लेखांक २५ : जंगल मे मिल, तुझे काट डालूँगा ।

नर्मदेतील सर्व प्लास्टिकचा कचरा गोळा करून झाल्यावर मी त्या निर्मळ , नितळ पाण्यामध्ये आकंठ स्नान केले ,उपासना केली आणि प्रचंड थंडीचा अनुभव घेत बसून राहिलो . आज मी संक्रांतीच्या उत्तर पर्वावर साक्षात अमरकंटकच्या प्रवेशद्वारातून आत शिरत नर्मदा मातेमध्ये पुन्हा एकदा मंगल स्नान केले होते याचा आनंद वाटत होता ! दिवसभरात अजून काही परिक्रमा वासी त्या कुटीमध्ये मुक्कामासाठी आले . अमरावतीचा एक परिक्रमावासी होता . हा चित्रकार होता. जी डी आर्टस झालेला होता . आळंदी मधील दोन वारकरी विद्यार्थी होते .नाशिक मधला चिडका बाबा देखील पोहोचला होता . अचानक भर दुपारी हुतात्मा भगतसिंगांसारखा दिसणारा एक सहा फुटी उंचापुरा धिप्पाड साधू प्रकट झाला . त्याने कमरेला छोटीशी काळी लुंगी गुंडाळली होती . अंगावरती काळे पांढरे चट्टे पट्टे असलेले ब्लॅंकेट होते . डोक्याला पटका होता . भस्म विलेपित शरीर डोक्यावर जटा आणि नजरेत भरेल इतपत पिळदार देहयष्टी !हा चित्र विचित्र हातवारे करून स्वतःशीच असंबद्ध बडबड करत असे .तसेच अखंड गांजा पीत होता . 
त्या साधूची प्रकृती साधारण अशी होती (संग्रहित चित्र )
 मी भजनात बंगाली खोळ वाजवत असताना त्याने मला थांबायला लावले . मी देखील साधूच्या शब्दाचा मान म्हणून थांबलो . तो मध्येच हसायचा ,मध्येच सचिन्त  व्हायचा. सगळेच अगम्य चालू होते . खरे म्हणजे विदेही अवस्थेप्रत पोहोचलेले काही महात्मे असतात . परंतु ते लगेच कळतात . हा मला काहीतरी वेगळाच प्रकार वाटला . तसेच इतकी सोन्यासारखी प्रकृती असून त्याचे अखंड धूम्रपान बघून मला थोडेसे वाईट देखील वाटले .दुपारी सर्व भोजन व दक्षिणा आटोपल्यावर महाराज आपल्या शिष्यांसमवेत निघून गेले . महाराजांच्या शहरी शिष्यांसाठी नवी कोरी ब्लॅंकेट कुटीमध्ये काढली होती . ब्लॅंकेट कसली अतिशय तलम आणि सुंदर ऊब असलेल्या त्या दुलया होत्या ! सर्वांनी शिष्य गेल्याबरोबर पटापट दोन दोन दुलया अंगावर पांघरून घेतल्या ! इतक्यात आश्रमातला स्थानिक व्यवस्थापक आला आणि त्याने सांगितले की या दुलया तुमच्यासाठी नाहीत . अंधार पडल्यामुळे हाडे गोठवणारी थंडी सुरू झाली होती . त्या दुलई मधून बाहेर येण्याची इच्छाच होत नव्हती . सर्वजण त्याच्याशी भांडू लागले . मला योग्य वेळी नर्मदा मातेने परिक्रमावासीयांनी कसे वागावे कसे वागू नये हे साधूंमार्फत सांगितले होते . त्यामुळे मी माझ्या दुलया परत करून शांतपणे ते भांडण पाहत राहिलो . सोबतचे चार-पाच परिक्रमावासी दुलई देण्यासाठी राजी नव्हते , मी देखील दुलया परत देऊ नये असे ते मला सांगत होते.त्यांचे असे म्हणणे होते की शहरी भक्तांसाठी वेगळा न्याय आणि आमच्यासाठी वेगळा न्याय असा दुटप्पीपणा का करता ?
तो मुलगा मला म्हणाला , बाबा आप कुछ बोलते क्यू नही ? मग मी समजावणीच्या स्वरामध्ये सर्वांना सांगितले . हे पहा सज्जन हो, शहरी भक्त महाराजांच्या विविध आश्रमांच्या बांधकामाचा , संचालनाचा व अन्नदान यज्ञयागादि सर्व कर्मकांडाचा , प्रवासाचा , निवासाचा, दानधर्माचा पूर्ण खर्च उचलत असतात . त्यांना सुखरूप आणि आनंदामध्ये ठेवणे हे आश्रमाचे कर्तव्य आहे . तसेच शहरातील सर्व पंचतारांकित सुविधा त्यागून अचानक जंगलामध्ये आल्यावर त्यांना त्रास होऊ नये म्हणून अशा मऊशार दुलया त्यांना  आश्रमाने दिल्या तर त्यात काही वावगे नाही . आपण आश्रमासाठी काहीच करत नसून केवळ काही तासांचे पाहुणे आहोत . शिवाय आपण सर्वजण इथे आपल्या सुखांचा त्याग करण्यासाठी आलेले आहोत . आपण अशा किरकोळ गोष्टीचा खेद मानू नये . आळंदीच्या मुलांकडे पाहून मी म्हणालो ,तुकोबाराय म्हणतात , जैसी स्थिती आहे तैशा परी राहे । कौतुक ते पाहे संचिताचे ॥हे बरोबर आहे ना ? अमरावतीचा परिक्रमावासी फारच सालस , समजूतदार , अध्यात्मिक आणि हुशार होता . तसेच ही त्याची दुसरी परिक्रमा होती . पहिली परिक्रमा अमरकंटक नजिकच खंडित झाली होती . त्यामुळे तो पुन्हा परिक्रमेला आला होता . तो आणि आळंदीचे विद्यार्थी माझ्याशी सहमत झाले . नाशिकचा म्हातारा तरी देखील ऐकत नव्हता . अखेरीस मी त्या मुलाला हात जोडून विनंती केली . हे पहा आम्ही सर्व गृहस्थी अथवा सर्वसामान्य परिक्रमावासी आहोत . परंतु हा जो उंचापुरा साधू आपल्या सोबत आहे तो मात्र साधू जीवन जगतो आहे .तरी कृपा करून त्याला दुलई द्यावी कारण त्याच्या अंगावर फारशी वस्त्रे सुद्धा नाहीत . हा तोडगा सर्वांना मान्य झाला आणि निरीच्छेनेच सर्वांनी आपापली पांघरुणे त्याच्या ताब्यात दिली . त्या दुलईची घडी इतकी मोठी व्हायची की एकावेळी एकच उचलता यायची . साधू मात्र त्याच्या दुलई मध्ये मस्त गुरफटून झोपून गेला .सर्वत्र निरव शांतता पसरली . हळूहळू संपूर्ण परिसरामध्ये फक्तआणि फक्त नर्मदा मातेचा झुळझुळ आवाज तेवढा उरला . रात्री कुटीच्या बाहेर कोणीही पडू नका अशी सूचना देऊन सेवक गेला होता . कारण रात्री वाघ व अन्य हिंस्र श्वापदे पाणी प्यायला यायची .परंतु तरीदेखील एकदा नर्मदा मातेचे दर्शन घ्यावे म्हणून मी बाहेर आलो . आणि समोरचे दृश्य बघून मी स्वतःलाच विसरून गेलो ! पौर्णिमेचा टपोरा चंद्र डोक्यावर होता ! चांदण्यांचा लखलखाट होता . आकाशातून जणु पृथ्वीवर रुप्याचा वर्षाव होत होता . नर्मदा मातेचा सूक्ष्म खळखळ खळखळ आवाज आसमंतामध्ये निनादत होता . त्या खळखळाटामध्ये पडलेले चंद्राचे प्रतिबिंब अक्षरशः हिऱ्याच्या खाणी सारखे चमकत होते ! ते स्वर्गीय दृश्य पाहून भान हरपले ! आपण कोण आहोत आपण कुठे आहोत या सगळ्याचा विसर पडला ! काही काळ मी तसाच स्तब्ध उभा होतो . 
 ( प्रातिनिधीक चित्र )
कानामध्ये नर्मदा मातेचा तो आवाज इतका खोल साठविला गेला की दुसरे काही ऐकू यायचे बंद झाले ! मनातील विचारांची जागा त्या खळखळाटाने घेतली . डोक्यात फक्त एकच विचारधारा सुरू झाली .खळखळ खळखळ शिव  शिव शिव शिव. चित्तवृत्ती पूर्णपणे निमाल्या . एका अलौकिक अस्तित्वाची अनुभूती येत होती . अनुभूती देणारा कोण व घेणारा कोण असा भेदच मुळी जाणवत नव्हता . आपण एका भयानक अरण्याच्या मधोमध अंधारात एकटेच उभे आहोत याचे देखील भान उरले नव्हते . अचानक समोरच्या तटावर झाडीतून मोठा आवाज झाला . एखाद्या धिप्पाड अवाढव्य श्वापदाच्या पळण्याचा तो आवाज होता . कदाचित रानडुक्कर असावे . कारण वाघ असा आवाज करून कधी पळत नाही . त्याच्या तळपायाला असलेल्या मऊ गाद्यांमुळे त्याच्या पायाचा आवाज येत नाही . नर्मदा मातेला साष्टांग नमस्कार करून मी पुन्हा कुटी मध्ये आलो . कुटीला दार नव्हतेच परंतु त्यामुळे आतून एक खाट लावून ती बंद करावी लागे . तशी मी केली .आणि शांतपणे पाठ टेकली . ही कुटी अगदी नर्मदेच्या काठावर असल्यामुळे आत मध्ये देखील तोच आवाज रुंजी घालत होता . उलट छताच्या विशिष्ट आकारामुळे आत मध्ये हा आवाज परावर्तित होऊन अजूनच स्पष्ट ऐकू येत होता ! 
