लेखांक ६० : व्रतस्थ नाईकबुवा रामदासी आणि उधळलेल्या राणी घोडीला घातलेले रेवास्नान

चितळे मैया यांचा आश्रम सोडून जाता जाता त्यांनी सांगितले की पुढे शमशाबाद गावामध्ये एक रामदासी बुवा १३ कोटी रामनामाचा जप करत बसलेले आहेत .त्यांचे दर्शन अवश्य घेऊन जा . हे ध्यानामध्ये ठेवून काठाकाठाने मार्गक्रमणा सुरू ठेवली . मैया काठी एका छोट्याशा दहा बाय दहा आकाराच्या कुटीमध्ये पिंपरी चिंचवड येथील मूळ रहिवासी असलेले नाईक बुवा रामदासी म्हणून एक आहेत . ते १३ कोटी रामनाम जपाच्या अनुष्ठानासाठी बसलेले होते . यांचे मौन अनुष्ठान होते . म्हणजे दिवसभर ते रामनामाचा जप करीत त्या काळात बोलत नसत . सायंकाळी साडेसात नंतर त्यांचे मौन समाप्त होत असे . रामदासी बुवा गोरेपान आणि तेजस्वी होते . एकूण तपश्चर्येमुळे झळकणारे तेज त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होते . मी आत मध्ये जाण्यापूर्वी दारात उभे राहून नर्मदे हर !जय जय रघुवीर समर्थ !  असा पुकारा केला .त्यांनी खुणेनीच मला आत येण्याचा इशारा केला . झोळी उतरवली आणि त्यांना दंडवत प्रणाम केला . त्यांनी शेजारी बसण्यासाठी आसन लावायची सूचना केली . समोर सातारा येथील गोंदवले गावातील थोर संत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची तसबीर लावलेली होती . शेजारी श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांचा फोटो होता . तसेच आनंद सागर महाराज यांची देखील प्रतिमा होती . या तीनही संतांनी नर्मदे काठी तपश्चर्या केलेली आहे . विशेषतः रामदासी संप्रदायातील एक प्रमुख संत म्हणून गणले गेलेले गोंदवलेकर महाराज हे त्यांच्या नाम प्रेमासाठी प्रसिद्ध आहेत . अलीकडच्या काळामध्ये संपूर्ण भारतभर फिरून रामनामाचा प्रचार केलेला त्यांच्यासारखा दुसरा संत सापडणे कठीण आहे . कोणीही काहीही सल्ला मागितला तरी केवळ नाम घ्या असे एकच उत्तर महाराज देत असत .समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या बालपणी नाशिक जवळच्या टाकळी येथे कठोर तपश्चर्या करून तेरा कोटी रामनामाचा जप पूर्ण केला होता व तो जप सिद्ध झाल्यावर साक्षात प्रभू रामचंद्रांनी त्यांना दर्शन दिले ,अशी समकालीन कागदपत्रांमध्ये नोंद आहे . त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी तुला हवा तो वर माग असे सांगितल्यावर रामदास स्वामी म्हणाले होते "जप होता तेरा कोटी । साक्षात भेटेल जगजेठी "  असा आशीर्वाद किंवा असे अभिवचन आम्हाला द्या . अर्थात जो कोणी १३ कोटी रामनामाचा जप पूर्ण करेल त्याला रामरायाने दर्शन द्यावे असे ते मागणे होते आणि त्यानंतर त्याप्रमाणे खरोखरच अनेक साधकांनी १३ कोटी रामनाम जप पूर्ण करून प्रभू रामाचे दर्शन मिळविलेले आहे . नाईक बुवा मौनामध्ये असल्यामुळे आता निघावे असा विचार करून मी उठू लागलो . त्यांनी मला खुणेनेच बसण्याचा इशारा केला . 
बाहेर काही माणसे गप्पा मारत बसली होती . बुवांनी घंटा वाजवल्याबरोबर त्यातील एक माणूस पळत आला . त्याला रामदासी बुवांनी चहा करण्याची सूचना खुणेने केली . त्याने लगेच बाहेर तीन दगड मांडून चूल पेटवून आतून पातेले नेऊन मस्तपैकी तीन चार कप काळा चहा बनवला . सकाळची थंडी पडलेली होती त्यामुळे तो चहा खूपच आवश्यक होता ! चहा पिऊन झाला आता निघावे म्हणून मी उठू लागलो तर बुवांनी मला पुन्हा एकदा बसण्याची सूचना केली . मी इथे कित्येक तास बसू शकलो असतो परंतु महाराज मौन असल्यामुळे बसून करायचे काय असा मुख्य प्रश्न माझ्यापुढे होता .  मी महाराजांना विचारले की आपली हरकत नसेल तर श्रीक्षेत्र गोंदवले इथे उपासनेमध्ये गायली जाणारी काही भजने गाऊ का ? नुसते गोंदवले असे नाव काढल्याबरोबर त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले . त्यानंतर मग मी गोंदवलेकर महाराजांच्या समाधीसमोर म्हटली जाणारी सर्व भजने म्हटली . या ब्रह्मचैतन्या सारिखा नाही पाहिला , दीन हाका मारी , स्वामी माझा पाहिला या माणगंगा तीरी , धन्य जगी या गुरुवर्य हे मारुती अवतार अशी सर्व प्रसिद्ध पदे म्हणून झाल्यावर महाराजांची आरती देखील म्हटली . नाईक बुवा रामदासी मौनामध्ये होते . परंतु डोळ्यांचे मौन नसल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून गंगा जमुना अखंड वाहत राहिल्या .
साधारण दीड तास झाल्यावर त्यांनी घड्याळाकडे पाहिले आणि आता तू निघू शकतोस अशी सूचना मला खुणेने केली . जाण्यापूर्वी त्यांनी स्वस्ताक्षरात त्यांचा संपर्क क्रमांक माझ्या वहीमध्ये लिहून दिला . आता हरदा जिल्हा सुरू झालेला होता . मी अतिशय वेगाने पुढे निघालो . मौनामध्ये असलेल्या माणसाशी आपण काय बोलणार परंतु असे असून देखील इथे दीड तास मोडलाच आहे त्यामुळे पुढे वेगात चालून ते अंतर तोडावे असा साधा विचार डोक्यात चालू होता . काठाकाठाने निघालो होतो . वाळूचा किनारा , मग मातीचा , मग चिखलाचा असे क्रम सुरू होते . आता मी गोयत नावाच्या गावाच्या हद्दीमध्ये पोहोचलो होतो . इतक्यात माझे लक्ष दूरवर साधारण २०० मीटर अंतरावर चाललेल्या एका घटनेने वेधले . उजव्या हाताला शांतपणे वाहणारी नर्मदा माई होती तर डाव्या हाताला गोयत गावाकडे जाणारा मातीचा मोठा चढ होता . या चढावरून एक इसम घोड्यावर बसून त्या घोड्याला खाली आणण्याचा प्रयत्न करत होता . आणि घोडा प्रचंड उड्या मारत त्या इसमाला खाली पाडण्याचा प्रयत्न करत होता . घोड्याची एकंदर देहबोली पाहिल्यावर माझ्या असे लक्षात आले की हा घोडा काहीही करू शकतो . त्यामुळे मी धावतच त्या दिशेला निघालो . आवाजाच्या टप्प्यात आल्यावर मी त्या माणसाला आवाज देऊ लागलो . त्याने माझ्याकडे पाहिल्याबरोबर घोडा देखील माझ्या दिशेला वेगाने धावू लागला . घोडा अतिशय संवेदनशील प्राणी असतो . वरती बसलेला घोडेस्वार ज्या दिशेला मान वळवेल त्या दिशेला घोडा देखील वळतो इतका त्याच्या पाठीचा कणा संवेदनशील असतो . या घोड्याला नर्मदे कडे जायचे नव्हते हे मला स्पष्ट दिसत होते . आणि मालकाला घोड्याला वरती जाऊ द्यायचे नव्हते हे देखील त्याला कळले होते . त्यामुळे मध्यम मार्ग म्हणून घोडा माझ्या दिशेने आला . मी दंड लपवला आणि पटकन पुढे जाऊन त्याचा लगाम धरला . मी लगाम धरल्या धरल्या वरच्या माणसाने उडी मारली आणि मला म्हणाला आता तुम्हीच हिला सांभाळा ! मी थकलो ! घोडीवर बसलेला उघडा बंब मनुष्य घामाघूम झाला होता !  घोडी अजूनही उधळलेलीच होती . मी तिला हळू हळू शांत केले . आमच्या घोड्याच्या भाषेत त्याला तसल्ली देणे असे म्हणतात . या माणसाचे नाव होते भगतराम बाणा . जाट समाजाचा हा मनुष्य होता . ( हे त्यांनीच मला सांगितले ) . याचे गावामध्ये किराणा मालाचे छोटेसे दुकान होते . या गावांमध्ये बिश्नोई लोकांची मोठी वस्ती आहे . मूळ राजस्थानातील असलेले बिश्नोई लोक घोडेस्वारीसाठी प्रसिद्ध आहेत .त्यामुळे बऱ्याच जणांकडे घोडे असतात . हा मात्र जाट समाजातील पहिला असा मनुष्य होता की ज्याने घोडा विकत घेतला होता . आणि दोन-तीन दिवसच झालेले असल्यामुळे या घोड्याला अजून नर्मदेमध्ये स्नान त्याने घातलेले नव्हते . याला घोडेस्वारीचा फारसा अनुभव नव्हताच . ते त्याची अवस्था पाहूनच मी ओळखले होते . माझ्या हातात घोडा इतका शांतपणे कसा उभा आहे हेच त्याला कळत नव्हते . मी घोडी सोबतच घोडेस्वाराला सुद्धा शांत केले . त्याला कमंडलू मधले पाणी प्यायला दिले . आणि त्याला सांगितले काही काळजी करू नकोस तुझ्या या घोडीला आज मी स्वतः नर्मदा स्नान घालीन . आणि घोड्याला स्नान कसे घालायचे हे देखील तुला शिकवेन . त्याला फार आनंद झाला !मी काही न सांगताच त्याच्या लक्षात आले होते की मला घोड्यांमध्ये थोडेफार ज्ञान असावे . कारण त्याशिवाय संपूर्ण घोडा कोणी अनोळखी माणसाच्या ताब्यात देत नाही ! खरे म्हणजे भगतराम त्या घोडीला अक्षरशः घाबरला होता . राणी नावाची ही सुंदर काळी घोडी वयाने देखील तरुणच होती . प्रचंड शक्ती निशी जेव्हा ती अलप करायची म्हणजे पुढचे दोन्ही पाय हवेत घ्यायची तेव्हा पाठीवर बसण्यासाठी रिकीब वगैरे न टाकलेला भगत राम मोठ्या आवाजात आरडाओरडा करायचा आणि मैयाचा धावा करायचा ! ती घोडी ज्या पद्धतीने खाली उतरण्यास विरोध करत होती ते पाहता तिने कधीही भगत रामला फेकून पोबारा केला असता . घोड्यांची एक स्वतःची नाजूक मानसिकता असते . त्यांचे वर्तन पतिव्रता स्त्रीप्रमाणे असते . एकदा एखाद्या व्यक्तीला मालक म्हणून त्यांनी स्थान दिले की त्याच्याशी ते कायम एकनिष्ठ राहतात . इथे घोडी नवीन असल्यामुळे तिने अजून भगतराम चा मालक म्हणून स्वीकारच केलेला नव्हता . त्यात नवीन वातावरण , नवीन गाव आणि नर्मदा नदीचे एवढे मोठे भव्य पात्र तिने आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले होते ! त्यामुळे ती बिथरली होती .अशावेळी धाक धपटशा करून घोड्याला नवीन वातावरणात ढकलण्यापेक्षा प्रेमाने अंजारून गोंजारून नेलेले कधीही चांगले असते . परंतु घोडा सांभाळण्याचा अनुभव नसल्यामुळे भगत रामला यातील फारसे काही माहिती नव्हते .म्हणजे हिच्या पूर्वी त्याने चेतन नावाचा एक घोडा सांभाळला होता .परंतु तो याने स्वतः कधी हाताळलाच नाही .आणल्यापासून आजारी राहिलेला तो घोडा लवकरच मरून गेला . मी माझे सामान शांतपणे एका बाजूला उतरवून ठेवले . आणि घोड्याला कसे हाताळावे याचे प्रशिक्षण भगत रामला द्यायला सुरुवात केली . घोड्याचे मानसशास्त्र ,घोडेस्वाराचे मानसशास्त्र असे सर्व अगदी व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याला समजावून सांगितले . नुसते समजावून न सांगता समोर प्रत्यक्ष उदाहरणे त्याला दाखविली . राणी घोडीने क्षणातच माझा मालक म्हणून स्वीकार केलेला होता . त्यामुळे मी जिकडे जाईन तिकडे लगाम न धरता ती माझ्या मागे येऊ लागली . हे पाहून भगत रामला मोठे आश्चर्य वाटले . मी त्याला सांगितले की आता गंमत पहा .हीच राणी घोडी जी तुला नर्मदेमध्ये जाण्यापासून रोखत होती ती आता स्वतः नर्मदेमध्ये जाते की नाही पहा ! आणि मी हळूहळू नर्मदेमध्ये शिरू लागलो . आश्चर्य म्हणजे राणी देखील माझ्यामागे नर्मदेमध्ये आली . हळूहळू हुंगत हुंगत वास घेत पाण्याची चव चाखत तिने नर्मदेला स्पर्श केला आणि भगतराम बाणाला खूप आनंद झाला !
प्रस्तुत लेखक आणि राणी घोडी गोयत घाटावर नर्मदा स्नान करताना
आम्ही घोड्याला स्नान घालत असताना गावातील एक युवक तिथे आला आणि त्याने त्याचा व्हिडिओ घेतला . मी मित्राचा क्रमांक सांगितल्यावर त्याने तो व्हिडिओ पाठवून दिला . तो आपल्या वाचकांसाठी सोबत जोडत आहे . 


वरील व्हिडिओमध्ये आपण बघू शकता की नर्मदा स्नान करताना बाहेर जाण्याचा प्रयत्न करणारी राणी घोडी केवळ हाताचा इशारा केल्यावर जागेवर कशी स्तब्ध उभी राहते .

( टीप : नर्मदा परिक्रमेमध्ये कोणीही परिक्रमा वासींनी घोड्याला हात लावण्याचा प्रयत्न शक्यतो करू नये . घोड्याने घेतलेला चावा किंवा घातलेली लाथ प्राणघातक ठरू शकते . किमान अस्थिभंग झाल्यामुळे परिक्रमा खंडित होऊ शकते .प्रस्तुत लेखकाला घोडेस्वारीची अत्यंत आवड असून घोड्यांना शिकविणे हे त्याचे अधिक आवडीचे काम आहे . गेली अठरा वर्षे घोडेस्वारीचा व्यापक अनुभव गाठीशी आहे .तसेच घोड्यांचे भारतभरातील विविध बाजारात आवड म्हणून त्याचे जाणे येणे असते . स्वतः देखील हौस म्हणून घोडे पाळून झालेले आहेत .तरी कृपया कुठल्याही जनावरापासून परिक्रमेत चार हात लांबच राहिलेले उत्तम ही सर्वांना नम्र प्रार्थना )
घोड्याचा विषय निघालाच आहे म्हणून सांगतो . घोडा हा प्रस्तुत लेखकाचा जीव की प्राण असल्यामुळे त्याच्यापासून अधिक काळ लांब राहता येणे शक्य नव्हते . परंतु हे मैयाला कसे कळाले हा खरा संशोधनाच विषय आहे ! एका ठराविक अंतराने परिक्रमेमध्ये मला घोडे भेटत राहिले ! माझ्यासोबत मुक्कामी भेटणाऱ्या परिक्रमा वासींना मी जेंव्हा हे सांगायचो तेव्हा त्यांना आश्चर्य वाटायचे ! कारण त्या कोणालाही , कधीही , कुठेही घोडा नावाचा प्राणी दिसलाच नाही ! आहे की नाही गंमत ! या विषयाची मला किती प्रीति व गती आहे हे वाचकांना कळावे म्हणून काही छायाचित्रे सोबत जोडत आहे .
राष्ट्रपती भवनातील अश्वासह प्रस्तुत लेखक .
 राष्ट्रपतींचे अंगरक्षक हे भारतातील सर्वोत्तम सैनिक व घोडेस्वार असतात . 
हे घोडे देखील भारतातील सर्वोत्तम घोडे असतात .
 घोड्याला ही कृती फार आवडते . हे तुम्ही करू शकत असाल तर घोडा तुम्हाला शरण गेल्याचे ते प्रमुख लक्षण असते .
आपल्या लाडक्या अश्वासह प्रस्तुत लेखक
महाविद्यालयीन जीवनापासून अश्वप्रेम जोपासणारा प्रस्तुत लेखक
अश्वकुळातील सर्वच प्राणी सुंदर असतात .
 हिमालयातील खच्चर ( खेचर ) या प्राण्यासोबत प्रस्तुत लेखक .
सांगायचे तात्पर्य इतकेच की घोडे हाताळण्याचा अनुभव असल्याशिवाय त्याच्याजवळ जाणे घातक व धोकादायक ठरते .
प्रस्तुत लेखकाला घोड्यांनी अनेक वेळा फेकलेले , पाडलेले ,आपटलेले , तोडलेले आहे ! अशाच एका अश्वामुळे झालेला अस्थिभंग त्याला दाखवताना प्रस्तुत लेखक . हा अस्थिभंग बरा होण्यापूर्वीच परिक्रमा उचलल्यामुळे त्याच्या वेदनेचा फार त्रास सुरुवातीला व्हायचा . कारण दंड कमंडलू धरावे लागायचे .परंतु पुढे पुढे मैया च्या कृपेने ती वेदना कायमची शमली .
घोड्याच्या वर बसलेले असताना हाताळण्याची पद्धत वेगळी असते आणि त्याच्यासोबत असताना हाताळण्याची पद्धत वेगळी असते .
घोडा हा अतिशय संवेदनशील ,चाणाक्ष , चपळ व शक्तिमान प्राणी आहे
प्रस्तुत लेखकाचे दक्षिण भारतातील घर आणि राणी घोडी .  राणी घोडीचे प्रशिक्षण सुरू होते. घोडेस्वाराने पायाचा चवडा डावीकडे वळवला की राणीने तिचा पुढचा पाय तत्काळ डावीकडे वळवणे अपेक्षित होते . ते जमल्यावर काढलेले छायाचित्र !
प्रस्तुत लेखकाने तमिळनाडू येथे सांभाळलेली व शिकविलेली राणी घोडी . 
नुसता हाताने थांब असा इशारा केल्यावर घोडी जागेवर कशी थांबली पाहिजे हे मी भगतराम बाणाला शिकविले .
घोड्याचा खरारा कसा करावा आणि आंघोळ कशी घालावी हे देखील त्याला शिकविले .
मी राणी घोडीवर बसावे असा आग्रह भगत राम ने केला परंतु घोडा हे देखील एक वाहन असल्यामुळे त्याच्यावर बसलो नाही . परिक्रमेच्या नियमात वाहनाचा आधार घेणे मान्य नाही . 
भगतराम बाणाकडून स्वतः  संपूर्ण अंघोळ घालण्याची प्रक्रिया करवून घेतली . मगच आम्ही बाहेर आलो . 
घोड्याची शक्ती अफाट असते आणि तो आपल्याला काहीही करू शकतो हे डोक्यात ठेवूनच त्याच्याशी वागावे लागते . आणि काहीही झाले तरी आपण त्याला घाबरत नाही हे त्याला समजून सांगावे लागते .
नर्मदा मातेला माझे अश्वप्रेम कळले हे मात्र खरे ! पुढे देखील वेळोवेळी लेखांतून मला रेवातटाकी भेटलेले असे अनेक घोडे येऊन तुम्हाला भेटणार आहेत ! तूर्तास हे अश्वपुराण इथेच समाप्त करूयात ! अश्वशक्तिः यशोबलम् ।
राणी घोडीला मनासारखी आंघोळ घालून झाल्यावर मी बाहेर आलो आणि अंग पुसून वस्त्रे धारण करून पुढे निघणार इतक्यात भगतरामने विनंती केली की कृपया त्याच्या घरी चहा घेण्याकरता यावे . परिक्रमे मध्ये कोणाला अन्नपदार्थासाठी नाही म्हणाले की काय होते हे आता पक्के ठाऊक झालेले असल्यामुळे गुपचूप त्याच्या मागे निघालो .भगत रामला सांगितले की घोडीला पकडू नकोस तिचे तिला येऊ दे . बाहेर आल्या आल्या तिने वाळूमध्ये मस्त लोळण घेतली . असा मोकळेपणा तिला खूप वर्षांनी मिळाला असावा . ही वाळू लगेच निघते त्यामुळे पुन्हा आंघोळ घालायची गरज नाही असे त्याला सांगून मग आम्ही सारे  निघालो . भगतराम पुढे त्याच्या मागे मी आणि आमच्या मागे काहीही न करता आपण होऊन चालत येणारी राणी घोडी . आमची ही मिरवणूक गावकरी बघत होते . भगतराम चे घर आणि दुकान नदीपात्रापासून तसे जवळ होते आणि समोर त्याने तबेला केलेला होता .जय बाबा रामदेव किराणा गोयत गाव असेच्या दुकानाचे नाव होते. तबेल्यामध्येच बसलो आणि त्याने चहा मागविला . त्याला तबेला कसा ठेवावा व अन्य काही सूचना सांगितल्या . चेतन घोडा कशामुळे गेला असेल याची कल्पना त्याला दिली . आता भगतराम त्याचा अनुभव मला सांगू लागला . तुम्हाला मराठी भाषेमध्ये अनुवाद करून सांगतो . भगतराम बाणा हा जाट समाजाचा असल्यामुळे गावामध्ये अल्पसंख्य होता . गावामध्ये बिश्नोई समाज अधिक होता . आजही इतके तुकडे आपल्या देशाचे झालेले पाहून सुद्धा आपण हिंदू म्हणून एकत्र राहत नाही हे किती दुर्दैव आहे पहा . परंतु बिश्नोई समाजाचेच लोक घोडे पाळतात आणि तो त्यांचा जन्मसिद्ध अधिकारच आहे अशी त्यांची धारणा असते ,असे मला भगतराम म्हणाला . याला कधीतरी कोणीतरी घोड्यावरून बोलले असल्यामुळे याने असे ठरविले होते की आता आपण स्वतःचा घोडा घ्यायचा . परंतु घोडेस्वारीचे ज्ञान नसल्यामुळे याचा एक घोडा गेला आणि हा दुसरा होता . आता या घोडीला नर्मदा स्नान घालून तिला पवित्र करावे असा स्वाभाविक विचार याने केला व घोडीला घराबाहेर काढले . परंतु जसा हा घोडीवर स्वार झाला तसे तिने नखरे करायला आणि फेकाफेकी करायला सुरुवात केली . याच्या नशिबाने हा कसाबसा तग धरून वरती बसून राहिला होता परंतु याला घोडेस्वारी फारशी येत नसल्यामुळे याला कधी आपण घोडी वरून उतरतो असे झाले . तशातच घोडीने मोकळा रस्ता दिसला म्हणून मैयाच्या दिशेने याला पळवत नेले . परंतु समोर भव्य पात्र बघून ती बिथरली व घाबरून पुन्हा उलटे वळू लागली . भगतरामने विचार केला की आता इथवर आलेली आहे तर हिला मैयापर्यंत नेऊयातच . हे सर्व चालू असताना गावातील लोक याची मजा बघत होते . भगतराम बाणाने मनोमन नर्मदा मातेची प्रार्थना केलीकी मैया काय वाटेल ते कर परंतु मला या घोडीवरून खाली पडू नकोस .कारण मी जर घोड्यावरून खाली पडलो तर तो माझा अपमान सारे गावकरी बघतील आणि त्यांचा सिद्धांत सिद्ध होईल की अन्य समाजाच्या लोकांनी घोडा सांभाळायच्या भानगडीत पडू नये ! मैया मला वाचव !एखादा घोड्याचा जाणकार पाठव ! मला सोडव ! सुरक्षित खाली उतरव असा विचार खरोखर त्याच्या मनात येऊन गेला ! आणि इतक्यात मी हा प्रकार पाहिला आणि धावतच मदतीला . आता मला कळाले की नाईक बुवा रामदासी यांनी मला दीड तास का रिकामेच बसवून ठेवले ! कदाचित तेथून मी लवकर निघालो असतो तर हा प्रसंग मला पाहायला मिळाला नसता .मी तसाच पुढे निघून गेलो असतो . आणि इकडे मागे गावापुढे बिचार्‍या भगतरामची नाचक्की झाली असती .  हा प्रसंग पाहिल्यावर तुम्हाला नर्मदा माता कशाप्रकारे कार्यरत आहे याची थोडीशी कल्पना येईल . पुढे कुठे , कोणाचे , काय होणार आहे हे तिला आधीच माहिती असल्यामुळे ती तुमच्या हृदयांतर्यामी योग्य ती स्फूर्ती ,योग्य ती प्रेरणा ,योग्य ती इच्छा ,योग्यवेळी ,योग्य प्रकारे निर्माण करते आणि योग्य प्रकारे पूर्ण देखील करते ! अशी महायोगिनी आहे आपली नर्मदा मैया ! भगतराम माझ्या मागे लागला की तुम्ही आता राणी घोडीला घेऊन जा आणि उरलेली परिक्रमा हिच्यावर बसूनच पूर्ण करा . त्याने दोन गोष्टी साध्य झाल्या असत्या एक म्हणजे माझी परिक्रमा वेगाने पूर्ण झाली असती आणि दुसरी गोष्ट राणी घोडीचे उत्तम पैकी प्रशिक्षण झाले असते जे त्याला हवे होते . परंतु वाहनाने परिक्रमा करण्याचा माझा कुठलाही विचार सध्या नाही हे त्याला नम्रपणे व ठामपणे सांगून मी त्या अस्वस्थ अश्वस्थाला आश्वासन देऊन आश्वस्त केले की पुन्हा कधी त्याला घोड्यावर परिक्रमा करायची इच्छा झाली तर मी त्याच्यासोबत अश्वारूढ होऊन उपस्थित असेन ! इति श्री रेवाखण्डे गोयत ग्रामे भगतरामस्य राज्ञी अश्वपुराणम् सम्पूर्णम् । श्री नर्मदार्पणमस्तु ।



लेखांक साठ समाप्त (क्रमशः ) 

मागील लेखांक

पुढील लेखांक


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर