढे निघून नेमावरला आल्यावर चितळे मैय्यांना फोन केला की आम्हाला तुमचा आश्रम बघायचा आहे . तेव्हा त्यांना कळाले की काल ते चितळे मैया यांच्या आश्रमावरूनच पुढे आलेले आहेत . त्यावेळी परत उलटे फिरता येणार नाही म्हणून स्वतः चितळे दांपत्य नेमावर मध्ये येऊन यांची भेट घेऊन परत गेले होते . त्यावेळेस चितळे मैया यांचा आश्रम पाहण्याची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्याकरता या खेपेस हे लछोरा गावातील या नवीन आश्रमात आलेले होते ! आमच्या गप्पा ऐकत
एक छोटीशी अतिशय गोड आणि चुणचुणीत मुलगी तिथे इकडून तिकडे धावपळ करत होती . तिने धावतच आत मध्ये जाऊन तिच्या बाबाला वर्दी दिली . "अरे बाबा हे परिक्रमावासी सुद्धा मराठी बोलत आहेत ! " माझे मगाशी ज्याने स्वागत केले तो तरुण बाहेर आला आणि म्हणाला , " आपण सुद्धा मराठी आहात काय बाबाजी? " "हो दादा .मी पुण्याचा आहे . मी सांगितले . " मी त्याला विचारले , " हा तुमचा आश्रम आहे का ? " " नाही हा चितळे मैय्यांचा आश्रम आहे " तरुण उत्तरला . हा होता नवी मुंबई खारघर येथे राहणारा चेतन जोशी .नात्याने हा चितळे मैया यांचा पुतण्या लागत होता . खरे सांगायचे म्हणजे मी नर्मदा परिक्रमा कशी करतात , कधी सुरू करतात , कोणी करावी ,सोबत काय काय साहित्य घ्यावे ,काय काय तयारी करावी ,यापैकी काहीही , कुठेही , कधीही वाचलेले नव्हते .त्यामुळे मला युट्युब वर चितळे मैया यांचे अतिशय प्रसिद्ध असलेले नर्मदा परिक्रमेविषयीचे व्हिडिओ अजिबात माहिती नव्हते . हे विशेषत्वाने नमूद करतो . त्यामुळे मी त्याला सहजतेने विचारले , "कोण चितळे मैय्या ? " मला चितळे मैया माहिती नाहीत हे लक्षात आल्यावर चेतनने मला त्यांचे व्हिडिओ , त्या व्हिडिओमुळे प्रेरणा घेऊन परिक्रमा उचलणाऱ्या लोकांची संख्या वगैरे सर्व माहिती विस्तारपूर्वक सांगितली . नंतर अचानक माझ्या डोक्यात प्रकाश पडला ! प्रशांत चन्ने नावाचा माझा एक सहकारी मित्र होता . जो सतत दिवस रात्र चितळे मैया यांचे युट्युब वरील व्हिडिओ ऐकायचा . झपाटल्यासारखे ऐकायचा . परंतु त्याने मला त्यांचे नाव घेऊन कधी सांगितले नव्हते . तर तो फक्त एक मराठी काकू छान बोलतात असे सतत सांगायचा . चेतन ने सांगितल्यावर माझ्या लक्षात आले की ह्याच त्या चितळे मैया ! इथे अजूनही काही मराठी बोलणाऱ्या माताराम आलेल्या होत्या . योगायोगाने या सर्वजणी पुण्याच्याच होत्या आणि त्या सर्वजण एकेक करून बाहेर येऊन मला भेटून गेल्या . मीरा गडकरी म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी करणाऱ्या एक कोथरूड येथील माताराम होत्या . अलका राजपुरोहित म्हणून एक होत्या . आणि रूपाताई एक होत्या .या सर्वांची .आत मध्ये स्वयंपाकाची गडबड चालली होती . चेतनाच्या त्या छोट्या मुलीचे नाव अन्वी असे होते . आणि तिची नेहमीप्रमाणे आल्या आल्या माझ्याशी गट्टी जमली ! ही अतिशय सुंदर गाणी म्हणायची . आणि हे पाठांतर देखील जबरदस्त होते . तिने आल्या आल्या मला काही गाणी म्हणून दाखवली . सुमन मुजुमदार युकेलेलो वाद्य घेऊन आलाच होता .ते काढून मग आम्ही दोघांनी पुन्हा एकदा भजन सुरू केले ! भजन केल्याशिवाय भोजन घेणे हे पाप कर्मच वाटू लागले होते ,अशी काहीशी अवस्था झाली होती खरी! 
सुमन गाणी म्हणत असताना चेतन जोशी त्याचे फोटो काढत होता आणि व्हिडिओ घेत होता . ते त्याच्याकडून नुकतेच प्राप्त झाले .
छोटी अन्वी देखील आता आम्हाला सामील झाली आणि तिने खणखणीत आवाजात सुस्पष्ट उच्चारांमध्ये शंकराचार्यांनी लिहिलेले नर्मदाष्टक म्हणून दाखवले ! अजूनही छान छान गाणी तिने गायली ! आम्ही देखील मग गाणी म्हणू लागलो आणि सगळीकडे संगीतमय वातावरण झाले ! चेतन या सगळ्यांचे व्हिडिओ घेत होता . आपल्या माहिती करता ते सोबत जोडत आहे .


अन्वी चित्रकलेची वही घेऊन आली आणि तिला कुठले कुठले प्राणी हवेत त्यांची नावे मला पटापट सांगू लागली .मी देखील जमेल तितक्या गतीने तिला सर्व चित्रे काढून दिली .  लहान मुलांना चित्रे काढायला सांगणे हा माझा आवडता छंद आहे . मुले कुठली चित्रे /प्राणी काढायला लावतात यावरून त्यांची विचार क्षमता आणि झेप किती आहे याचा साधारण अंदाज येतो .


हळूहळू आमची गाडी पुन्हा एकदा बंगाली गाण्यांवर घसरली . मला भारतातील सर्वच प्रांतातील अभिजात संगीत खूप आवडते . त्यामुळे अशीच काही बंगाली गाणी मला पुन्हा पुन्हा ऐकून पाठ झालेली  आहेत . त्यातील एक गाणे आम्ही दोघांनी म्हटले .


बंगाली बाबू सोबत गाणी गाता गाता छोट्या अन्वीला चित्रे काढून देताना प्रस्तुत लेखक . पलीकडे बसलेल्या सौ वसुधा व श्री विवेक पंडित
चेतनने जेव्हा नर्मदे काठी राहून परिक्रमावासींना सेवा देण्याची इच्छा चितळे माईंकडे व्यक्त केली तेव्हा त्यांनी त्याला सांगितले की सेवा देण्याच्या आधी तू सेवा घे . म्हणजे तुला नक्की परिक्रमावासी काय प्रकारची सेवा इच्छितात ते लक्षात येईल . किती सुंदर पद्धत आहे ना ही शिकविण्याची ! त्याप्रमाणे चेतन खरोखरच आपली पत्नी आणि कन्या अन्वी हिला घेऊन नाभिस्थान नेमावर पर्यंतची एक पंच कोसी परिक्रमा अनवाणी पायाने करून आला . तो तर अनवाणी चाललाच चालला . परंतु त्याची पत्नी देखील अतिशय खडकाळ आणि खडतर अशा या भागातून अनवाणी पायाने चालली ! विशेष म्हणजे अन्वी छोटी आहे , हिला काही त्रास होणार नाही ना ? असा विचार आई वडील करत असताना ती मात्र या दोघांच्या पुढे सतत पळत राहिली ! तिच्या अंगामध्ये एका वेगळ्याच शक्तीचा संचार झाल्यासारखे झाले होते . अशी कठीण परीक्षा देऊन आल्यावर मगच चितळे मैयांनी चेतनाला सेवा करण्याची संधी दिली . ती देखील केवळ दहा दिवस . या कधी कोणाकडून थेट आर्थिक मदत वगैरे स्वीकारत नाहीत असे मला चेतनने सांगितले . त्यांचे म्हणणे असे असते की ज्यांना कुणाला परिक्रमावासींची सेवा करण्याची इच्छा आहे त्यांनी लछोरा आश्रमाशी संपर्क करून दहा दिवस सेवा कार्यासाठी यावे . आता देखील पुण्याच्या चार महिला अशाच पद्धतीने १० दिवसीय सेवेसाठी आलेल्या होत्या . डॉक्टर जोशी म्हणून एक भक्त आहेत जे ही व्यवस्था पाहतात . अन्वी भरपूर चालली होती .त्यामुळे तुझे पाय दुखले का ग बाळ असे मी तिला विचारले . क्षणाचा ही विलंब न लावता ती म्हणाली , " एवढी काळजी वाटते तर माझे पाय दाबून दे ! " मग काय विचारता ! माझ्या झोळीमध्ये मी एक छोटीशी तेलाची बाटली कायमची ठेवून दिली होती . कुठे काही जखम वगैरे झाली तर त्यावर लावण्यासाठी किंवा स्वयंपाकासाठी किंवा आग नीट पेटावी यासाठी किंवा देवाच्या निरांजनीच्या दिव्यासाठी किंवा काहीच उपयोग नाही झाला तर किमान अश्वत्थामा भेटला  तर त्याला देण्यासाठी असे अनेक उपयोग डोक्यात ठेवून ती बाटली मी सोबत बाळगली होती . आज ती कामाला आली !बाटलीतल्या तेलाने तिचे दोन्ही पाय जोडून मस्तपैकी दाबून दिले . तिने देखील अतिशय आनंदाने ती सेवा स्वीकारली ! माझा असा भाव होता की मी साक्षात नर्मदा मैयाची चरण सेवा करत आहे !
मी हे करत असताना अन्वी चे वडील या प्रकाराचे फोटो घेत होते याची मला कल्पनाच नव्हती .आता त्यांनी मला हे फोटो पाठवले .
अन्वी मोठ्या कौतुकाने ही चरण सेवा पाहत होती
साक्षात नर्मदा मातेनेच आपली सेवा घेतली असा भाव ठेवून मी अन्वीच्या पायांवर डोके ठेवून नमस्कार केला .
एवढे सर्व झाले परंतु अजून चितळे मैयांचे दर्शन झाले नव्हते .इतक्यात त्या स्वतः बाहेर आल्याच ! पांढरा शुभ्र पंजाबी ड्रेस घातलेला . गोरापान वर्ण आणि तेजस्वी चेहरा . अतिशय वेगळे परंतु सालस हास्य . स्पष्ट वक्तेपणा आणि त्याचवेळी प्रेमाने विचारपूस करताना व्यक्त होणारे उपजत मार्दव . अधिकार वाणीची भाषा परंतु नर्मदे प्रती तितकाच समर्पण भाव ! कधी ,कुठे ,कसे बोलावे याचे उत्कृष्ट भान . असे अद्भुत व्यक्तिमत्व लाभलेल्या याच त्या चितळे मैया ! यांनी कमरेला पट्टा लावलेला होता आणि बाहेर मांडलेल्या खुर्चीमध्ये त्या येऊन बसल्या . " तुमचे परिक्रमेचे अनुभव सांगा " असा विचारून गुळगुळीत झालेला प्रश्न मी त्यांना अजिबात विचारला नाही .फक्त ऐकत राहिलो .माझ्याशी त्यांनी भरपूरच गप्पा मारल्या आणि जेवण झाल्यावर इथेच मुक्काम करण्याची तंबी वजा आज्ञाच त्यांनी मला केली ! 
चितळे मैया यांचे सोबत प्रस्तुत लेखक
चितळे मैया आणि चेतन जोशी यांचे सोबत प्रस्तुत लेखक

त्यांची आज्ञा मोडणे मला शक्यच नव्हते . त्यामुळे मी आसन लावले . इतक्यात चितळे काका सुद्धा आले .काकांचा स्वभाव अतिशय विनोदी आहे वरवर पाहता ते गंभीर भासतात परंतु अतिशय चांगल्या स्वभावाचे आहेत. त्यांच्याशी देखील भरपूर गप्पा झाल्या . त्यांनी जागोजागी लावलेली विविध झाडे आणि आश्रमाचा केलेला विकास फिरवून मला स्वतः दाखविला . या नर्मदा जयंतीला त्यांनी एक छोटेसे हनुमंताचे मंदिर आश्रमामध्ये बांधले होते . आश्रमाचा तो कोपरा अतिशय रमणीय होता कारण तिथून नर्मदा मातेचे खूप सुंदर दर्शन व्हायचे .
हनुमंताच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वीचे मंदिराचे चित्र .मागे दिसणारे विस्तीर्ण मैया चे पात्र
आता हनुमान जी असे दिसतात
 लछोरा आश्रमातील वीर हनुमान जी .
संध्याकाळी माझ्या ओळखीचे सर्व परिक्रमा वासी ही तिथे मुक्कामासाठी आले . दरम्यान एक मोठा घोळ माझ्या हातून झाला होता . संध्याकाळी स्नानासाठी म्हणून मी नर्मदा मातेच्या काठावर जाऊन आलो .स्नान करण्यापूर्वी मी काठी व वस्त्रे एका दगडावर ठेवली आणि स्नानासाठी उतरलो . दरम्यान पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे मी हळूहळू पुढे पुढे गेलो .  इतक्यात वाऱ्याने माझे वस्त्र उडून चालले म्हणून मी ते बाहेर येऊन पकडले . त्यानेच अंग पुसले आणि तेच गुंडाळून वरती निघून आलो . दंड तिथेच पडून राहिला . बरे तो दंड इतका आकर्षक होता की कोणीही घरी नेला असता . सुदैवाने त्यानंतर तिथे कोणीही फिरकले नसावे . किंवा मग मैयाने तो दंड कोणाला दिसू दिला नसावा .परिक्रमेमध्ये दंड कमंडलू व या सर्व गोष्टींचे अतोनात महत्त्व आहे . पुढे या दंडाने अनेक वेळा माझे प्राण वाचविले . माझे नशीब इतके थोर की संध्याकाळी एकनाथराव रोकडे काठावरून येताना माझा विसरलेला दंड त्यांना दिसला आणि तो ते वरती घेऊन आले ! मी पूर्णपणे विसरून गेलो होतो की मी दंड कुठे ठेवला होता . परंतु माझा दंड दिसायला थोडासा वेगळा असल्यामुळे सगळ्यांच्या लक्षात राहिला होता . माझा दंड बघूनच त्यांना कल्पना आली की मी इथे मुक्कामी असणार आहे . त्यानंतर मात्र मी दंडाला कधीही अंतर दिले नाही . संध्याकाळी आम्ही सर्वांनी मिळून अतिशय सुंदर आरत्या केल्या . रामदासी संप्रदायाची सांप्रदायिक उपासना (करुणाष्टके वगैरे ) हनुमंतासमोर करून मी सांप्रदायिक आरत्या आणि सवाया वगैरे म्हटल्या . पूर्वी राजाच्या दरबारामध्ये भाट लोक असायचे जे राजाचे कौतुक करायचे . ते जे काव्य मोठ्याने गद्य पद्धतीमध्ये म्हणतात त्याला सवाई असे म्हणतात . समर्थ रामदास स्वामींनी रामाचे , हनुमंताचे वर्णन करणाऱ्या अशा अनेक सवाया लिहिलेल्या आहेत . मोकळ्या हवेत खणखणीत आवाजात मैय्या समोर त्या सवाया म्हणताना मला खूप भारी वाटले . पुण्यातील माताराम लोकांना हा प्रकार आवडल्यामुळे सकाळी निघताना त्यांनी मला पुन्हा एकदा सवाया म्हणायला लावल्या आणि त्या मोबाईलवर रेकॉर्ड केल्या .
डावीकडून क्रमशः प्रस्तुत लेखक चितळे मैया , चितळे काका ,एकनाथराव रोकडे, तानाजीराव गिरी गोसावी आणि शंकरराव सुखदेव शेळके . मागे नूतन हनुमान मंदिर . संध्याकाळची आरती व उपासना झाल्यावर काढलेले छायाचित्र .
पायी परिक्रमा पूर्ण केल्यानंतर आता वानप्रस्थाश्रमाचे जीवन नर्मदे काठीच व्यतित करायचे असे ठरवून चितळे दांपत्याने येथे जमीन विकत घेऊन हा आश्रम स्वतः उभा केलेला आहे . समोरचा जागा मालक यांना फारसा अनुकूल नव्हता असे माझ्या लक्षात आले . स्वतःबद्दल कधीच काहीही न बोलणारे हे दाम्पत्य आहे . आज नर्मदा परिक्रमे मध्ये मराठी लोकांची संख्या वाढलेली आहे त्याला कारणीभूत जसे जगन्नाथ कुंटे यांचे पुस्तक आहे तसेच भरीव योगदान चितळे मैया यांनी बनवलेल्या व्हिडिओजचे देखील आहे हे अनेक परिक्रमावासीच स्वतः मान्य करतात .मी त्याला एकट्याला गाठून चितळे दांपत्याचे कार्य किती मोठे आहे याची कल्पना देऊन भविष्यामध्ये कधी जमीन विकावीशी वाटली तर ती आश्रमाला दान करावी अथवा कमी किमतीमध्ये देऊन टाकावी असे सुचविले आणि त्याला ती युक्ती आवडली . त्याला चितळे काकूंच्या कार्याविषयी खरोखरच काही माहिती नव्हते . त्या दोघांकडे बघण्याचा गावकऱ्यांचा दृष्टिकोन या बैठकीनंतर नक्की बदलला असेल असा विश्वास मला वाटतो . इथून तसे बऱ्यापैकी लांब असलेल्या टीमरणी या गावात नोकरी करणारा एक मराठी युवक आपल्या पत्नीला मोटरसायकलवर मागे बसवून आश्रमामध्ये संध्याकाळी चितळे काकूंना भेटायला आला होता . त्याच्याशी भरपूर गप्पा मारल्या . संध्याकाळी पुण्यातील माताराम हनुमंतासमोर बसून काही साधना करीत होत्या . मी आश्रमात बसल्या बसल्या त्या प्रसंगाचे रेखाचित्र काढले . ते सर्वांना खूप आवडले व त्यांनी ते ठेवून घेतले .एकंदरीत आश्रमातील वेळ खूप चांगला गेला .आश्रमामध्ये सर्व प्रकारचे लोक येत .त्यातील गांजा मारणारे लोक गांजा मळून झाल्यावर त्याच्या बिया फेकून द्यायचे .त्यातून उगवलेली गांजाची झाडे मी काकांना दाखवली . त्यांना झेंडूची रोपे आणि गांजाची रोपे यातील फरक कसा ओळखायचा ते सांगितले . संध्याकाळी मी , काकांनी आणि चेतनने बागेची साफसफाई केली . तेव्हा गांजाची रोपे मी उपटणार होतो . परंतु काकांनी मला उपटू दिली नाहीत .त्यांनी मला सांगितले की या जगामध्ये काहीही चांगले किंवा वाईट नसते . या सर्व सापेक्ष गोष्टी आहेत . जे मला अयोग्य वाटते ते कदाचित अन्य कोणासाठी अतिशय योग्य असू शकते . साधकाचा दृष्टिकोन अतिशय संयमित आणि संतुलित असायला हवा . झटकन निर्णय घेऊन पटकन कृती करणे हे फारसे हितावाह नाही . खरे सांगायचे तर सकाळी आश्रमामध्ये शिरतानाच मी गांजाची रोपे पाहून बाहेर पडणार होतो .परंतु पुण्याची गाडी आणि पुणेरी पाटी दिसल्यामुळे मी आत मध्ये आलो होतो ! जर मी माझ्या अनुमानानुसार हा कुठल्यातरी गांजा ओढणाऱ्या साधूचा आश्रम असावा असा वृथा भ्रम मनात घेऊन पुढे निघून गेलो असतो ,तर मोठ्या आनंदाला मुकलो नसतो काय ? त्यामुळे अनुभव कधीही श्रेष्ठ ! म्हणजे अनुमान करूच नव्हे का ? तर असे नाही ! परंतु अनुमान आणि अनुभव या दोन्हीपैकी अधिक वजन अनुभवाला द्यावे इतकेच ! 
नर्मदा खंड देखील पुणेरी पाट्यांपासून वंचित नाही !
रात्री भरपूर थंडी पडली . माझा जो मित्र चितळे मैया यांचा भक्त होता त्याला काकूंच्याच फोनवरून फोन लावून त्यांच्याशी बोलायला दिले . त्याचा नंबर मला आजही तोंडपाठ आहे . बराच वेळ त्यांचा व्हिडिओ कॉल चालला . योगायोगाने माझी आई आणि मावशी माझ्या मित्राच्या घरी आल्या होत्या .त्यामुळे परिक्रमेत प्रथमच त्या दोघींशी बोलणे झाले . दोघींना अश्रू अनावर झाले . परंतु मी अतिशय सुखरूप असून त्याची काही काळजी करू नये ,असे स्वतः चितळे मैयांनी सांगितल्यामुळे दोघीही निश्चिंत झाल्या . मी मित्राला फोन करावा नेमके त्याचवेळी या दोघीनी तिकडे काही कारण नसताना यावे हा किती अजब योगायोग आहे ! हे घडवून आणणारी ही जी शक्ती आहे , तिचेच नाव आहे नर्मदा ! मी आई आणि मावशी दोघींकडे समसमान राहिलो आहे . त्यामुळे त्या स्वतःला गमतीने देवकी आणि यशोदा म्हणतात ! दोन्हीही सख्ख्या बहिणी असल्यामुळे काळजी करण्याचा स्वभाव दोघींचाही सारखाच .अर्थात हा स्त्री सुलभ स्वभावाचा भागच आहे हे मान्य आहे . परंतु त्याचा त्रास इतर कोणाला नको म्हणून मी परिक्रमेदरम्यान कधीही या कोणाला कोणाच्या क्रमांकावरून फोन केला नाही . कारण मला ती फोनधारी व्यक्ती नर्मदातटावर भेटणार एका मिनिटासाठी आणि परत मी काठाने पुढे निघून जाणार . परंतु यांच्याकडे त्या व्यक्तीचा क्रमांक गेल्यावर या पुढील महिनाभर त्याला फोन करून डोक्याला ताप देणार ! कुठे आहे आमचा दिवट्या ?  त्यापेक्षा ती भानगड च नको ! म्हणून मी फोन नावाचे चेटूक परिक्रमेत आणलेच नव्हते . आणि तो निर्णय अतिशय योग्य ठरला ! आपणही लक्षात घ्यावे . परिक्रमा करताना फोनची गरज लागत नाही . यापूर्वी ज्या कोणी साधुसंतांनी परिक्रमा केल्या त्यांच्याकडे कुठे फोन होते ! आणि मुळात भ्रमणभाष म्हणजे ब्रह्माच्या नव्हे तर भ्रमाच्या दुनियेमध्ये तुम्हाला घेऊन जाणारे साधन आहे . जे समोर नाही ते समोर असल्याचा आभास उभा करतो तो हा फोन . परिक्रमे मध्ये कोठेही नकाशा बघावा लागत नाही किंवा कोणाचा फोन नंबर लिहून घ्यावासा वाटला तर वही पेन पुरेसे असते .त्यासाठी फोनची गरज लागत नाही . आपणच पहा मी स्वतः सोबत फोन बाळगला नसून देखील माझे परिक्रमेचे किती सारे फोटो लोकांकरवी मला मिळाले आहेत . तेच मी फोन सोबत घेतला असता तर नुसते फोटो काढत सुटलो असतो इतकी रम्य दृश्य नर्मदे काठी मी पाहिलेली आहेत . आता ती दृश्य मी हृदयाच्या कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त केलेली असल्यामुळे कधीही पडल्या पडल्या आठवू शकतो . शिवाय त्याचा फोटो समोर नसल्यामुळे पुन्हा ती अनुभूती घेण्यासाठी तिकडे जाण्याची जी ओढ अंतर्यामी निर्माण होते ती फार महत्त्वाची आहे . पूर्वी फोन नसल्यामुळे नातेसंबंधांमध्ये अशी ओढ असायची . आता शेजारी शेजारी बसलेले पती-पत्नी देखील फोनच्या दुनियेमध्ये रममाण होऊन परस्परांना दुरावलेले दिसतात . मी स्वतः माझ्या आयुष्यात हे तत्व उतरवले आहे म्हणून अधिकार वाणीने सांगू शकतो की फोन शिवाय सुद्धा जगता येते . आपण यापूर्वीच्या लेखांमध्ये देखील पाहिले की ज्यांना ज्यांना काही सांगावे असे मला वाटले त्यांच्या त्यांच्याशी संपर्क मैय्याने त्वरित करून दिलेला आहे . परिक्रमेवरून परत आल्यावर माझ्याकडे फोन नव्हताच . माझे एक मित्र तेव्हा दिल्लीला असायचे आणि त्यांना माझ्याशी संपर्क साधावासा वाटायचा . त्यांनी त्यांच्या भावाकरवी बळेच मला एक फोन पाठवून दिला . त्या फोनवर अन्य कुठलेही काम चालत नसून फक्त या ब्लॉग चे लिखाण इतकेच काम त्याला उरलेले आहे ! असा काही उपकारक वापर होत असेल तर तेवढाच क्षम्य आहे . बाकी फोनची साधकांना गरज नसते हे ठळक अक्षरांमध्ये हृदयात कोरून ठेवावे . ( सूज्ञ वाचकांना वेगळे सांगण्याची गरज नाही की यातून फोनचा व्यावसायिक वापर व अन्य अत्यावश्यक / आत्ययिक प्रसंगीचे वापर गृहीत धरून वर्ज्य केलेले आहेत )
मित्राला केलेल्या फोनचा अजून एक फायदा असा झाला की पुढे त्याने नर्मदे काठी मला भेटायला येण्याचे ठरविले आणि कुठून तरी कसा बसा माझा तपास लावून तो परिक्रमेदरम्यान येऊन भेटून गेला देखील !तो प्रसंग पुढे यथावकाश येईलच . असो . बास झाले हे फोन पुराण ! रम्य सकाळी उठून पुन्हा एकदा सुंदर पैकी नर्मदा स्नान करून सवाया म्हटल्या व त्या रेकॉर्ड झाल्या . सुंदर असा बालभोग चहा वगैरे घेतल्यावर सर्वांनी एकत्र प्रस्थान ठेवले . मी महाद्वाराच्या बाहेर पडल्यावर डावीकडे नर्मदेचा काठ पकडला आणि बाकीच्या वयोवृद्ध लोकांनी उजवीकडचा सडक मार्ग धरला . तत्पूर्वी चेतनाने आमचे फोटो काढले ते आपल्या करता देत आहे .
डावीकडून तिसरा प्रस्तुत लेखक
 (डावीकडून )पुण्यातील सेवाधारी माताराम मीरा गडकरी , रूपाताई ,अलका राजपुरोहित ,चितळे मैया , चितळे काका ,प्रस्तुत लेखक , शंकरराव शेळके ,एकनाथराव रोकडे आणि तानाजी राव गिरी गोसावी
नर्मदेची माणसं
खडकाळ काठाने चालून या बूटाचा सोल देखील आडवा तिडवा झिजलेला दिसतो आहे पहा . 
संत एकनाथांची आरती तोंडपाठ असलेले शंकर सुखदेव शेळके काका हे ठाणगाव तालुका येवला जिल्हा नाशिक इथून आले होते आणि अतिशय समजूतदार होते .यांचे माझे फार जुळायचे . यांनी मला अतोनात प्रेम दिले .
आयुष्यात कधीही दाढी मिशा न ठेवलेले एकनाथराव गोविंदराव रोकडे काका हे बेलापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा नगर येथून आले होते आणि यांच्यामुळे मुक्कामावरचे वातावरण सतत आनंदी ,उत्साही आणि विनोदी राहायचे!
हे आहेत तानाजीराव गिरी गोसावी जोंधळवाडी मनमाड. यांचा खंबीर आधार सर्वांना असायचा आणि हे सर्वजण अखेरपर्यंत एकत्र चालले . मी दिलेले मैया काठी सापडलेले एक अतिशय सुंदर शिवलिंग यांनी प्राणा पलीकडे जपले असणार याची मला खात्री आहे . 
इथून पुढे यांची पुन्हा दर्शने झाली नाहीत .परिक्रमेत असे खूप लोक तुम्हाला भेटतात .ते तुमचेच आहेत असे आतून जाणवत असते . एका प्रेमसूत्राने नर्मदा सर्वांना बांधून ठेवते . जिथे ध्येय एक आहे तिथे मनभेद मतभेद फारसे होतच नाहीत हे कायम लक्षात ठेवावे . आणि संघटनेचे हेच सूत्र आहे की एका ध्येयाने प्रेरित होऊन मार्गक्रमणा करणारे लोक सदैव एकत्र राहतात आणि एकात्मता जपतात . नर्मदा परिक्रमा तुम्हाला खूप काही देते . छोट्या छोट्या गोष्टींमधून भेदाभेद अथवा मतभेद करण्याची आपल्या मानवी मनाची उपजत सवय परिक्रमेमुळे कायमची नष्ट होऊन जाते . फुलाच्या हारामध्ये जशी विविध रंगाची फुले एका सूत्रात गुंफलेली असतात तशी नर्मदा परिक्रमा या सर्व नररत्नांना प्रेमाच्या एका सूत्रात गुंफून टाकते ! कायमची ! 



लेखांक एकोणसाठ समाप्त ( क्रमशः )

मागील लेखांक

पुढील लेखांक

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर