लेखांक ३५ : नर्मदेने सिद्ध / शिवालय घाटावर दिला पोलादी चिमटा
माझिया खार गावामध्ये ग्रामस्थांनी मिळून एक सुंदर छोटेखानी धर्मशाळा बांधलेली आहे . अगदी नर्मदा मातेच्या काठावर ही धर्मशाळा आहे . धर्मशाळा म्हणजे एकच मोठी खोली त्याच्या एका कोपऱ्यामध्ये शेगडी मांडलेली आणि एका बाजूला स्वयंपाकाचे सर्वसामान ठेवलेले आहे . इथे परिक्रमा वासींना सदाव्रत दिले जाते . म्हणजे शिधा दिला जातो व आपण स्वयंपाक करून खावे लागते . नर्मदेच्या उगमाजवळ शिधा जास्त मिळतो .समुद्राच्या दिशेने जाता जाता तयार भोजन मिळण्याचे प्रमाण वाढत जाते . नर्मदेच्या पाण्याच्या प्रमाणात संपन्नता सर्वत्र वाढत गेलेली आढळते त्याचा इथे थेट संबंध असावा ,असो. मला गावातील एका छोट्या मुलाने या धर्मशाळेपर्यंत आणून सोडले . नर्मदा खंडातील छोटी मुले अतिशय बिनधास्त ,हुशार आणि चुणचुणीत आहेत . घरातील सुखसोयींमध्ये वाढलेल्या लाडावलेल्या शहरी मुलांच्या तुलनेत त्यांचा उजवेपणा लगेच लक्षात येतो . असो . या धर्मशाळेची किल्ली एका दुकानदाराकडे असते असे कळले . मग मी त्या दुकानामध्ये गेलो असता त्याने मला अजून काही शिधा हवा आहे का असे विचारले . मी त्याला ,बघून सांगतो असे उत्तर दिले आणि किल्ली घेऊन धर्मशाळा उघडली . आसन लावले आणि नर्मदे वरती स्नानाला गेलो . मातीचा उतार उतरल्या उतरल्या नर्मदेचे सुंदर स्वच्छ पात्र खुणावत होते . त्या उतारावरच एका साधून छोटीशी झोपडी बांधली होती आणि तिथे तो धूनी लावून बसला होता . इथे उजव्या हाताला बसंतपुर गावाला जोडणाऱ्या एका पुलाचे काम अर्धवट स्थितीमध्ये पडलेले दिसून येत होते . इथे नर्मदेचे पात्र अत्यंत उथळ असल्यामुळे दुचाकी गाडी घेऊन किंवा चार चाकी घेऊन लोक इकडून तिकडे जातात .या परिसराचे गुगल नकाशावर मिळालेले काही फोटो आपल्या माहितीकरता जोडत आहे .
माझिया खार गावातून होणारे नर्मदा दर्शन
माँ नर्मदा आदर्श धर्मशालेचे बाहेरून काढलेले छायाचित्र
तळातील प्रत्येक वस्तू स्पष्ट दिसेल असे स्वच्छ नितळ नर्मदा जल
प्रचंड थंडी पडलेली होती परंतु थंडगार नर्मदा जलाने अंघोळ केल्यामुळे थंडी फारशी वाजत नव्हती . तशाच उघड्या अंगाने बसून मी माझे नर्मदा मातेचे पूजन करून घेतले . इतक्यात मघाशी किल्ली दिलेला दुकानदार ताजे शेतातले मटार , बटाटे ,टोमॅटो , कोथिंबीर आणि पीठ इत्यादी सामान देऊन गेला . मी स्वयंपाकाला लागलो . कणिक मळून ठेवली आणि भाज्या चिरून मस्तपैकी ताजी ताजी मटार घातलेली बटाटा भाजी तयार केली . समोर साधू राहत आहे हे मी पाहिले होते त्यामुळे त्याच्या नावचे भोजनदेखील मी बनवून ठेवले . मला दुकानदार सांगून गेला होता की हे फक्त तुमच्या एकट्यासाठी आहे अजून कोणाला देऊ नका वगैरे वगैरे . परंतु साहित्य भरपूर होते आणि त्यामध्ये आम्ही दोघे आरामात जेवलो असतो . साई इतना दिजीये । जा मे कुटुंब समाय । मै भी भु खा ना रहू ।साधू न भूखा जाय ॥ हा संत कबीरांचा दोहा मला त्याक्षणी स्मरला आणि त्यामुळे मी दोघांचा स्वयंपाक करून ठेवला . गरम गरम पोळ्या करून खाल्ल्या आणि चार-पाच पोळ्या व भाजी साधूला नेऊन दिली . साधूला खूप भूक लागली होती त्याने देखील मोठ्य आनंदाने तो प्रसाद ग्रहण केला . हा जुना आखाड्याचा भारती स्वामी नाव लावणारा एक साधू होता . इकडे मला भेटायला गावातील काही मंडळी आली . त्यांनी कोपऱ्यात झाकून ठेवलेला ढोलक पेटी वगैरे काढली . मग आम्ही सर्वांनी मिळून तास दोन तास मस्तपैकी भजन केले . इथे उत्तम गाणारे लोक आढळून येतात . रात्री थंडी पडू लागली तसे ग्रामस्थ मला विचारू लागले की माझ्याकडे थंडीसाठी काय समान आहे .माझ्याकडे केवळ एक शाल होती ते पाहिल्यावर त्यांनी ताबडतोब पेटारा उघडला आणि त्यातून दोन नवी कोरी ब्लॅंकेट काढून मला दिली . खरे तर एक ब्लॅंकेट पुरेसे होते परंतु हलकीफुलकी असल्यामुळे आणि परिक्रमेच्या नियमानुसार नाही म्हणता येत नसल्यामुळे मी दोन्ही ब्लॅंकेट मुकाटपणे स्वीकारली . ही ठेवण्यासाठी माझ्या झोळीमध्ये जागा नव्हती त्यामुळे मी ती बाहेरच्या बाजूला लटकवून ठेवीत असे .कारण थंडीमुळे अमरकंटकच्या जंगलात लागलेली वाट माझ्या चांगली लक्षात होती ! थंडीमुळे वाट लागण्यापेक्षा पाठीवर ओझे झाल्यामुळे वाट लागलेली फार बरी !
ही माझी परिक्रमेतली झोळी होती
त्याच्या एका बाजूला माझी स्टायरोफोमची गादी मी अशी लटकवून ठेवत असे . तशी सोयच शिंप्याकडून करून घेतली होती . (वरील छायाचित्र नर्मदा मातेच्या उत्तर तटावर चौथ्या दिवशी काढलेले आहे )
काही केल्या ती दोन ब्लॅंकेट झोळी मध्ये बसली नसती .त्यामुळे मी ती अशा पद्धतीने बाहेर बांधायला सुरुवात केली . गमछा , लंगोटी वाळवण्यासाठी बाहेर बांधलेली असायचीच .आता त्यात या दोन ब्लँकेटची भर पडली .
एक निळसर तर एक गुलाबी होते .
या ब्लँकेटस् नी मला पुढे ओंकारेश्वर पर्यंत साथ दिली .
सकाळी अंधारामध्येच उठून सर्व आन्हिके आटपली . थंडगार नर्मदा जलाने स्नान करून पूजा अर्चा करून निघालो . आज विनायकी चतुर्थी असल्यामुळे नर्मदेमध्ये स्नानासाठी मुलांचे जथेच्या जथे येताना दिसले . तशी परंपरा या भागामध्ये आहे असे माझ्या लक्षात आले .जिकडे पहाल तिकडे शेकडो मुले नर्मदेमध्ये उड्या मारून स्नान करत होती .हिरवी शांत आणि धीर गंभीर भासणारा नर्मदा किनारा आज मुलांच्या कलकलाटाने गजबजून गेला होता . छोटी छोटी मुले जाताना नर्मदे हर चा आवाज देत होती .त्या प्रत्येकाला तितक्याच उत्साहाने नर्मदे हर म्हणून प्रत्युत्तर द्यावे लागत होते ! परंतु त्यातही एक वेगळा आनंद होता ! तितक्या वेळा वैखरीमध्ये नर्मदेचा जयजयकार आपल्या मुखातून घडत होता ! आज पुन्हा एकदा संपूर्ण प्रवास नर्मदा मातेच्या काठाकाठाने केला .
चालताना मध्ये तुलसी घाट नावाचे एक रमणीय ठिकाण लागले . इथे मैया फार सुंदर दिसते . अक्षरशः निळेशार पाणी दिसते !
इथे घाटावरील दर्शने करून पुढे निघालो असता एक तरुण मुलगा काठावरती आपले सॅंडल काढून नर्मदा मातेमध्ये पोहत होता . मला पाहताच तो बाहेर आला आणि पाया पडला . कोणीही पाया पडले की आपण फिरून त्याच्या पाया पडायचे या नियमाप्रमाणे मी देखील त्याच्या पाया पडलो . परस्परो देवो भव ! थंडीने गारठत असल्यामुळे मी हातमोजे , थर्मल , कानाला फेटा , पायात मोजे वगैरे घालून चालत होतो . आणि एवढ्या प्रचंड थंडीमध्ये हा निवांत उघडा पोहत होता . मला म्हणाला बाबाजी आपका एक फोटो लेता हु । टॉवेल ला हात पुसत त्याने कानटोपी मध्ये ठेवलेला आपला मोबाईल उचलला आणि काठावर उभे करून माझे फोटो काढले . माझ्याकडे फोन नाही कळल्यावर माझ्या मित्राच्या क्रमांकावर त्याने फोटो पाठवून दिले .
इथे मैयाचे पाणी अतिशय खोल , धीर गंभीर , शांत , आणि निवळ शंख परंतु गतिमान होते . पुढे चालायला सुरुवात केली . काठाकठाने महत्प्रयासे चालत राहिलो .
शेती ओढे नाले दगड धोंडे पार करत दुपारी तीनच्या सुमाराला शिवालय घाटावर पोहोचलो . शक्यतो दुपारी बारा ते एक फार फार तर दीड वाजेपर्यंतच भोजन प्रसाद मिळतो . त्यानंतर आश्रमातील लोक विश्रांती घेत असतात .मला मध्ये कुठेही मंदिर आश्रम घर काहीच न लागल्यामुळे मी चालत राहिलो आणि भुकेने बऱ्यापैकी व्याकुळ झालेलो होतो . मनामध्ये विचार करू लागलो की आज बहुतेक मैया चतुर्थीचा उपास घडविणार ! आज काही आपल्याला जेवण मिळत नाही , इतक्यात दुबे नावाचा एक अतिशय गरीब ब्राह्मण धावत माझ्यासमोर आला . हात जोडून त्याने त्याच्या झोपडीमध्ये येण्याची विनंती मला केली . मला अतिशय आनंद झाला आणि मी त्याच्या मागोमाग त्याच्या झोपडीमध्ये गेलो . अगदी शिवालय घाटावरच त्याने छोटीशी झोपडी उभी केली होती . अंगणामध्ये त्याने मला जेवायला बसवले . थंडीमध्ये उन्हात बसून जेवायला छान वाटत होते . त्याने ताट वाढून आणले ते पाहिले मात्र माझे डोळेच चक्रावले ! त्याने चक्क पंचपक्वान्ने वाढून आणली होती ! मी त्याला विचारले की एवढ्या उशिरा ही पक्वान्ने कशी काय केली ? तो म्हणाला की आज मैयाला पाच पक्वान्ने करून खाऊ घालावीत अशी मला इच्छा झाली . त्याप्रमाणे नैवेद्य दाखविला . दुपारी एक परिक्रमावासी आला सुद्धा परंतु तो आजारी पडलेला आहे त्यामुळे त्याने काहीच खाल्ले नाही आणि झोपून आहे . परिक्रमा वासी जेवल्याशिवाय आम्ही नवरा बायको जेवत नाही त्यामुळे तुम्ही आलात फार बरे झाले ! मला त्याचे फार कौतुक वाटले ! इतकी गरिबी असून देखील परिक्रमा वाशी जेवावा यासाठी त्याची तळमळ वाखाणण्याजोगी होती . मी पटापट सर्व ताट चाटून पुसून साफ केले . दोघेही पती-पत्नी अतिशय आनंदी झालेले जाणवत होते . हात धुतल्यावर मी माझ्या जवळ असलेले पन्नास रुपये त्याला देऊ लागलो . परंतु त्याने ते अजिबात घेतले नाहीत . शेजारीच एक देवाचे स्थान त्याने मला दाखविले . मी गुपचूप आत मध्ये गेलो आणि देवा पुढे ते पैसे ठेवून दिले . कारण ती व्यक्ती खरोखरच खूप गरीब आहे हे सर्वच लक्षणांवरून कळत होते . आत मध्ये कुठला परिक्रमावासी आजारी आहे ते बघायला गेलो असता बाहेर ओळखीच्या लाल सँडल दिसल्या . हा तोच परिक्रमावासी होता ज्याला मी समोरच्या तटावर मला मिळालेले सॅंडल दिले होते . तो तापाने चांगलाच फणफणला होता त्यामुळे मागे पडला होता .सोनू शर्मा असे त्याचे नाव होते आणि तो दोन दिवस इथेच झोपून होता . त्याने मला या सिद्ध घाटाचे व समोरच्या शिवालय घाटाचे महत्त्व सांगितले . या बाजूला सिद्ध घाट आणि समोर शिवालय घाट होता . या घाटाचे महात्म्य असे की इथे स्वतः नर्मदा मातेने तपश्चर्या करून शंकराचे दर्शन प्राप्त केलेले होते . नर्मदेच्या उथळ पात्रामध्ये इथे अनेक शिवमंदिरे बांधलेली दिसत होती . सोनू शर्मा म्हणाला की इथे एक हजार शिवलिंगे स्थापित केलेली आहेत . म्हणून याला शिवालय घाट असे म्हणतात . व इथेच नर्मदा सिद्ध झाली म्हणून हाच सिद्ध घाट . हा घाट मोठा पवित्र असून याचे दर्शन नक्की घे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी माझे सर्वसामान उचलले आणि सिद्ध घाट गाठला . समोरच्या शिवालय घाटावर मी मोहन साधू सोबत मुक्काम केलेला होता . इथे पात्र अतिशय रुंद झालेले आहे . आणि नर्मदा एक मोठे वळण घेते आहे . इथे सिद्ध घाटाच्या बाजूने गाळ मातीच होती . बांधलेला घाट फारसा नव्हता . हळूहळू मी नर्मदा जलामध्ये शिरू लागलो असता एक चमत्कार घडला . माझ्या पायाला जोरात काहीतरी टोचले . म्हणून मी पाय फुटभर पुढे टाकला तर तिथे देखील पुन्हा काहीतरी जोरात टोचले .दोन्ही वेळी टोचणारा पदार्थ एकसारखा आहे असे मला जाणवले म्हणून मी कुतूहलाने पायाखाली काय आहे ते पाहिले .तर तो एक चिमटा होता ! नागा साधू सदैव सोबत बाळगतात तो चिमटा मला मैयाने दिला ! हा चिमटा अतिशय जुना होता हे त्याच्या धातूकडे पाहून कळत होते . मला धातुशास्त्राची अत्यंत आवड असून ओतकाम वगैरे करून पाहायला मला आवडते . त्यामुळे मी लगेच त्या धातूची परीक्षा करून घेतली . ते एक उत्तम दर्जाचे पोलाद होते . चिमट्याला दोन टोकदार बाण होते . आणि तीन लोखंडी कड्या त्याला अडकवलेल्या होत्या .मला एक क्षणभर कळेना की हा चिमटा घ्यावा की पुन्हा नर्मदेमध्ये अर्पण करावा . इतक्यात तिथे एक माणूस आला आणि मला म्हणाला " मैया का प्रसाद है ।साथ मे रखो । " आणि निघूनही गेला . मी त्या चिमट्याकडे अनिमिष नेत्राने पाहत राहिलो .
मला मैय्याने साधू बनण्याचा आदेश तर नाही ना दिला ? असा अचानक चिमटा मला कसा काय दिला ? या चिमट्याचे फार महत्त्व साधू जीवनामध्ये असते . हा चिमटा गुरु शिष्याला देत असतो . याचा वापर अनेक गोष्टींसाठी केला जातो . सर्वात महत्त्वाचा वापर म्हणजे ते एक टोकदार हत्यार आहे . त्याने लाकडे फोडता येतात . वाटेतील काटे कुटे उचलता येतात . माती खणता येते .आगीतील लाकडे निखारे बाहेर काढता येतात . टिक्कड , पोळ्या उलटता पालटता येतात . चिमट्याचे दोन दात अथवा हात एकमेकांवर आपटून सुंदर असे भजन करता येते . भजन करण्यासाठी कधी कधी या चिमट्याला खंजिरीप्रमाणे चकत्या लावलेल्या असतात .अशी अनेक कामे या एका हत्याराने होत असतात . त्यामुळे साधू जीवनामध्ये या चिमट्याला फार महत्त्व असते . कुठेही गेल्या गेल्या साधू सर्वप्रथम हा चिमटा धुनी मध्ये खोचून उभा ठेवत असतो .या चिमट्याला त्याचे तोंड बंद करण्यासाठी लॉकिंग मेकॅनिझम सुद्धा असते .
साधूचे आणि चिमट्याचे अविभाज्य नाते दर्शविणारी काही संग्रहित छायाचित्रे
मी बराच वेळ तो चिमटा हातामध्ये घेऊन तिथे नर्मदा जलामध्ये उभा राहिलो .परंतु तो चिमटा सोबत ठेव असे त्या माणसाने सांगितल्यामुळे मी तो स्वच्छ घासून पुसून चकाचक चमकवीला अन पिशवीमध्ये टाकला आणि पुढे चालू लागलो . थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले की हा चिमटा पिशवी फाडून बाहेर येतो आहे . मुळात साधूंचा तापट स्वभाव माहिती असल्यामुळे हा चिमटा हातामध्ये घेऊन फिरता येणे खूप अवघड होते . हा चिमटा तुला कोणी दिला किंवा हा चिमटा घेण्याचा तुला काय अधिकार ? असा नवीन वाद उत्पन्न होऊ नये म्हणून मी तो चिमटा एका उपरण्यामध्ये गुंडाळून झोळीच्या तळाशी अक्षरशः लपवून ठेवला ,तसेच त्याच्याबद्दल कोणालाही काहीही सांगणार नाही असे मी ठरवले . जेव्हा मैयाचा आदेश येईल तेव्हा पुढचे काय ते ठरवू असे डोक्यात ठेवले आणि काठ पकडून चालायला लागलो .
दरम्यान आता आपल्याला दाखवण्यासाठी मी गूगल नकाशावर सिद्धघाट शोधला तर तिथे आता ती झोपडी दिसत नाही आहे !
लेखांक पस्तीस समाप्त ( क्रमश:)
मागील लेखांक
पुढील लेखांक
आवडला. मी एक मा.बो.कर आहे...
उत्तर द्याहटवाNamaskar! Maaybolivarun ya blogchi link milali . Attaparyantche sagale bhag vachun kadhale. Tumache likhan agadi chitradarshi aahe. Tumachi dolaspane keleli parikrama avadali. Maiyavarchi shradha distech aahe pan tyabarobar aajubajuchya gavatil paristhitiche bhanhi shakya hoil tithe dile aslyane jasta avadate aahe vachayla. Pudhil lekhanasathi shubhechha!
उत्तर द्याहटवापुढच्या भागावर जा
उत्तर द्याहटवा