या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी । पाहिली शोधूनी अवघी तीर्थे ॥ हे सेना न्हावी महाराजांचे शब्द मनोमन स्मरले . नर्मदा मातेचा तो वैखरी मधील जप ऐकत डोळे मिटले . याच अवस्थेत कायमचे डोळे मिटावेत तर किती भाग्याचे ठरेल असे वाटू लागले ! इतक्यात ...
इतक्यात कानावर शब्द पडले . . .
काटा लगा ऽऽऽऽऽऽऽऽ 
हाय लगा ऽऽ आ आजा ss राजा
बंगले के पीछे तेरी बेरी के नीचे
मला एक क्षणभर कळायचेच बंद झाले की ही गाणी एवढ्या घनघोर जंगलामध्ये लावली कुणी ? कारण दमगढ गाव तरी इथून दोन किलोमीटर दूर होते .रात्रीच्या शांततेत कदाचित आवाज इतका दूर ऐकू येऊ शकतो . परंतु हा आवाज फारच मोठा होता . उठून बसलो आणि आजूबाजूला पाहू लागलो . मग माझ्या लक्षात आले की  डोक्यापासून पायापर्यंत गुरफटून घेतलेल्या साधूच्या दुलईमधूनच हा आवाज येत होता . माझ्या तळपायाची आगच मस्तकाला गेली ! तरी देखील स्वतःवर संयम ठेवत मी साधूला हलवून जागे केले . त्याने दुलई बाजूला करताच गाण्याचा आवाज कैकपट मोठा झाला !त्याने चिडून माझ्याकडे पाहिले .  क्या है ? मी हात जोडून विनंती केली बाबाजी कृपया गाने बंद कर दिजिये | 
क्यों? साधू ओरडला .
अरे बाबाजी . हम भी सुन रहे है ।आप भी सुनिये । नर्मदा मैया का कितना सुंदर आवाज अपनी कुटिया मे आ रहा है । साधू म्हणाला मुझे नही सुनना ।
मी त्याला पुन्हा निक्षून सांगितले . रात के बारा बजे चुके है । गाने बंद कर दीजिए ।
साधू म्हणाला ,नही करूँगा ।क्या करेगा बोल ।
आता मात्र माझा संयम सुटत चालला होता . तरीदेखील मी मनोमन नर्मदा मातेचे स्मरण करत स्वतःला शांत संयमी ठेवले होते . मी त्याला म्हणालो अरे इतकी नर्मदेच्या काठाला झोपण्याची जागा कुठेच नसेल . का असे करतो आहेस ?घे ना आनंद !किमान पक्षी आम्हाला तरी घेऊ देत !  त्यावर साधू मला म्हणाला मैया का आवाज सुनना है तो मैया मे जाके सो जाओ ।आता मात्र माझ्या रागाचा पारा खाड करून वर चढला । मी चढ्या आवाजात त्याला म्हणालो , बाबाजी गाना बंद करदो ।
त्यावर साधू मला म्हणाला मै गाने नही । भजन सुन रहा हु । यावर काय बोलावे तेच मला कळेना . मी म्हणालो ये कौनसा भजन है भाई ? बंगले के पीछे तेरी बेरी के नीचे ? अगर आपको सचमुच भजन सुनना है तो वो भी सुन सकते हो । लेकिन ये सिनेमा वाले गाने बंद कर दो ।
आमच्या दोघांची चढलेले आवाज पाहून सर्वजण निश्चितपणे जागे झाले होते परंतु मध्ये कोणीच पडत नव्हते . मी सर्वांना उद्देशून म्हणालो अरे बोला की काहीतरी . त्यावर अमरावतीचा बाबा उठून बसला . आणि तो म्हणाला , ये जो बोल रहे है वो सही बता रहे है । आप गाने बंद कर दो । साधू म्हणाला नही करूँगा ।क्या कर लोगे ? आता माझी खरंच सटकली ! मी त्याला म्हणालो तुझे आखरी बार बोल रहा हु । गाना बंद कर । नही तो आगे क्या होगा उसके लिए जिम्मेदार तू स्वयं होगा । मी असे म्हटल्याबरोबर तो साधू अचानक मोबाईल फेकून त्याची काठी हातात घेऊन माझ्या अंगावर धाऊन आला . त्याचा तो धिप्पाड देह पाहता त्याने काठी डोक्यात घातल्यावर माझ्या डोक्याचा नारळच फुटला असता . परंतु मी देखील सावध होतो . मी चटकन माझी काठी हातात घेऊन उभा राहिलो . तमिळनाडूमध्ये सिलम्बम नावाची एक युद्ध कला आहे तिचे प्रशिक्षण मी घेतलेले आहे . त्याप्रमाणे काठी फिरवून मी पवित्रा घेऊन उभा राहिलो . साधूने एक काठी माझ्या दिशेने हाणलीच .मी मोठ्या वेगाने ती चुकवून गरर करून फिरवून परत त्याच्याच दिशेला पाठवली .त्या कृतीतून साधूला माझ्या शक्तीचा आणि अचूकतेचा अंदाज आला. ती चुकवल्यावर मात्र मी मोठ्या त्वेषाने माझी काठी उगारली आणि त्यावेळी चा माझा जो काही आवेश होता तो पाहून त्या साधूने हातातली काठी फेकून दिली आणि त्याचा बोरिया बिस्तर पटापट गुंडाळून तो जंगलाकडे ओरडत पळत सुटला ! त्याचे अर्धे सामान तिथेच सुटले . जाता जाता त्याने नवीन दुलई घेतली आणि जंगलामध्ये चिखलात फेकून दिली ! तो जोर जोरात पळत सुटला .
मी एकदम भानावर आलो . मीही त्याच्या मागे पळत सुटलो . अरे बाबाजी जंगल मे मत जाओ । इधर आओ ! मुझे क्षमा करना । मेरी गलती हो गयी । पण साधु काही परत आला नाही .तो काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हताच . जंगलामध्ये जाऊन तो जोरजोरात ओरडू लागला , कल इसी जंगल से जाओगे । जंगल मे मिलना । तुझे काट डालुंगा । एक एक को काट डालुंगा ! मी त्याला म्हणालो कल क्यू ? अभी हात लगा के दिखा मुझे । पण साधू जंगलामध्ये दिशा मिळेल तसा पळत सुटला . इतका सोन्यासारखा धिप्पाड देह पण फुल फाट्या निघाला !त्याच्या या कृतीमध्ये तो निश्चितपणे वन्य श्वापदांना जागृत करत होता . आता बहुतेक रात्रीच याचा जंगलामध्ये कार्यक्रम होणार असे वाटून मी पुन्हा आपल्या कुटीमध्ये आलो . येता येता नर्मदा मातेची मनापासून क्षमा मागितली . आणि तिची प्रार्थना केली ' हे माते , आता जे काही घडले ते मला काहीही अपेक्षित नव्हते .मी साधूला हाकलले नाही . तो आपण होऊन पळाला आहे . हा साधू मूढमती आहे . तो काय करतो आहे त्यालाच कळत नाही .कृपया जंगलामध्ये त्याचे रक्षण कर .
 कुटी मध्ये मी आलो तर सगळे उठून बसलेले होते ! झालेल्या प्रकारामुळे सगळेच भांबावले होते ! एका अतिशय सुंदर वातावरणातून आम्ही उत्कृष्ट असे कलुषित वातावरण उभे करून दाखवले होते ! आणि त्यात सर्वात मोठा हातभार माझाच होता हे दुर्दैव ! परंतु माझी भावना शुद्ध होती . मला नर्मदा मातेचा आवाज ऐकायचा होता .साधूने गाणे बंद केले असते तर विषय संपत होता . परंतु त्याचा अहंकार त्याला दुःखा प्रत घेऊन गेला . मी परत आल्यावर सगळेजण उठून तावातावाने बोलायला लागले . मी सर्वांना म्हणालो अरे तुम्ही सगळे जागे होतात तर मध्ये का नाही पडलात ! आता या साधूचे जंगलात काही बरे वाईट झाले तर ते आपल्यावर येणार . इकडे झाले उलटेच होते . आळंदीची मुले व सर्वचजण त्या साधूच्या धमकीला घाबरले होते ! ते सर्व मला म्हणू लागले . ऐकू द्यायची होती ना गाणी त्याला . आता उद्या जंगलामध्ये हा आपल्यावर हल्ला करणार ! खून करणार ! तुमच्यामुळे आमचा जीव धोक्यात आला ! मला या विधानावर हसावे का रडावे तेच कळेना ! हे सर्वजण घाबरलेले आहेत हे पाहून मी अजून एक गंमत केली ! मी त्या सर्वांना म्हणालो , अरे त्या एवढ्या धिप्पाड साधूचा काठीचा फटका मी उडवून लावला . तुमची काय बिशाद आहे ? उगाच माझ्यावर येऊ नका . नाहीतर ...इतक्यात आळंदीचा एक मुलगा माझ्या बाजूने बोलू लागला ! आणि त्या दोघांची आपापसामध्ये चांगलीच जुंपली ! नाशिकचा बाबा पण अमरावती वाल्याशी विनाकारण भांडू लागला ! कल्पना करून बघा रात्रीचे बारा वाजले आहेत ! आणि त्या घनघोर जंगलामध्ये अशा पद्धतीने चढ्या आवाजात भांडणे सुरू आहेत ! माझी हसून हसून पुरेवाट झाली ! परिक्रमेमध्ये सोबत एखादा मनुष्य घेतला की असे होते ! अति परिचयात अवज्ञा होऊन जाते . आणि मनातील सर्व विकार परिक्रमा बाहेर काढत असते . ते मग असे कधीतरी अचानक बाहेर निघतात ! सुमारे अर्धा तास कडाकडा भांडून झाल्यावर सगळे पुन्हा शांत झाले आणि गप्पा मारू लागले !नर्मदा परिक्रमा तुम्हाला लहान मुलासारखी बनवते .लहान मुलांची भांडणे जशी एका क्षणात मिटतात अगदी तसेच परिक्रमे मध्ये सुद्धा होते ! जणू काही झालेच नव्हते अशा प्रकारे सर्वजण पुन्हा गप्पा मारू लागले . मग त्या साधूचे एक एक किस्से मला या चौघांनी सांगायला सुरुवात केली . मी जेव्हा संध्याकाळी स्नान संध्या उपासनेसाठी नर्मदेच्या काठावर जाऊन बसलो होतो तेव्हा या साधूने बरेच पराक्रम केले होते . मुख्य म्हणजे तो ज्या आश्रमात राहतो आहे त्या आश्रमाला अखंड नावे ठेवत होता .इथल्या तपस्वी राम महाराजांना देखील त्याने अश्लाघ्य भाषेमध्ये शिव्या घातल्या होत्या . दुपारी मिळालेल्या अन्नाला नावे ठेवली होती . आश्रमातील व्यवस्थेचे वाभाडे तो काढत होता . आम्ही सर्वांनी मिळून स्वतः थंडीमध्ये झोपून देखील या साधूला दुलई मिळावी म्हणून प्रयत्न केले होते . परंतु इतके सर्व करून देखील हा साधू काही त्याचा मद सोडत नव्हता .अतिरिक्त गांजा पिल्यामुळे त्याची चित्तवृत्ती पूर्णपणे बहकली होती . हे सर्व नर्मदा मातेला कसे बरे सहन होईल ? त्यामुळेच तिने माझ्या माध्यमातून त्या साधूला शिक्षा म्हणून भर रात्री - मध्यरात्री जंगलामध्ये हाकलून दिले असे सर्वांचे मत पडले . या संपूर्ण थरारपटामध्ये मी नायक ठरलो होतो आणि साधू खलनायक . आणि याचा दुसरा भाग अजून शिल्लक आहे असे या चौघांचे मत होते ! त्यामुळे उद्या कृपया तुम्ही आमच्या सोबत चाला , आपण सर्वजण एकत्र जाऊ आणि जंगलामध्ये साधूचा सामना करू असे सर्वजण मला सांगू लागले . मी सर्वांना निक्षून सांगितले, नाही ! मला हे जमणार नाही .मी एकटाच चालणार .
आयुष्यामध्ये ज्याला नाही म्हणायला जमले त्याला खूप काही जमले . बरेचदा आपल्या आयुष्यामध्ये आपण केवळ नाही म्हणता येत नाही यामुळे अनेक अनावश्यक गोष्टी दुःखे भोगत राहतो . मी सर्वांना सांगितले माझा संकल्प एकट्याने चालण्याचा आहे तरी कृपया कोणीही माझ्यासोबत यायचा प्रयत्न करू नका . आणि राहिला प्रश्न साधूचा तर तो तुम्हाला काहीही करणार नाही कारण ज्याला करायचे असते त्याने आत्ताच केले असते .त्याच्यामध्ये हिम्मत असती तर आताच त्याने आपल्याला मारून टाकले असते . जो मनुष्य , उद्या भेट असे करीन ,तसे करीन ,  म्हणतो त्या माणसाला आज काहीही करता येत नसते . उद्याचे तर विसरूनच जा . रात्री पुन्हा एकदा नर्मदा मातेचा मंत्रजप ऐकत झोपी गेलो .
राम कुटीच्या मागच्या बाजूला एक बांधलेले शौचकूप होते . परंतु ते फक्त श्रीराम महाराजांसाठी होते . त्यामुळे पहाटे साडेतीन वाजताच घनघोर अंधारामध्येच कार्यक्रम उरकून घेतला .साधूने चिखलात फेकून दिलेली दुलई मला सापडली.पहिल्यांदाच एखाद्या हिंस्र श्वापदाने झडप घालण्याची भीती असलेल्या जागी बसलो होतो .कुछ जगह पर डर अच्छा होता है ! झटकन कार्यभाग आटोपून बर्फासारख्या थंडगार नर्मदा जलामध्ये मनसोक्त स्नान केले ! अमरकंटक भागामध्ये नर्मदेचे जल अतिशय थंड असते . त्यानंतर पूजा वगैरे आटोपून हे सर्व लोक उठण्याच्या आत निघून जाण्याचा माझा बेत होता . परंतु सर्वजण मी उठण्याची वाटच पाहत होते . साधूच्या भीतीने बहुतेक रात्रभर सारे जागेच होते ! अमरावतीचा बाबा तर रात्री एकदा आसपास चक्कर मारून आला की साधू कुठे दिसतो का ! तर त्याला म्हणे दूर जंगलातून घोरण्याचा आवाज आला ! मी एकटाच पुढे निघालो . आजचा दिवस अतिशय विशेष ठरणार होता ! आज नर्मदेने मला खूप मोठमोठ्या साधुसंतांना आणि विभूतीमत्वांना भेटवले . साधारण अर्धा किलोमीटर घनदाट अरण्य तुडविल्यावर मला समोर एका साधूची राहुटी दिसू लागली . एवढ्या जंगलामध्ये कोण राहिला आहे या उत्कंठेपोटी मी तिकडे गेलो .पिवळ्या रंगाच्या मेण कापडामध्ये झाकलेल्या या तंबू वजा झोपडीमध्ये सोमनाथ गिरी गोसावी नावाचा एक अवलिया साधू राहत होता . हे वनक्षेत्र असल्यामुळे इथे राहण्याची परवानगी कोणालाच नव्हती .बांधकाम करणे तर फारच लांबची गोष्ट .यावर तोडगा म्हणून सोमनाथ गिरी गोसावी यांनी एक मोठी लोखंडाची पेटी अथवा पेटारा बनवून आणला आणि त्यात तो राहू लागला ! 
सोमनाथ गिरी गोसावी यांची पेटी असलेली राहुटी
मी नर्मदे हर असा आवाज दिल्याबरोबर पेटीतून बाबा बाहेर आले . मला आत मध्ये बसण्याची सूचना त्यांनी केली . धावतच जाऊन ताजे ताजे नर्मदा जेल घेऊन आले आणि एक छोटीशी चूल पेटवून त्यावर त्यांनी चहाचे आधण ठेवले . चहा करता करता बाबा बोलू लागले ! यांचे आयुष्य म्हणजे एका साधूची कठोर तपस्या काय दर्जाची असू शकते याचा आदर्श वस्तूपाठच होता ! सुमारे तीन वर्षे बाबा इथे फक्त तुळस , कडुलिंबाची पाने आणि मैयाचे जल पिऊन एका पेटीमध्ये राहिले ! अगदी अमरकंटकच्या भयंकर पावसामध्ये सुद्धा त्यांनी आपला पेटारा सोडला नाही ! बाबा मूळचे पंढरपुर येथील होत . ५५ किलो वजनाचे शिवलिंग हातामध्ये घेऊन त्यांनी अकरा ज्योतिर्लिंगे पायी प्रवास केला होता ! बाराव्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यापूर्वीच त्यांना नर्मदे काठी येऊन राहण्याचा आदेश झाला .त्यांच्याशी नर्मदा मैया साक्षात बोलते . त्यांना पशु पक्षांची भाषा देखील कळते . आपल्या पेटीमध्ये त्यांनी चारही वेद ,सर्व उपनिषदे , तुकाराम गाथा ,ज्ञानेश्वरी ,दासबोध इत्यादी सर्व ग्रंथ ठेवलेले आहेत . जनार्दन स्वामी यांचे गुरु होत . जनार्दन स्वामी या नावाचे बरेच महात्मे भारतामध्ये झालेले आहेत .संत एकनाथांचे गुरु देखील जनार्दन स्वामीच होते .हे देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार होते .
संत एकनाथ महाराज यांचे गुरु जनार्दन स्वामी
ते निराळे .एक जटाधारी जनार्दन स्वामी होऊन गेले त्यांचे आश्रम संपूर्ण भारतभर आहेत .हेच सोमनाथ गिरी बाबांचे गुरु .
या जनार्दन स्वामींचे अनेक शिष्य परिक्रमा करतात व परिक्रमावासींची सेवा देखील करतात
अजून एक जनार्दन स्वामी नामे बडोदा येथे साक्षात्कारी दत्त संप्रदायिक सद्गुरु होऊन गेले . 
वाचकांचा गोंधळ होऊ नये म्हणून तिघांविषयी सांगितले.
साधू दिसती वेगळाले । परी ते स्वरूपी मिळाले ॥
असो .
एकदा वादळामध्ये एक मोठे झाड त्या पेटीवर कोसळले परंतु पेटीला काहीही झाले नाही . आता सुद्धा ती पेटी जंगलामध्ये तिथेच पडलेली आहे .माझे भाग्य चांगले की मला त्या पेटीमध्ये बसलेल्या सोमनाथ गिरी बाबांचे दर्शन झाले . पूर्वी कोणीतरी येऊन बाबांचा एक व्हिडिओ बनवून तो युट्युब वर टाकलेला आहे . तो अवश्य पहा असे बाबांनी मला सांगितले . त्या व्हिडिओमध्ये त्यांनी नर्मदा मैया प्रत्यक्ष येऊन त्यांच्याबरोबर कशी भोजन प्रसाद घेऊन गेली त्याचे वर्णन त्यांनी केलेले आहे .मी मोबाईल वापरत नाही तरी कृपया तुम्ही स्वतः तो अनुभव सांगाल तर अधिक बरे अशी मी त्यांना विनंती केली परंतु त्यांनी मला व्हिडिओच बघण्याची शिफारस केली . मला सध्या खूप शोध घेऊनही तो व्हिडिओ काही सापडला नाही . कोणाला सापडल्यास कृपया कळविण्याचे करावे .
बाबांचे एक यूट्यूब चैनल नवीनच सुरू केलेले आहे .सध्या बाबांनी आपली पेटी सोडून पुन्हा एकदा सायकलवरून नर्मदा परिक्रमा सुरू केलेली आहे .
 सायकल परिक्रमेमध्ये कठीण पूल पार करताना सोमनाथ गिरी बाबा
त्या परिक्रमेचे व्हिडिओ आपल्याला बाबांच्या चॅनेलवर पाहायला मिळतील .चॅनेल ची लिंक इथे पहा .
बाबांच्या रिकाम्या पडलेल्या पेटीचे रक्षण एक नाग येऊन करत आहे असा अनुभव परिक्रमावासींना अलिकडेच आला . 
बाबांच्या बंद असलेल्या पेटीचे दर्शन घेणारे परिक्रमावासी , रक्षण करणारा नागोबा आणि पेटीवर पडलेले अवाढव्य झाड ( २०२३ चे दृश्य )

मी बाबांच्या पेटीच्या आत जाऊन पाहिले .पेटी पूर्णपणे लोखंडाची असल्यामुळे बर्फासारखी गार पडली होती .विशेषतः पेटीच्या एका बाजूला बाबांनी कापड पोते वगैरे लावले होते ती बाजू गरम होती . परंतु पेटीच्या दुसऱ्या बाजूला काहीही लावले नव्हते ती बाजू फ्रीज मधल्या फ्रिझर सारखी गार होती ! त्या पेटीमध्ये झोपून पहा असे बाबांनी मला सुचवले . मला अक्षरशः मी शेवपेटीमध्ये झोपल्याचा अनुभव आला इतकी ती पेटी गार होती . या घनघोर जंगलामध्ये त्या पेटी शिवाय पर्यायच नव्हता . बाहेर झोपले की वाघाने उचललेच म्हणून समजा ! माझ्याजवळ एकांनी दिलेली अतिशय उंची शाल होती . अस्सल पश्मिना लोकरीची असल्यामुळे त्या शालीला प्रचंड ऊब होती . मी ती शाल बाबांना दिली . त्यांनी देखील मोठ्या आनंदाने तिचा स्वीकार केला . आणि आपली एक जुनी शाल त्यांनी पेटीच्या मोकळ्या बाजूला लावून तिथून येणारी थंडी थोपवली. आणि माझी शाल पांघरून झोपेन असे मला सांगितले . मला असे लक्षात आले की बाबांनी आरडाओरडा केला तरी जवळपास कुठेही ऐकू जाणार नाही . परंतु जर त्यांनी शंखनाद केला तर किमान राम कुटीपर्यंत आवाज जाईल . पूर्वी मी आपल्याला सांगितले होते की कटंगी येथील तेजी बाबा नामक नागा साधूने मला एक शंख दिला होता . तो शंख देखील त्यामुळे मी बाबांना अर्पण केला . बाबांनी शंख वाजवून पाहिला .त्यांना शंखाचा आवाज खूप आवडला . आता हा शंख कायम माझ्या शिवपुजेमध्ये राहील असे त्यांनी मला सांगितले . मला दुहेरी आनंद झाला . एक तर बाबांना काही मदत केल्याचा आनंद आणि दुसरे म्हणजे धाड करून पाठीवरील वजन कमी झाल्याचा परमानंद! 
( ता. क . : नुकतीच सोमनाथ गिरी बाबांनी केवळ नर्मदा जल आणि दूध पीत निराहार दंडवत नर्मदा परिक्रमा सुरू केलेली आहे . त्यांनी कुठून तरी आपले यूट्यूब चॅनल पाहून संपर्क केला ! खूप आनंद वाटला ! बाबांशी संपर्क करण्यासाठी क्रमांक खालील प्रमाणे . 79991 82662 ) 
इतक्यात मला मागून येणाऱ्या त्या चौघांचा कानोसा लागला म्हणून मी पटकन उठलो आणि बाबांचा निरोप घेतला . तरीदेखील ते चौघे मला वाटेत भेटलेच ! सोमनाथ गिरी बाबा जिथे राहत होते त्या ठिकाणी नर्मदा मातेचे एक अतिशय धोकादायक रूप होते . म्हणजे पाणी खोल वगैरे असे काही नाही परंतु तिथे नर्मदा मैया इतकी छोटी आहे आणि ग्रामस्थांनी इकडून पलीकडे जाणारा एक रस्ता नर्मदेच्या पात्रातून बनविला आहे ,त्यामुळे बहुतांश परिक्रमावासींची परिक्रमा त्या ठिकाणी खंडित होते ! सोमनाथ गिरी बाबांनी आजपर्यंत अनेकांची परिक्रमा खंडित होण्यापासून वाचविली आहे असे त्यांनी मला सांगितले . आता मात्र अतिशय घनदाट अरण्य प्रदेश सुरू झाला होता . इथून थोडेसे पुढे काठाने गेल्यावर पंचधारा नामक स्थान लागते . इथे समोरच्या तीरावर ज्ञानेश्वरी कुटी नामक एक छोटीशी कुटी दिसते . इथे महान संत रामदास महाराज बसलेले असले तर त्यांचे अद्भुत दर्शन समोरच्या तटावरून घडते ! या महाराजांविषयी लिहिण्यासाठी शब्द अपुरे आहेत .त्यांच्याकरता स्वतंत्र काही प्रकरणे खर्ची घालावी लागणार आहेत ! ते भविष्यात वाचूच . तूर्तास मला महाराज न दिसल्यामुळे आम्ही पुढचा मार्ग धरला . जंगलातून वन्य श्वापदांचे आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत होते . एक मोठा डोंगर चढून आपल्याला अमरकंटक कडे जावे लागते . या डोंगरावरील पायवाट आपण जरा जरी चुकलो तरी अतिशय घनघोर अरण्यामध्ये भटकण्याचा संभव असतो . त्यामुळे मळलेली पायवाट अजिबात सोडू नये असा इथला दंडक आहे . अर्थात इथे पायवाट म्हणजे जमीन दिसतच नाही तर खाली पडलेला पालापाचोळा जिथे तुडवला गेला आहे तीच मळलेली पायवाट असे समजायचे . पाय पडल्यामुळे पालापाचोळा कोरा करकरीत न राहता त्याचा चुरा होतो . असा चुरा झालेला पालापाचोळा म्हणजेच मळलेली पायवाट . बराच वेळ घनदाट अरण्यातून चालत होतो . मी डोंगरावरून चालत होतो आणि त्या डोंगराच्या पायथ्याशी अतिशय बालरूपातील नर्मदा वाहताना अखंड दिसत होती ,ऐकू येत होती . त्या डोंगरावरून खाली उतरता येणे जवळपास अशक्य होते इतकी झाडी घनदाट होती . आणि नर्मदेच्या काठाने तर रस्ता नावाचा पदार्थ अस्तित्वाला देखील नव्हता . त्यामुळे आहे त्या पायवाटेने चालणे क्रमप्राप्त होते . मध्ये मध्ये दगड मातीतच काही पायऱ्यांसारखे खोदलेले भाग लागत होते . परंतु या संपूर्ण भागात मानवी वावर अतिशय कमी असावा हे जाणवत होते . अखेरीस दूध धारा लागली . आता मात्र आधुनिक कपडे घातलेल्या शहरी पर्यटकांची वर्दळ दिसू लागली . आणि अचानक समोर मोठा आवाज करत धडाधड कोसळणारी कपिलधारा दिसली ! कपिलधारा हा नर्मदेचा एक धबधबा असून अमरकंटकच्या डोंगरावरून खालील दरीमध्ये ती याच ठिकाणी झेपावते . मी अगदी जवळ जाऊन त्या जलप्रपाताचे दर्शन घेतले . इथे बाहेरच्या लोकांची फारच गर्दी होती आणि त्यांना परिक्रमावासींशी काही देणे घेणे नव्हते . सर्वजण आपल्याच छछोरपणामध्ये मश्गुल होते . सेल्फी काढणाऱ्या कॉलेज युवक युवतींचा तर महापूर लोटला होता . परिक्रमेमध्ये पहिल्यांदाच इतके आधुनिक लोक पाहायला मिळाले आणि सत्ययुगातून एकदम कलियुगात आल्यासारखे झाले ! परंतु हेच अमरकंटकचे प्रवेशद्वार होते ! 



लेखांक पंचवीस समाप्त (क्रमशः )

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर