लेखांक १७३ : अविरत श्री नर्मदा परिक्रमा
पहाटे पाचलाच उठून चालायला लागलो ! मध्ये एक गमतीशीर घटना घडली . मी किनारा पकडून चालायचो . म्हणजे एक पाय ठेवायला जागा मिळेल अशा कुठल्याही जागी पाय ठेवायचा आणि चालत राहायचे . दंड मैय्यामध्ये बऱ्यापैकी बुडलेला असायचा . तिचा दंड बुडवल्यावर येणारा आवाज म्हणजे ती माझ्याशी संवाद साधते आहे असा माझा भाव असायचा . असाच एक अतिशय धोकादायक तिरका किनारा मी चालत असताना अचानक समोर एक कोळी आला ! म्हणजे तो या कठीण जागी बसून मासे धरत होता . आणि मोबाईल ने शूटिंग करत होता किंवा फोटो काढत होता . अचानक मी आलेला पाहून तो दचकला आणि पटकन कॅमेरा माझ्याकडे करून त्याने माझा फोटो काढला ! मला म्हणाला बाबाजी यहा कहा भटक गये? मी त्याला म्हणालो , "भटक कहा गये प्रभू ! यही तो असली रास्ता है ! " "यह रस्ता थोडी ना है ! " "यही रास्ता है बंधू ! माईका किनारा छोडना नही है बस ! " कोळी खुश झाला . मला म्हणाला या रस्त्याने जाताना कोणाला पाहिले नाही . मी त्याला म्हणालो या जगात बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा होतात ! आणि नर्मदा मातेने प्रत्येकाचा रस्ता आखून दिलेला आहे ! माझ्यासाठी हा मार्ग ठेवलाय ! म्हणून मी या ...