लेखांक ७२ : रावेरखेडी मध्ये समाधीस्थ बाजीराव पेशवा अन् शिवलिंग निर्मिती साठी प्रसिद्ध बकावां

काठाने चालत चालत जाताना लक्षात आले की या संपूर्ण भागामध्ये नर्मदा नदीचे पात्र अतिशय विस्तीर्ण आणि उथळ आहे . तसेच खाली गाळ किंवा वाळू नसून संपूर्ण खडक आहे ! त्यामुळे घोड्यावरून नदी ओलांडण्यासाठी हा सर्वोत्तम प्रदेश होता . इतिहास असे सांगतो की नर्मदा मातेने महाराष्ट्राचे आणि पर्यायाने दक्षिण भारताचे यावनी आक्रमणापासून मोठ्या प्रमाणात संरक्षण केलेले आहे . कारण वर्षातील चार ते सहा महिने नर्मदा दुथडी भरून वहायची . त्यामुळे तिला ओलांडता येणे अशक्य होते . त्यामुळे शत्रूला वर्षातील काही काळच महाराष्ट्राकडे वाकडी नजर करून पाहता यायचे . त्यातही नर्मदा प्रत्येक घाटावर उल्लंघ्य नाही . त्यामुळे या भागासारखे थोडेसेच प्रांत आहेत जिथून घोडदळा सकट सैन्य नर्मदा पार करू शकते . या भागातून मराठ्यांचे घोडे अनेक वेळा गेलेले आहेत . अटकेपार झेंडा लावताना किंवा पानिपतच्या युद्धाला जाताना मराठ्यांनी हाच मार्ग वापरला होता . त्यामुळेच मराठेशाहीच्या इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा हा भाग आहे .  इथे मराठेशाहीतील काही बांधकामे आपल्याला आढळतात . विशेषतः नदीवर स्त्रियांना सुरक्षितपणे पाणी भरता यावे यासाठी बांधलेले घाट आणि पाण घाट अथवा पनघट देखील आढळतात . मोहे पनघट पर नंदलाल छेड गयो रे हे गाणे आपण ऐकलं असेल . यातील पनघट म्हणजे पाणी भरण्याचा घाट . या घाटाकडे जाणाऱ्या स्त्रियांवर कोणी वाईट नजर टाकू नये म्हणून आठ ते दहा फुट उंचीच्या भिंती दोन्ही बाजूने बांधलेल्या असतात . आणि नदीच्या बाजूला एक छोटेसे दार असते . भिंती पाण्यामध्ये बुडलेल्या असल्यामुळे भिंतीच्या बाहेरून येणारा माणूस पनघट मध्ये जाऊ शकत नाही . प्रत्यक्षात मला असे जाणवले की या पनघट मधून संपूर्ण घोडदळ देखील इकडून तिकडे जात असावे . असाच एक मोठा पनघट आम्हाला आडवा लागल्यावर तो ओलांडायचा कसा हा प्रश्न निर्माण झाला . त्याची भिंत सुमारे दहा फूट उंच होती . धावत येऊन भिंत चढावे तर ते शक्य नव्हते . मग आजूबाजूला पडलेली दगडे रचून मी थोडीशी उंच पायरी तयार केली . त्यावरून मोठ्या कष्टाने भिंतीवर चढलो माझ्यामागे छोटा बंगाली येतच होता . त्यालाही एका हाताने वर घेतले . इथे मात्र त्याचे पाय लटलट कापायला लागले . आता आम्हाला आडवी आलेली ती भिंत पूर्णपणे पार करायची होती . त्या दोन फूट रुंदीच्या दगडी भिंतीवरून आधी उजवीकडे चालत जाऊन , मग दरवाजा ओलांडून पुन्हा डावीकडे वळून समोरच्या बाजूची भिंत ओलांडून ,त्याच्या पलीकडे उडी मारायची होती . काही लोकांना उंचीवरून खाली बघण्याचा फोबिया असतो . अर्थात भय असते . तसे सात्यकी चे झाले होते . बर तो माझ्यापुढे असल्यामुळे मी त्याला ओलांडू सुद्धा शकत नव्हतो . अखेरीस घाबरून तो खाली बसला . तो खाली बसल्याबरोबर मी त्याला ओलांडले आणि धावतच ती संपूर्ण भिंत पार करून पलीकडे उडी मारली . याला ती भिंत पार करायला अर्धा तास लागला . जी साधारण ३० , ४० सेकंदामध्ये पार करता येणे शक्य होते . उजवीकडे तोल गेला तर नर्मदेमध्ये पडण्याचा धोका होता आणि डावीकडे तोल गेल्यावर आत मध्ये माजलेल्या गवतामध्ये ,खडकाळ पृष्ठभागावर पडण्याची खात्री होती . अखेरीस कसा बसा बंगाली बाबू पार झाला . उतरण्याच्या बाजूला एक कट्टा केलेला होता . त्यामुळे उतरणे तुलनेने सोपे होते . हे खेयगाव नावाचे गाव होते . गुगल नकाशावर मला ही पनघट सापडली . आपल्यासाठी तिचे उपग्रह चित्र सोबत जोडत आहे .
 खेयगावची मराठा पनघट अथवा पाण घाट
याच्यावरून देखील मार्ग होता परंतु मी नर्मदा जलाच्या जवळून चालत असल्यामुळे पनघट ओलांडणे माझ्यासाठी जास्त सोपे होते .
या पाणी भरण्याच्या घाटा पेक्षा देखील वैशिष्ट्यपूर्ण असे काहीतरी आज मला नर्मदेमध्ये पाहायला मिळाले ! ही पनघट लागण्याच्या थोडेसे अलीकडे गंगातखेडी नावाचे एक गाव लागले .  इथे नर्मदा पात्राच्या मधोमध महादेवाची पिंड असून तिथे नर्मदेला भेटण्यासाठी साक्षात गंगा प्रकट झालेली आहे अशी मान्यता आहे .त्यामुळे नर्मदेचे वाहणारे जल इथे आपला प्रवाह उलटा वळविते आणि गंगेला एक प्रदक्षिणा मारून पुन्हा पुढे मार्गस्थ होते ! आपल्याला उघड्या डोळ्यांनी हा चमत्कार पाहता येतो ! सरळ पश्चिमेकडे वाहणारे पाणी अचानक उत्तरेकडे जाऊन पुन्हा पूर्वेकडे वळते आणि वळसा मारून पुन्हा एकदा पश्चिमेकडे वाहू लागते ! मधोमध असलेल्या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालून नर्मदा माता पुढे जाते ! हे दृश्य साध्या डोळ्यांनी देखील पाहायला अतिशय सुंदर ,मनोहर आणि आश्चर्यकारक आहे . इथे एका वानप्रस्थाश्रमी गृहस्थाने छोटीशी कुटी टाकली होती . तिथे बसवून त्याने प्रेमाने चहा पाजला आणि बालभोग खायला दिला . समोरच गंगेची परिक्रमा करणारी नर्मदा माता पाहून धन्य धन्य वाटले ! या भागाची आंतरजालावर मिळालेली काही चित्रे आपल्याकरिता सोबत जोडत आहे ज्यामुळे आपल्याला नक्की काय प्रकार होतो आहे याची कल्पना येईल .
नर्मदा मातेच्या उदरामध्ये प्रकट झालेली गंगामैया
 एरवी उजवीकडून डावीकडे प्रवाहित होणारी नर्मदा मैया येथे या महादेवांना आणि गंगेला परिक्रमा करताना उलटी वाहते .
भौगोलिक दृष्ट्या पाहायला गेले तर इथे खडकांची रचना अशी वैशिष्ट्यपूर्ण आहे की ज्यामुळे एक विवक्षित उतार तयार होतो ज्यामुळे नर्मदा ज्याला उलटे व्हावे लागते . या ठिकाणी नावेने जाऊन दर्शन घेता येते . अर्थातच परिक्रमावासी या स्थानावर कधीच जाऊ शकत नाहीत .
गंगातखेडी येथील गंगा प्राकट्य स्थानाच्या कट्ट्यावरूनच घेतलेली ही सर्व छायाचित्रे आहेत . जी आपल्याला दाखवीतात की या भागातील दगड कसे उथळ आणि उतार असलेले आहेत .
गंगात खेडी येथील नर्मदा पात्रातील खडकाळपणा लक्षात घेतला म्हणजे आपल्याला कळेल की इथे नदी पार करणे सोपे आहे . 
समोरून आपल्याकडे येतायेता अचानक डावीकडे वळलेली नर्मदा मैय्या . 
या भागात नर्मदा पात्रामध्ये असलेल्या खडकाळ तळावर वरून वाहून आलेले खडे दगड गोटे गडगडत जाताना घासून घासून त्याची शिवलिंगे तयार होतात . त्यामुळे नर्मदेच्या पात्रात सर्वाधिक शिवलिंगे तुम्हाला या भागात सापडतील याची खात्री बाळगा . तरी यापूर्वी जिथे शिवलिंग तयार व्हायची ते धाराजी हे तीर्थक्षेत्र ओंकारेश्वर धरणामध्ये बुडून गेले आहे . आणि धरण ओलांडून तयार झालेली शिवलिंगे पुढे वाहू शकत नाहीत त्यामुळे आता जी शिवलिंगे सापडतात ती पूर्वीच तयार झालेली आहेत . या भागामध्ये अनेक रंगीबेरंगी दगड मात्र सापडतात . बहुरंगी दगड हे इथले वैशिष्ट्य आहे . लाल तांबूस तपकिरी पिवळा हिरवा निळा असे रंग एकाच दगडामध्ये आढळतात . या दगडाला शिवलिंगाचा आकार प्राप्त झाला की ते शिवलिंग त्यामुळे अतिशय मोहक आणि आकर्षक दिसते . गंगातखेडी येथील गंगामैयाचे दर्शन घेतले आणि पुढे निघालो . पन घट पार केली . मध्ये अनेक छोटी मोठी मंदिरे आणि आश्रम लागतात . नर्मदा मातेचे या भागातील रूप वेगळेच आणि सुंदर आहे . 
नर्मदेचा खडकाळ किनारा . इथून चालायला थोडेसे धोकादायक असले तरी मजा येते .
मध्ये लागलेले एक हनुमान मंदिर
नर्मदा किनाऱ्याजवळील खडकांचा आकार आणि प्रकार लक्षात घ्या . प्रचंड खडक हीच इथल्या पात्राची ओळख .
या भागातून चालताना परिक्रमा वासिनी आपला पाय मुरगळणार नाही याची काळजी घ्यावी . प्रत्येक पाऊल एकाग्रतेने विचारपूर्वक टाकावे . नर्मदेच्या काठी दिसणारे मोठ्यात मोठे दगड सुद्धा अतिशय अस्थिर असतात हे मी खूप वेळा अनुभवले . अगदी फूट दोन फुटापर्यंत ते हलू शकतात . त्यामुळे प्रत्येक पाऊल पायाखालचा पृष्ठभाग तपासून मगच टाकावे हेच अधिक हिताचे आहे .
या परिसरामध्ये अनेक पुरातन मंदिरे परकीय आक्रमकांनी भग्न केलेली आहेत .त्यामुळे अशा प्रकारच्या प्राचीन हिंदू मंदिरांच्या अवशेषांचा खच या भागात सर्वत्र आढळतो .
हे सर्व भग्न अवशेष पाहून मन विषण्ण होते .
आपल्या देशातील धर्म कुठल्या अवस्थेला पोहोचला होता हे लक्षात त्याचे असेल तर नर्मदा खंडामध्ये भ्रमण करावे . पावला पावलावर तुम्हाला तुटलेल्या मंदिरांचे अवशेष सापडतील . वरील फोटोत पहा तुटलेल्या एका मूर्तीचा चेहरा शिवलिंग म्हणून बसवला आहे . आपल्या देशामध्ये पूज्य मानल्या गेलेल्या प्रत्येक प्रतीकाचा अपमान परकीय आक्रमकांनी , वेळोवेळी मिळेल त्या पद्धतीने केलेला आपल्याला आढळतो . काही ठिकाणी शिवलिंगांचा वापर पायरी म्हणून केला गेला . काही ठिकाणी वजू खान्यामध्ये अर्थात पाय धुण्याच्या जागी शिवलिंग वापरले गेले . अनेक मूर्तींची मुंडकी उडवली गेली . अनेक मंदिरे तोडली फोडली . अनेक मूर्ती पूजक यम सदनी धाडले गेले . अनेक घराणी नष्ट केली गेली . अनेक सुंदर स्त्रिया भ्रष्ट केल्या गेल्या . जिथून मराठा फौजेची ये जा होते त्या भागात स्त्रियांच्या रक्षणासाठी त्यांनी पनघट बांधणे स्वाभाविक आहे . परंतु नर्मदे सारखी पवित्र नदी समोर असताना तिचे पाणी भरणाऱ्या स्त्रीला आपल्या अब्रूची भीती वाटावी अशी परिस्थिती या देशांमध्ये निर्माण झाली होती यावर आपल्याला विश्वास ठेवावाच लागतो . संत आणि नदी यांच्यामध्ये एक साम्य आहे . "जो जे वांछील , तो ते लाहो "असा त्यांचा भाव असतो . अर्थात ज्याला जे हवं ते त्याला मिळावं . नदी कधी पाणी पिणाऱ्या जीवाचा धर्म वर्ण जात लिंग बघत नाही . तो विवेक आपल्या ठायी असला पाहिजे की आपल्याला त्या नदीच्या संरक्षणासाठी कशी धार्मिक व्यवस्था तिच्या काठावर उभी करायची आहे . बाजीराव पेशव्यासारख्या माणसाला सुद्धा नर्मदेने भुरळ घातली आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे . संपूर्ण भारत खंडावर ज्याची समशेर एकेकाळी राज्य करत होती असा बाजीराव नर्मदे काठी चिरनिद्रिस्त झाला  ही अतिशय महत्त्वाची घटना आहे . बाजीरावाच्या घोड्याने कावेरी पासून गंगा यमुना सिंधू ते अगदी अटकेपार च्य अफगाणी  नद्यांचे पाणी पिलेले आहे असे असताना , शेवटचा श्वास त्याच्या मालकाने नर्मदे काठी घ्यावा यातच या नदीचे महान पण सामावलेले आहे . असे म्हणतात की शेवटच्या काळाला नर्मदेच्या काठी असलेल्या तीव्र उन्हाळ्यामुळे बाजीराव पेशवा यांना लूचा त्रास झाला .  हे "लू" लागणे म्हणजे किती बेकार प्रकार असतो याचा अनुभव मी घेतलेला होता .  तीव्र उन्हामुळे उन्हाळी लागते आणि मनुष्याचे हळूहळू खंगत जाऊन निधन होते . अशाप्रसंगी बाजीरावांना पुण्याला किंवा अन्य कुठेतरी हलवता येणे शक्य होते परंतु त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली असेल की मला शेवटचा श्वास नर्मदा तीरावरच घेऊ द्यावा . . . आज संपूर्ण मार्ग चालताना डोक्यामध्ये फक्त मराठ्यांचा तेजस्वी ,देदीप्यमान इतिहास निनादत होता . असे वाटायचे की क्षणात डावीकडून हजार एक घोडदळ येईल आणि एखादा मावळा जाता जाता मला म्हणेल , " नर्मदे हर बाबाजी ! ही घ्या साखर ! तोंड गोड करा ! आपला भगवा झेंडा अटकच्या किल्ल्यावर फडकला आहे ! " आणि बघता बघता ते सर्व घोडे चब डब चब डब आवाज करत नर्मदेच्या लाटा चिरत पैलतीर गाठतील आणि वेगाने उत्तरेकडे रवाना होतील !  धर्मवीर बलिदान मास सुरू होता . छत्रपती संभाजी महाराजांच्या तेजस्वी बलिदानामुळे पेटून उठलेल्या मराठा सैन्याने उभा आडवा हिंदुस्तान एक करून टाकला ! त्यांच्या चरण धुळीने पावन झालेला हा परिसर होता ! ही फौज काही पगारी सैनिकांची नव्हती . इथे स्वतःची पैरण , स्वतःचा घोडा , स्वतःची ढाल , स्वतःची तलवार आणि स्वतःची भाकरी घेऊन येणारा मावळा स्वतःच्या जीवाची बाजी एका महान राष्ट्राच्या निर्मितीसाठी लावत असे .हे महान स्वप्न , ही जाज्वल्य निष्ठा , हे अद्वितीय साहस ,हा अतुलनीय पराक्रम , हे असामान्य शौर्य त्यांच्या हृदयानंतर्यामी निर्माण करणाऱ्या सर्वच प्रातःस्मरणीय परमेश्वरी अंशांना साष्टांग नमस्कार करता झालो . तिथली चिमूटभर माती घेऊन जिभेवर टाकली . न जाणो कोण्या एखाद्या अणू रेणू मधून राष्ट्रनिष्ठेसाठी धारातीर्थी पडलेल्या मराठ्यांच्या स्वेदबिंदूचा अंश किंवा रक्ताच्या सांडलेल्या थेंबातला बाणेदार पणा माझ्या शरीरात जाऊन गुणसूत्रांमध्ये घुसावा .  बाजीराव पेशवा यांची समाधी जसजशी जवळ जवळ येऊ लागली तस तसा माझ्या अश्रूंचा बांध रोखून धरणे मला अवघड होऊ लागले . कोण कुठले दक्षिणेतल्या बादशहाचे सरदार ! त्यांच्या पोटी एक पुत्र जन्माला येतो काय , आणि साऱ्या भारत वर्षाचे भाग्य पुन्हा बदलून टाकतो काय ! ठरवले असते तर आयुष्यभर महालामध्ये बसून आयुष्य ऐशो आरामात जगता आले असते .परंतु ते सहज प्राप्त आयुष्य नाकारून स्वतःच्या तलवारीने स्वतःच्या धर्माधिष्ठित राज्याच्या सीमा आखणारा लोकोत्तर पुण्य पुरुष म्हणजे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज ! त्यांच्या उपदेशाला अनुसरून ह्या राज्याचा कैकपटीने विस्तार करणारे त्यांचे अतिपराक्रमी पुत्रोत्तम धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज ! आणि त्यांच्या अपूर्ण मनीषा पूर्ण करण्यासाठी अखंड हिंदुस्थानात घोड्यावर स्वाऱ्या करून उभा आडवा हिंदुस्तान पुन्हा एका सूत्रात बांधणारा महापराक्रमी योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवा ! ज्याने आयुष्यामध्ये झोपेत सुद्धा वेळ वाया घालवला नाही असा बाजीराव ! असे म्हणतात की बाजीराव दोन घोडे घेऊन चालायचा त्यातील एका घोड्यावर तो झोपत असे आणि दुसरा घोडा पहिल्या घोड्याला मार्ग दाखवत असे . इतका भीमा पराक्रम गाजविणारा हा महायोद्धा इथे चिरनिद्रिस्त झाला आहे या नुसत्या कल्पनेने सुद्धा अंगावर शहारा येत होता . ब्रह्मदेश ते बलुचिस्तान आणि काश्मीर ते कन्याकुमारी देश एका सूत्रामध्ये बांधला तो या महान योद्धा परंपरेने .  इतिहास साक्षीला आहे की जेव्हा जेव्हा आपण हत्यार खाली ठेवले तेव्हा तेव्हा आपल्या देशाचा एक एक भूभाग गमावला आहे . आणि अजूनही आपण इतिहासातून बोध घेऊन शहाणे झालो नाही तर भविष्यामध्ये कदाचित परदेशाचा विसा घेऊन नर्मदा परिक्रमा करावी लागेल .जास्त जुना काळ नाही , केवळ ७५ वर्षांपूर्वी सिंधू काठी राहणारे हिंदू देखील असे सिंधू नदीच्या बाबतीत सांगितल्यावर विनोद समजून हसत होते ! आज आपल्याला सिंधू नदी पाहण्यासाठी पाकिस्तान देशाचा विसा घेऊन जावे लागते . आणि माझ्या उभ्या आयुष्यात मी एकही मनुष्य असा पाहिला नाही की ज्याने खास सिंधू नदीचे दर्शन घेण्यासाठी पाकिस्तानला भेट दिली आहे . अजून शंभर दोनशे वर्षांनी कदाचित कैलास मानसरोवर यात्रेला हिंदू जाणे बंद करतील . आजच तुम्ही गुगल नकाशावर शोधायला गेलात तर कैलास आणि मानसरोवराची नावे बदललेली आपल्याला दिसतात . एक समाज म्हणून आपण षंढ आहोत त्याची ही परिणती आहे . षंढ माणूस जास्त अपेक्षा ठेवत नसतो . त्याला फक्त दोन वेळचे भोजन मिळाले तरी पुरेसे असते . मी स्वतः गुगल कंपनीला पत्रव्यवहार करून कळविले होते की त्यांनी कैलास मानसरोवर आणि राक्षस ताल ही नावे बदलली नाही पाहिजेत . परंतु त्यांनी मला असे कळविले होते की दोन्ही देशांची ह्या भूभागाच्या मालकीबद्दल सहमती झालेली असल्यामुळे तुमच्या माझ्या मताला काही किंमत राहत नाही . गंमत म्हणजे आजपर्यंत कोणीही मोठ्या संख्येने असा आक्षेप गुगल नकाशावर नोंदवलेला नाही . कारण तो आपला प्रांत आहे तो आपला भूभाग आहे तिथे आपली संस्कृती कधीकाळी नांदत होती याची जाणीवच हिंदू समाजाला नाही . अशा रीतीने शतखंडित झालेला भारत वर्ष , त्याला आज तो ज्या आकारात दिसतो तो आकार देणारा बाजीराव पेशवा ! आणि तेजस्वी मराठेशाहीची परंपरा ! सारेच आज डोक्यामध्ये वादळासारखे घोंगावत होते . ग्वाल्हेर चे शिंदे , बडोद्याचे गायकवाड ,धार चे पवार , इंदोरचे होळकर , नागपूरचे भोसले , पुण्याचे पेशवे सर्वांनी एक दिलाने , एकजुटीने पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार केले . आपली जात पात पंथ भेद विसरून सर्व बलुतेदार त्यांच्या या महान राष्ट्र यज्ञामध्ये आहुती म्हणून सामील झाले . त्या महानतम त्यागाच्या विभूतीवर आज आपले राष्ट्र उभे आहे . बघता बघता समोर भव्य तटबंदी दिसू लागली . मध्यप्रदेश सरकारने उत्तम पैकी खर्च करून मजबूत काँक्रीटीकरण करीत या समाधी स्थळावर महापुराचा कमीत कमी प्रभाव पडेल अशी व्यवस्था केलेली दिसते . पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार घातला आणि महाद्वारापाशी येऊन उभा राहिलो .  साधारण चौरसाकृती वाटणारे भव्य दिव्य प्रवेशद्वार या वाड्याला आहे . बाहेर एका मोठ्या झाडाचा पार होता . आत मध्ये गेल्यावर उजव्या हाताला श्रीमंत बाजीराव पेशवा यांची समाधी आहे . समाधीवर डोके टेकले आणि अश्रूंनी समाधीला अभिषेक घातला . मला असे फार वाटते की कुठल्यातरी एका जन्मामध्ये मी या सैन्याचे घोडे सांभाळण्याचे काम करत असणार . किमान त्यांची धुणी धुण्याचे किंवा पायताणे पुसण्याचे काम नक्की करत असणार . माझ्या मागोमाग सात्यकी देखील आत मध्ये आला . एका जुनाट पडक्या वास्तू कडे पाहून मी इतका ढसाढसा का रडतो आहे याचा बोध त्याला होत नव्हता . होणे शक्य देखील नव्हते . आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत . संस्कार हा रक्तातून यावा लागतो . महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या माणसांना रक्तातून मिळालेला जो काही वारसा आहे तो अन्य प्रांतातील लोकांना मिळण्याची शक्यताच नाही . महाराष्ट्र भारतातील एक अग्रेसर राज्य असण्याचे एकमेव कारण हा उदात्त वारसा आहे .  बाकी काही नाही . या भागाचे दर्शन आपल्याला घडवतो . ज्याप्रमाणे रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी किंवा वढू बुद्रुक येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी  ही स्थाने हिंदूंसाठी ज्योतिर्लिंगाप्रमाणे पूज्य आहेत तशीच ही समाधी देखील आहे . 
नदीपात्रातून चालत आल्यावर समोर अशी मजबूत धारक भिंत आणि त्यावर बाजीराव पेशवा यांची समाधी दिसते .
समाधी पर्यंत येण्याचा काठावरील मार्ग असा आहे
रावेर आणि खेडी अशी दोन वेगळी गावे असून ही समाधी खेडी गावात आहे . रावेर खेडी म्हणजे रावाची खेडी . अर्थात बाजीरावाची खेडी .
अतिशय मजबूत तटबंदीने बंदिस्त अशा एका छोटेखानी किल्ल्यामध्ये ही समाधी आहे .
समाधी स्थळाचे महाद्वार छोटेसे परंतु आकर्षक आहे
संपूर्ण दगडामध्ये केलेले हे बांधकाम अतिशय सुबक आणि भरभक्कम आहे .
समाधी स्थळाच्या बाहेर एक मोठा पिंपळाचा वृक्ष असून त्याचा मोठा पार आहे . तसेच इथे समोर नर्मदा पात्रामध्ये एक मोठे बेट असून नर्मदा दोन शाखांमध्ये विभागून इथे वाहताना दिसते .
श्रीमंत बाजीराव पेशवा यांची हीच ती समाधी
समाधी
समाधी मंदिरातून नर्मदा मातेचे अतिशय सुंदर दर्शन होते . समोर दिसत आहे तो नर्मदेचा पहिला तीर नसून नर्मदे मधील एक मोठे बेट आहे . या बेटाच्या पलीकडून अजून एक शाखा वाहत आहे . इथे बसून राहायला खूप भारी वाटते .
समाधीस्थळाबाहेर लावलेली माहिती
भारतीय पुरातत्व विभागाने लावलेल्या पाट्या
तटबंदीच्या भिंतीवर चढण्याचा मार्ग
महापुरामध्ये ही समाधी जलमग्न होते .
बाजीरावांच्या पत्नी काशीबाई पेशवा यांची समाधी देखील समोरच एका टेकडीवर आहे
कळस जागेवर नसलेलं अत्यंत मोडकळीला आलेलं एक शिवमंदिर असं त्या समाधीचं स्वरूप आहे
मंदिर छोटेसेच असले तरी मराठा स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे .
या समाधी परिसरामध्ये येण्यापूर्वी मी एक अद्भुत घटना अनुभवली होती . भरपूर चालून उष्णता निर्माण झाल्यामुळे अभी मैया मध्ये स्नान करावे असा विचार करून मी एके ठिकाणी स्नानाला उतरलो . मला एक सवय आहे की स्नानाला उतरल्यावर आजूबाजूला काय काय आहे ते पाहून ठेवायचे . माझ्या आजूबाजूला तीन बाजूंनी दगडांची गुळगुळीत झालेली टोके दिसत होती . मी तीन डुबक्या मारून वर आलो आणि आजूबाजूला पाहिले तर ते सर्व दगड गायब झालेले होते . मग मी काठावर असलेल्या एका दगडाकडे लक्ष ठेवले . थोड्या वेळात तो दगड देखील अदृश्य झाला . मग माझ्या लक्षात आले की धरणातून पाणी सोडल्यामुळे नर्मदेची पातळी वेगाने वाढत आहे ! त्यामुळे मी चटकन पाण्यातून बाहेर आलो . माझी झोळी जी मी नर्मदेपासून वीस फूट लांब ठेवली होती ती आता फक्त पाच फुटावर आली होती ! म्हणजे अजून थोडा वेळ जर मी पाण्यात राहिलो असतो तर कदाचित ती वाहून गेली असती ! पाण्याची पातळी किती वेगाने वाढू शकते हे मी पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहिले ! गंमत म्हणजे ही पातळी वाढते आहे तुमच्या लक्षात येत नाही ! एका स्थिर गतीने पाण्याची पातळी वाढत जाते . तशीच ती कालांतराने कमी देखील होत जाते . पातळी कमी जास्त झाल्यामुळे जलव्याप्त होणारा परिसर हा शक्यतो चालण्यासाठी उत्तम ठरतो . कारण इथे फारशी झाडे उगवत नाहीत .
इथून थोडेसे पुढे आल्यावर बिबट्याने मारलेली एक गाय मला पाहायला मिळाली . एका गुराख्याने मला सांगितले की बिबट्याने ही गाय मारली आहे . अशा जनावरांपासून आपण थोडेसे लांबच चालावे . कारण जवळपास हिंस्त्र श्वापद असेल तर त्याला अशी भीती असते की तुम्ही त्याचे खाद्य पळवून न्यायला आलेले आहात . आणि त्या भीतीपोटी तुमच्यावर ते हल्ला करू शकते . रावेर खेडी मध्ये आल्यावर काशीबाई साहेबांच्या समाधी शेजारी एक छोटासा आश्रम होता तिथे परिक्रमा वासी उतरतात असे मला सांगण्यात आले . यापूर्वी सकाळी घडलेला एक प्रसंग चांगला धडा शिकवून गेला . आश्रमामध्ये गेल्यावर भोजनप्रसाद तयार होता आणि लोक जेवायला बसलेले होते . परंतु इथे राहणाऱ्या वानप्रस्थाश्रमी साधूने सांगितले की तुम्ही येण्यासाठी पाच मिनिटे उशीर केलेला आहे त्यामुळे तुम्हाला भोजन प्रसाद देणार नाही . आमच्यासमोर सर्वजण जेवले परंतु आम्हाला भोजन मिळाले नाही . आम्ही म्हणजे माझ्यापाठोपाठ आलेला छोटा बंगाली सुद्धा . त्याला या प्रकाराचा खूप राग आला . परंतु मी विचार करू लागलो की असे कसे काय झाले असेल आणि मग मला सकाळचा प्रसंग आठवला . सकाळी आम्ही दोघे चालत असताना एका नावाड्याने आम्हाला थांबविले आणि त्याच्या घरी चहा पिण्यासाठी यायची विनंती केली . मी तयार झालो होतो परंतु छोटा बंगाली म्हणाला आपण आत्ता थांबलो तर दिवसा चालणे होत नाही त्यापेक्षा पुढे निघून जाऊ . मी देखील त्याला होकार दिला होता आणि आम्ही दोघे त्या नावाड्याचे मन दुखवून पुढे निघून गेलो होतो . परिक्रमेमध्ये मिळणारे महत्त्वाचे धडे असे असतात . धडा क्रमांक एक सोबत कोणालाही घेऊ नका एकटेच चाला !
धडा क्रमांक दोन कोणीही काहीही दिले तर त्याला नाही म्हणू नका . मैय्याला असे प्रकार केलेले आवडत नाहीत . समोर जेवण असून उपाशी राहण्याची वेळ त्या दिवशी आमच्यावर आली . अखेरीस तो परिसर पुन्हा एकदा नीट पाहावा म्हणून मी बाहेर पडलो . काशीबाई यांच्या समाधी स्थळी रामेश्वर शिवलिंगाची स्थापना केलेली आहे . दक्षिण भारतातील रामेश्वर हे तीर्थक्षेत्र कायम मराठ्यांच्या अधिपत्याखाली राहिलेले होते . इथे एकूण बारा पुजारी आहेत जे सर्व मराठी आहेत . यांच्या नेमणुका रामदास स्वामी यांच्या सूचनेनुसार शिवाजी महाराजांनी केलेल्या आहेत . कर्वे , बर्वे ,बोकील ,अष्टपुत्रे , दशपुत्रे , रानडे अशी आडनाव असलेले हे सर्व गुरुजी आहेत . यातील बोकील हे रामेश्वरम मठाचे रामदासी मठपती आहेत . भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नाव रामनाथ हे रामेश्वराच्या शिवलिंगावरूनच ठेवलेले आहे . दलित समाजातील रामनाथ कोविंद हे परम शिवभक्त आहेत . ते जेव्हा रामानाथाची पूजा करण्याकरता गाभाऱ्यामध्ये गेले होते तेव्हा त्यांच्यासोबत विजयकुमार बोकील हे रामेश्वराचे मुख्य पुजारी तिथे होते . सांगायचे तात्पर्य रामेश्वराचा आणि मराठी शाही चा जुना संबंध आहे . त्यामुळे हे शिवलिंग मुख्य रामेश्वराला स्पर्श करून आणले असण्याची शक्यता आहे . इथे बसून माझी सर्व शिवाची स्तवने मी म्हणू लागलो . इतक्यात मंदिरामध्ये अनेक स्त्रिया येत आहेत असे माझ्या लक्षात आले . सर्वांच्या हातामध्ये दुधाची वाटी होती . आणि त्या सर्वजणी मिळून बाहेरच्या नंदीला दूध पाजत होत्या . मी लहान असताना एकदा गणपती दूध पीत आहे अशी अफवा महाराष्ट्र मध्ये पसरली होती . अगदी त्याच धर्तीवर नंदिकेश्वर भगवान दूध पीत आहेत अशी अफवा त्या दिवशी मध्य प्रदेशांमध्ये प्रस्रुत झाली होती . अगदी तरुण मुली सुद्धा वेड्यासारखे नंदीला दूध पाजत होत्या . मी त्या सर्वांना सरफेस टेन्शन म्हणजे काय असते आणि त्या पृष्ठभागीय तणावामुळे कुठलाही द्रव पदार्थ कसा खाली येऊ शकतो हे सप्रमाण सिद्ध करून दाखवले . केवळ मंदिर नव्हे तर कुठलाही दगड दुध पिऊ शकतो हे देखील त्यांना करून दाखवले . परंतु कोणीही माझे सांगणे ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते . उलट मलाच त्यांच्या नेमाडी भाषेमध्ये उलटेपालटे काहीतरी बायका बोलू लागल्या . हा पाखंडी बाबा आहे याला धर्माचे काही ज्ञान नाही वगैरे वगैरे त्या बडबडत होत्या . मी त्या सर्वांना आव्हान दिले आणि नंदीला अजून बरेच पदार्थ पाजून दाखवले . परंतु त्या बायका काही मान्य करेनात . अखेरीस मी त्या सर्वांचा नाद सोडून दिला आणि बाजीरावाची समाधी गाठली . इथे डावीकडे आत मध्ये गेल्यावर एका कोपऱ्यात पुरातत्त्व विभागाचे कार्यालय असून येथे चौधरी नामक एक पुरातत्त्ववेत्ता मनुष्य मला भेटला . याने मला खूप सहकार्य केले आणि संपूर्ण परिसराची चांगली माहिती दिली . तसेच या भागामध्ये राहणारा एक तरुण खूप चांगला गाईड म्हणून काम करतो असे सांगून खेडी गावातून त्याला फोन करून बोलावून घेतले . अनिल रामलाल बिर्ला नावाचा मोराण्या गुर्जर जातीचा हा ३५ - ४० वर्षाचा तरुण होता . याला मी आल्या आल्या नमस्कार केला आणि समाधी विषयी माहिती विचारली . मला असे लक्षात आले की याला बाजीरावा पेक्षा स्वतःबद्दल बोलण्यात अधिक रस होता .त्याचे युट्यूब व्हिडिओ कसे हिट आहेत आणि त्यावर तो कशी माहिती सांगतो वगैरे मला तो सांगू लागला . मी त्याला सांगितले की माझ्याकडे फोन नाही तरी कृपया मला तू आत्ता माहिती दे तो मला म्हणाला अशी प्रत्येकाला माहिती देत बसलो तर मग माझे व्हिडिओ कोण बघणार ! मी काही त्याचे व्हिडिओ पाहिले नाहीत परंतु मला खात्री आहे की हे व्हिडिओ देखील अर्धवट ज्ञानाने परिपूर्ण असणार आहेत ! कारण मुळात बाजीराव पेशवा या व्यक्तीबद्दल याच्या अंतकरणात फारसा कळवळा नाही असे मला जाणवले . तो तसा असता तर त्याने ताबडतोब मला सर्व माहिती सांगितली असती . त्याचे अजून एक वाक्य मला खटकले . किमान २५ - ३० लोक असल्याशिवाय मी माझे तोंड उघडत नाही असे तो म्हणाला ! हे ऐकून मला अजूनच वाईट वाटले . संख्यात्मक आणि गुणात्मक धारणा शक्ती याबाबत त्याचा अभ्यास अजून अपूर्ण होता . तो आल्यावर बरेच काही बोलला परंतु त्यात आत्मप्रशस्ती जास्त होती . तरीदेखील त्याला गाईड म्हणून फायदा व्हावा असे काही त्याला ज्ञान द्यावे असा विचार करून मला जो काही मराठीशाहीचा इतिहास माहिती होता तितका मी त्याच्या डोक्यात कोंबला . त्याने अजून एक गंमत केली ती म्हणजे तो मला म्हणाला की माझे नाव सांगा वरच्या आश्रमामध्ये तुम्हाला सर्व सुविधा मिळतील ! मी गंमत म्हणून वरती गेल्यावर जेव्हा याचे नाव आश्रमात सांगितले तेव्हा त्यांनी सांगितलेकी तुम्ही आधीच आसन लावले आहे म्हणून ठीक आहे .नाहीतर या माणसाचे नाव सांगितल्यावर तुम्हाला आसन लावायला सुद्धा परवानगी दिली नसती ! असो हे सर्व सांगण्यामागे उद्देश इतकाच आहे की जे कोणी तरुण हे लेखन वाचत असतील त्यांनी लक्षात घ्यावे . प्रसिद्धीच्या मागे कधीही लागू नये . तुमच्याकडे सिद्धी आली की प्रसिद्धी येतेच . परंतु अर्धवट ज्ञानाचा अहंकार करीत आपली स्वतःची टिमकी वाजवत फिरू लागल्यावर समाजामध्ये आपले मूल शून्यवत होते . आज या युवकाला खूप चांगली संधी प्राप्त झालेली असून देखील लाईक शेअर सबस्क्राईबच्या दृष्ट चक्रात अडकल्यामुळे तो एका चांगल्या ज्ञान आदान प्रदानाला मुकला . मी त्याला विचारले सुद्धा की तू फोन केल्यावर लगेच कसा काय आलास ? तेव्हा त्याने त्याची खरी अपेक्षा सांगून टाकली . चौधरी ने त्याला फोनवर सांगितले की इथे एक इतिहास अभ्यासक आलेले आहेत त्यामुळे तो डोक्यामध्ये एक प्रतिमा घेऊन आला होता . सुटा बुटातील चकाचक दिसणारा एखादा विचारवंत समोर येईल असे कदाचित त्याला वाटले असावे आणि समोर माझ्यासारखा फाटका मळकट कळकट इसम पाहिल्यावर त्याचा भ्रमनिरास झाला . त्यात त्याला असे वाटले होते की माझे यूट्यूब चैनल असेल , इंस्टाग्राम असेल ,फेसबुक असेल आणि मी 'कोलॅबोरेशन ' करून ह्याला माझ्या संपर्कांमध्ये प्रसिद्धी देईन आणि त्याचे सबस्क्राईबर वाढवीन . प्रत्यक्षात मी मोबाईल वापरत नाही हे पाहिल्यावर त्याने अक्षरशः मला कटवले . मी एका प्रामाणिक आंतर यात्रेवर निघालेला असल्यामुळे , त्याने जर पोट तिडकीने मला मराठ्यांचा इतिहास सांगितला असता तर त्याचे तोंड भरून कौतुक माझ्या डायरीमध्ये मी लिहिले असते . परंतु त्याच्या नशिबात ते नव्हते . माझ्यापेक्षा छोटा बंगाली थोडा चकाचक राहत असल्यामुळे त्याच्याशी मात्र तो फार आदराने वागत होता ! मला या अनिल रामलाल बिर्लाची फारच मजा वाटली ! मी त्याला विचारलेल्या एकाही प्रश्नाचे त्याने मला धड उत्तर दिले नाही . प्रत्येक वेळी तो माझे यूट्यूब चैनल बघा एवढेच सांगत राहिला . शेवटी मी त्याला म्हणालो देखील की तुझी ही आयडिया मला आधी कळली असती तर मी youtube वरच परिक्रमा केली असती , उगाचच प्रत्यक्षात देह जाळून घेतला ! हे ऐकल्यावर तो खजील झाला आणि निघून गेला .
अनिल बिर्ला याच्या हृदयामध्ये बाजीराव पेशवा यांच्या बद्दल भक्ती आहे हे नि:संशय ! कारण त्याच्या मुलाचे नावच त्याने बाजीराव बिर्ला  ठेवले आहे ! फक्त त्याने प्रत्यक्ष माहिती देण्यावर अधिक भर द्यावा अशी त्याला या माध्यमातून विनंती आहे ! युट्युब वरच्या रेसिपी बघून जसे पोट भरत नाही त्यासाठी प्रत्यक्ष जेवावे लागते तसेच काहीसे हे आहे . असो .
अनिल रामलाल बिर्ला आणि त्याचे युट्युब चॅनेल
मी रामेश्वरम मंदिरापाशी बसलेलो असताना एक अतिशय तेजस्वी तरुण तिथे आला . आणि माझ्याशी बोलू लागला . याचे डोळे घारे होते .रंग गोरा होता .उंची चांगली होती . राजबिंडे व्यक्तिमत्व होते . याचे नाव होते धरमसिंह नवलसिंह पवार ! जातिवंत मराठा ! परंतु मूळ पवार लोकांप्रमाणे हे घराणे देखील उत्तर भारतातून दक्षिणेकडे स्थलांतरित झालेले होते . याच्यासोबत मी किमान सहा तास गप्पा मारल्या असतील ! हा माझा पिच्छाच सोडेना ! याचे नवीन नवीन लग्न झाले होते त्यामुळे बायको सारखा फोन करत होती ! परंतु हा काही घरी गेला नाही . अखेरीस रात्री माझ्यासोबत भोजन केल्यावरच तो घरी गेला . हा तरुण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होता . याने मात्र या परिसराची अतिशय  इत्यंभूत माहिती मला सांगितली . आमच्या दोघांची अनेक विषयांवर सखोल चर्चा झाली . अनिल बिर्ला याला संघाच्या कामात ओढावे असे मी त्याला सुचविले . जेणेकरून त्याची ऊर्जा योग्य प्रकारे वापरली जाईल . त्या संपूर्ण परिसरामध्ये वेगवेगळ्या कट्ट्यांवर बसून आम्ही चालता चालता बोलत होतो . जणू काही आम्ही जुने मित्र असावे असा आमचा भाव होता ! त्याला देखील मला भेटून खूप आनंद झाला ! त्यावेळी त्याने काढलेले काही फोटो मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले . ते सोबत जोडत आहे . 
रावेर खेडी येथील सूर्यास्त अनुभवताना धरम सिंह पवार या तरुणासोबत प्रस्तुत लेखक
याची वाणी अतिशय तेजस्वी होती आणि एकंदरीतच चेहऱ्यावर खूप तेज होते . शुद्ध धारच्या पवार घराण्याचे बीज होते .
रामेश्वरम मंदिरा सोबत आम्ही काढलेला फोटो . नुकतीच शिवरात्र होऊन गेल्यामुळे त्याची सजावट शिल्लक होती .मागे स्त्रियांचा नंदीला दूध पाजण्याचा कार्यक्रम चालूच आहे !
माझा मळलेला वेश पहा !
 रेवा तटीची माती , तीच मजला विभूती !
अगदी सूर्य अस्ताला जाईपर्यंत आम्ही किनाऱ्यावर चकरा मारत होतो .  असे आश्वासक तरुण देखील याच मातीमध्ये निर्माण होत आहेत तोपर्यंत आपल्या देशाचे भवितव्य सुरक्षित आहे . 
काठावरून एक गमतीशीर गोष्ट मी पाहिली . दुपारी मी जेव्हा इथे आलो तेव्हा एका बाईने आपली गाई गुरे नर्मदेमध्ये हाकलली . इथे पाण्याला प्रचंड प्रवाह आहे  तरीदेखील ती सर्व जनावरे सराईतपणे पोहत मधल्या बेटावर गेली . बेटावर असलेले हिरवेगार गवत दिवसभर त्यांनी खाल्ले आणि संध्याकाळी हिने खालून आवाज दिल्याबरोबर सर्वजण पुन्हा माघारी आले ! प्रवाहाला वेग असल्यामुळे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला सर्व गुरे पोहत होती . अगदी लहान वासरे सुद्धा पोहत पोहत काठावर आली . मी या मातारामशी संवाद साधला आणि तिच्याकडून ही संपूर्ण प्रक्रिया समजावून घेतली . गेल्या अनेक पिढ्या ही गुरे अशा पद्धतीने नर्मदेच्या मधोमध जाऊन परत येत आहेत . ही सवय त्यांच्या रक्ता मधून पुढच्या पिढीमध्ये जाते कारण नवीन गुरे आणल्यावर अशा पद्धतीने पाण्यामध्ये उतरत नाहीत असे तिने सांगितले . गेल्या अनेक पिढ्या हा कळप मधल्या बेटावर जाऊन पुन्हा परत पोहत येत आहे . यात एकदा वर पोहोचलेली गुरे अन्य गुरांना सहकार्य करतात हे देखील मी पाहिले . गुराखी आणि गुरे यांचे हे असामान्य साहस मला फार आवडले ! किमान पक्षी बाजीराव सारख्या महायोद्ध्याच्या समाधीपुढे असे काहीतरी पराक्रमपूर्ण नक्कीच होऊ शकते ! 
आम्हाला दुपारी उपाशी मारणारा म्हातारा हा प्रत्यक्षात रावेरखेडी मध्ये राहणारा एका टेन्ट हाऊसचा मालक होता . टेन्ट हाऊस म्हणजे मांडववाला . त्याची ही पाचवी परिक्रमा सुरू होती . आणि त्याने रात्री आमची क्षमा मागितली आणि सांगितले की मैयाने प्रेरणा दिल्यामुळे त्याने आम्हाला उपाशी मारले . मी देखील त्याला मग नावाड्याचा चहा नाकारण्याचा प्रसंग सांगितला आणि त्यांनी योग्यच केल्याचे सांगितले .  रात्री उशिरा गृहस्थाची कर्तव्ये या विषयावर धरमसिंह पवार शी गप्पा मारून आता त्याचे प्रात्यक्षिक करावे ,अर्थात कुटुंबाला देखील पुरेसा वेळ द्यावा असे सांगत त्याला रजा दिली . सकाळी लवकर उठून आन्हिकं आटोपून किनाऱ्याने पुढे निघालो . छोटा बंगाली दगड धोंड्यामध्ये मार्ग काढून वैतागला होता त्यामुळे त्याने डांबरी रस्त्याने पुढे जाण्याचा निर्णय घेतला ! सुंठी वाचून खोकला गेला !  
इथून पुढे बकावा गावामध्ये  जाताना मध्ये खडक किंवा
बाकुंड नावाची एक नदी लागते . हिच्या पाण्याला गती खूप आहे .  पाणी अतिशय स्वच्छ आणि गोड आहे . धोकादायक खडकांवरून ही नदी सावकाश पार केली . इतक्यात पुढे रस्ता नसल्यामुळे बंगाली बाबू देखील इकडे येताना दिसला . त्याला देखील नदी पार करवली . इथे मिलन प्रधान या ओडिया परिक्रमावासीचे बूट फाटले . त्याची नवी नवी परिक्रमा असल्यामुळे त्याला अनवाणी चालता येणे अवघड होते . केवळ पायात बूट नाहीत म्हणून त्याने परिक्रमा अर्धवट सोडू नये म्हणून मी माझी चप्पल त्याला देऊन टाकली . लोफर्स प्रकारची ती चप्पल त्याला बसली . आणि मी पुढे अनवाणी प्रवास सुरू केला . बकावा गावाच्या अलीकडे पासून मोठ्या प्रमाणात दगड पात्रामध्ये दिसू लागले . हे दगड इतके होते की त्यांची संख्या कित्येक कोटी भरावी ! लहान मोठे विविध आकाराचे विविध प्रकारचे रंगीबेरंगी दगड होते . इथे अशा पद्धतीचे दगड गोळा करून ते शिवलिंग बनवणाऱ्या कारागिरांना आणून देणे हा एक व्यवसाय आहे . काठाकाठाने मी चाललो होतो . एका नावे मध्ये काही लोक चढत होते . इतक्यात त्या नावेतून नर्मदे हर असा जोरात पुकारा एकाने केला ! बघतो तर ते होते रमेश जाधव ! उत्तर तटावर मी असताना दमगड इथल्या रामकुटी मध्ये मला जे चौघे भेटले होते त्यातील बकावा गावचा हाच तो परिक्रमावासी ! त्यावेळी तो मला म्हणाला होता की तुमच्याकडे फोन नाही मग तुम्हाला संपर्क कसा करू ? तुम्हाला संपूर्ण बकावा गाव मला फिरवून दाखवायचे आहे . आणि मी त्याला म्हणालो होतो की मैयाची इच्छा असेल तर आपली भेट नक्की होईल . प्रत्यक्षामध्ये हा दोन दिवसासाठी शिवलिंगे गोळा करायला म्हणून दूरच्या घाटावर निघाला होता . परंतु मला पाहिल्यावर तो थांबला आणि नाव त्याने सोडून दिली . तो म्हणाला आजचा दिवस तुमच्यासाठी राखीव ठेवला आहे ! आज संपूर्ण बकावा गाव मी तुम्हाला दाखवतो ! आणि उद्या माझ्या प्रवासाला जातो .
ता . क . अमरकंटकच्या आधी रामकुटी येथे मला भेटलेले रमेश जी जाधव ! हा फोटो उशिरा मिळाला . फोटो त्यांच्या मोबाईलवर मीच काढला आहे .
 बकावा या गावाविषयी थोडेसे सांगतो .
नर्मदा खंडामध्ये एक म्हण प्रचलित आहे . नर्मदा मैया का हर कंकर शंकर होता है । कंकर म्हणजे दगड . नर्मदा नदीमध्ये सापडणारा प्रत्येक दगड हा साक्षात शंकराचा अवतार मानला जातो . त्यामुळे मंदिरामध्ये त्याची वेगळी प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही . फक्त आणून त्याला स्थानापन्न केले की झाले ! पूर्वी नर्मदा नदीमध्ये अगदी शिवलिंगाच्या आकाराचे दगड मिळायचे . परंतु लाखो लोकांनी ते दगड उचलल्यामुळे तसेच महापुरामध्ये ते दगड वाहून गेल्यामुळे तसेच विविध ठिकाणी झालेल्या धरणामुळे आता ते पूर्वी इतक्या संख्येने सापडत नाहीत . परंतु तरीदेखील कोट्यावधी शिवलिंगे आपल्या आजूबाजूला पडलेली आपल्याला दिसतात . बकावा या गावांमध्ये एक असा व्यवसाय निर्माण झालेला आहे की हे लोक विविध रंगी दगड गोळा करून आणतात आणि त्याला यंत्राच्या साह्याने किंवा छीन्नी हातोडीच्या सहाय्याने शिवलिंगाचा आकार देऊन ती शिवलिंगे विकतात . हा आकार देताना कुठल्याही फुटपट्टीचा किंवा मोजपट्टीचा वापर केला जात नाही . केवळ नजरेच्या अंदाजाने शिवलिंग बनवले जाते हे विशेष ! आणि या शिवलिंगामध्ये कुठेही समतोल ढळलेला नसतो हे त्याहून विशेष ! लांबी रुंदी उंची सर्व यथासांग असते ! हे किती मोठे आश्चर्य आहे विचार करून पहा ! मुळात गोल आकार बनवणे अवघड आहे त्यात पॅराबोला अर्थात लंबगोल बनवणे अजून अवघड आहे . तू अचूक बनवण्याचे काम इथले कारागीर करतात . संपूर्ण गावामध्ये कुठेही जा तुम्हाला धुळीचे साम्राज्य दिसते आणि दगडावर हातोडीचे घाव पडल्याचे आवाज आणि विविध विद्युत यंत्रांचे कर्णकर्कश्श आवाज सर्वत्र घुमत असतात . सुपारी पासून ते साठ फुटाच्या आकारापर्यंतची शिवलिंगे येथे बनवली जातात .  एका मुठीत अनेक मावतील अशी शिवलिंगे सुद्धा इथेच मिळतात . आणि जे हलवायला चार क्रेन ची मदत घ्यावी लागते अशी शिवलिंगे सुद्धा इथेच बनतात !
अशी शिवलिंगे विकणारी शब्दशः हजारो दुकाने या गावात आहेत
काही लोक रस्त्यावर शिवलिंगे विकतात तर मोठे दुकानदार मॉल प्रमाणे शिवलिंगे विकण्याची दुकाने थाटून बसलेले आहेत .
या शिवलिंगांमध्ये अनेक प्रकार असतात .एकाच दगडाची शिवलिंगे किंवा विविध रंग एकाच दगडामध्ये असणारी शिवलिंगे किंवा दोन स्पष्ट रंग असणारी अर्धनारी नटेश्वरासारखी शिवलिंगे किंवा ओम असा आकार उठलेली ओंकारेश्वर शिवलिंगे किंवा त्रिशूलाचा आकार उठलेली शिवलिंगे किंवा भस्म त्रिपुण्ड्र आकार असलेली शिवलिंगे किंवा ब्रह्मांड आकृती असलेली शिवलिंगे किंवा जनेऊ अथवा जानवेधारी शिवलिंगे किंवा आत्मलिंगे असे अनेक प्रकार आहेत . शिवलिंगावर कुठला आकार उठला आहे त्यानुसार त्याची किंमत बदलते . रमेश जाधव ने मला हळूहळू एकेका ठिकाणी न्यायला सुरुवात केली . त्याचा ह्या शास्त्राचा बालपणापासून अभ्यास होता . कुठल्या प्रकारचा दगड कुठे सापडतो याची त्याला चांगली कल्पना असते . आपल्याकडे आलेल्या ग्राहकाची गरज ते आधी समजावून घेतात आणि त्यानुसार ग्राहकाला सोबत घेऊन नावेतून दगड शोधण्याकरता जातात . एकदा त्यांना सापडलेला दगड ते एका बाजूला काढून ठेवतात आणि त्या दगडाला अन्य कोणीही हात लावत नाही . चुकून कोणी हात लावलास तर लगेच त्यांना आपला दगड कुठला होता हे लक्षात येते . अशा पद्धतीने एकाच वेळी सुमारे पाच ते दहा हजार दगडांचे आकार आणि प्रकार त्याच्या डोक्यामध्ये असतात . एक ट्रॅक्टरची ट्रॉली भरेल एवढे दगड गोळा झाले की ट्रॅक्टर मागविला जातो आणि ते सर्व दगड कारखान्याला विकले जातात . ट्रॉली चा दर अतिशय कमी असतो . परंतु ओम स्वस्तिक वगैरे आकार उठलेले शिवलिंग सापडले तर त्याची मात्र तोंडी बोली लावली जाते . फार क्वचित तयार शिवलिंग देखील सापडते त्याची किंमत सर्वात जास्त असते . कारण ते स्वतः नर्मदा मातेने तयार केलेले असते . रमेश जाधव ला मी आल्यामुळे प्रचंड आनंद झाला होता आणि मला काय दाखवू आणि काय नाही असे त्याला झाले होते ! गावामध्ये एक छोटेसे राधाकृष्ण मंदिर होते तिथे सामान ठेवायला त्याने मला सांगितले . या मंदिरामध्ये जालना जिल्ह्यातील परतुर येथे राहणाऱ्या गयाबाई नावाच्या संत आहेत त्यांच्यासारखा दिसणारा एक साधू होता . हा अतिशय हुशार आणि कलाकार मनुष्य होता . तिची चित्रकला विणकाम वगैरे सर्व अप्रतिम होते . सामान सुरक्षित आहे तू बिनधास्त सर्व गाव बघून ये असे त्यांनी मला आश्वासन दिले . भार हलका झाल्यामुळे बरे वाटले .सोबत नर्मदा मैयाची कुपी ठेवलेली पिशवी घेतली आणि निघालो . प्रत्येक घरामध्ये शिवलिंगे बनविण्याचे काम चालू होते . कोणीही नाकाला मास्क वगैरे लावलेला नव्हता . रमेश जाधव ने मला सांगितले की इथे होणारा प्रत्येक मृत्यू हा दमा रोगामुळेच होतो . इथे प्रत्येक लहान मोठ्या माणसाला दम्याचा त्रास आहे . आपल्या फुफुसाची रचना अशी असते की त्यामध्ये एकदा आत मध्ये गेलेली वस्तू पुन्हा मरेपर्यंत कधीच बाहेर येत नाही . त्यामुळे धुळीचे जड जड कण फुफ्फुसामध्ये जातात आणि फुफुसांची क्षमता कायमची कमी करून टाकतात . अजून एक धक्कादायक माहिती मला कळाली ती म्हणजे अशी की या गावाचे सरासरी आयुर्मान ५० ते ६० होते . याचा अर्थ साठीच्या पुढे शक्यतो कोणी जगत नसे . हे फारच भयानक व विदारक सत्य होते .शिवलिंगाच्या सर्व महत्त्वाच्या फॅक्टरी रमेशने मला दाखवल्या . हे गाव इतके मोठे होते आणि इतक्या फॅक्टरी होत्या की त्या सर्व मी जाऊन पाहणे केवळ अशक्य होते . नर्मदा मातेने त्या क्षेत्रातला तज्ञ मला गाठून दिला त्यामुळे माझे काम फारच सोपे झाले . इथे परिक्रमा वासीं कडून शक्यतो शिवलिंगाचे पैसे कोणी घेत नाही . आणि परिक्रमा वासी देखील इथून शिवलिंगे घेत नाहीत कारण ते सोबत बाळगायचे म्हणजे ओझे वाढविण्याचे काम असते . परंतु मला काही लोकांनी दिलेली शिवलिंगे मी आनंदाने स्वीकारली . अर्धनारी नटेश्वराचे एक सुंदर शिवलिंग मला मिळाले . 
अर्धनारी नटेश्वर असा असतो
आत्मज्योती किंवा आत्मलिंग असणारे शिवलिंग
असे बहुरंगी दगड नर्मदा मातेमध्ये सापडतात ते गोळा करून रमेश सारखी माणसे कारखान्यांमध्ये आणून देतात आणि तिथे शिवलिंगाला आकार दिला जातो .
रमेश जाधव याला सर्वच दुकानदार अतिशय मानत होते असे माझ्या लक्षात आले . एक तर तो संपूर्ण नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आला होता तसेच त्याला शिवलिंगे बनविण्यातले खूप चांगले ज्ञान होते असे सर्वांनी मला सांगितले . काही दुकानदारांनी तर सांगितले की रमेश जाधव जे सांगेल तेच अंतिम सत्य या गावात मानले जाते इतके या क्षेत्रातले ज्ञान त्याला होते . त्याला मैया कुठल्या प्रकारचा दगड कुठे आहे ते सांगायची . प्रसंगी खोल पाण्यामध्ये डुबक्या मारून हा दगड काढायचा . इथे केवट आणि कहार लोक दगड गोळा करण्याचे काम करतात . अलीकडे हे लोक देखील शिवलिंगे बनवू लागले आहेत . परंतु या गावांमध्ये या व्यवसायाची सुरुवात ज्यांनी केली ते दीपक नामदेव म्हणून आहेत त्यांच्याकडे देखील मला रमेश जाधव घेऊन गेला . यांच्याकडे फारच अप्रतिम शिवलिंगे होती . त्याने गावातील किमान २० ते २५ प्रतिष्ठित व्यापारी लोकांशी माझी गाठ घालून दिली . रमेश जाधव हा ढिगाने शिवलिंगे न आणता जे हवे ते चित्र असलेले शिवलिंग घेऊन येण्यासाठी प्रसिद्ध होता त्यामुळे त्याचा गावामध्ये अतिशय मान होता . त्यात रमेश जाधव घेऊन आला आहे म्हटल्यावर प्रत्येक दुकानांमध्ये माझे अतिशय प्रेमाने आणि आदराने स्वागत व्हायचे . तुमची संगत चांगली असेल तर त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर अशा पद्धतीने होतो . रमेश जाधव ने मला बघावा गावातील काही अशा ठिकाणी नेले जिथे शिवलिंग बनविण्याचे काम चालू असेल असे स्वप्नातही कोणाला वाटणार नाही . अतिशय भव्य दिव्य शिवलिंगे बनवणारी माणसे देखील इथे आहेत . प्रत्येक कारखान्याने आपली स्वतःची काही वैशिष्ट्ये जपलेली आहेत . संपूर्ण भारतभरातून शिवलिंगे खरेदी करण्याकरिता लोक इथे येतात . मला देखील आळंदी , देहू , पंढरपूर , मराठवाडा येथील अनेक मराठी माणसे भेटली जी शिवलिंगे खरेदी करण्याकरिता इथे आलेली होती . इथे शिवलिंगाची खरेदी तुम्हाला योग्य भावामध्ये करून देणारे शेकडो दलाल फिरत असतात .  हा सर्व परिसर अतिशय अद्भुत असाच आहे ! मी प्रत्येक दुकानांमध्ये गेल्यावर त्यांच्याकडे असलेली नैसर्गिक शिवलिंगे तसेच वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंगे दाखवायला सांगत असे . विशेषतः सौरमाला अंकिता असलेले शिवलिंग मला आवडले तसेच आत्मलिंग देखील खूप सुंदर दिसते . काही शिवलिंगामध्ये सोनेरी रंगाच्या छटा देखील आढळतात . आज-काल राजस्थान भागातील काही दगड नर्मदे काठील आहेत म्हणून खपविले जातात परंतु रमेश जाधव हा असा एकमेव तज्ञ होता जो पाहता क्षणी दगड नर्मदेतील आहे का बाहेरचा आहे हे डोळे मिटून सांगायचा . त्या दगडाला स्पर्श करून तो नर्मदेची स्पंदने येतात की नाही ते तपासायचा . कुठल्या दगडामध्ये किती स्पंदने आहेत हे देखील त्याला लगेच कळत होते . मला सापडलेली सर्वच शिवलिंगे त्याला खूप आवडली . आणि ही सर्व शिवलिंगे दुर्मिळ असून केवळ मैयाच्या कृपेनेच अशी सापडू शकतात हे देखील त्याने मला सांगितले . मला यातले काहीच ज्ञान नसल्यामुळे हो म्हणून मान हलवण्या शिवाय माझ्या पुढे कुठला पर्याय देखील नव्हता . 
बकावा गावातील शिवलिंगांची माहिती आदरपूर्वक प्रस्तुत लेखकाला देताना एक दुकानदार .यातील प्रत्येक शिवलिंग पाहिल्यावर तो दगड कुठला आहे हे रमेश जाधव मला सांगत होता इतका त्याचा अभ्यास होता . या गावातील प्रत्येक शिवलिंग त्याला पाठ होते .
हाताने हलविणे देखील अशक्य आहे अशी ही शिवलिंगे केवळ डोळ्याच्या मापाने कशी बनवत असतील विचार करून पहा ! हे दैवी कृपे शिवाय शक्य नाही . या गावातील लोकांना ही सिद्धी प्राप्त आहे . जयपुर लाल दगडापासून बनवलेल्या अन्य देवांच्या मूर्ती देखील इथे विक्रीला ठेवलेल्या होत्या .
दरम्यान माझे जुने बूट मला पुन्हा एकदा सापडले . मी ते सामानामध्ये कधी ठेवले मलाच आठवत नव्हते . अन्यथा या गावातून अनवाणी चालताना पायामध्ये दगड घुसून जखमा होण्याचे प्रमाण खूप जास्त होते . शिवलिंगाच्या मापामध्ये जलहरी बनवून देण्याचा देखील व्यवसाय इथे काही लोक करत . 
या शिवलिंगाची लांबी किती आहे पहा आणि याचे वजन किती असेल कल्पना करून पहा !
त्याच्याही पेक्षा मोठे शिवलिंग पाहताना प्रस्तुत लेखक . मागे अख्खी बैल जोडी आणि नांगर लपला आहे !  अशा शिवलिंगांची स्थापना करणारे लोक धान्य होत ! 
अशा पद्धतीने खूप सारी शिवलिंगे रमेश जाधव ने मला दाखवली . वाटेमध्ये आम्हाला दोन लहान मुले भेटली . त्यांच्या आग्रहा खातर त्याच्या घरी गेलो .  राम केवट असे या मुलाचे नाव होते . वय वर्ष ११ . दहा वर्षाचा एक भाऊ याला होता . याचे वडील दम्यामुळे निधन पावले होते . वयाच्या आठव्या वर्षापासून हा शिवलिंगे विकण्याचा व्यवसाय करू लागला होता . रमेश जाधव ने मला सांगितले की आपल्या मार्केटिंग कौशल्याच्या जोरावर हा आज बकावा गावातील सर्वात जास्त शिवलिंगे विकणारा मुलगा ठरलेला आहे ! याने आता स्वतःची निर्मिती बंद करून बकावा गावातील सर्वच शिवलिंगांचे मार्केटिंग सुरू केलेले आहे ! याने मोठ्या विश्वासाने त्याच्या घरी नेऊन मला त्याच्या आईची भेट घडवली . असा कुलोद्धारक पुत्र जन्माला घालणाऱ्या त्या मातेला मी नमस्कारच केला ! आपल्या घरातील नऊ दहा अकरा बारा वर्षाची मुले काय करतात ते जरा आठवून पहा . नर्मदे काठी राहणारी त्याच वयोगटातील ही दोन मुले आज लक्षावधी रुपयांची उलाढाल करत होती . त्यांच्या आईने मला सांगितले की या मुलांनी वडिलांपेक्षा कैक पटीने आपला व्यवसाय वाढविलेला आहे .  कारण यांचे वडील फक्त शिवलिंगे निर्माण करायचे . साधारण आठवड्याला एखादे चांगले शिवलिंग तयार व्हायचे . परंतु ही मुले मात्र दर दिवसाला कित्येक शिवलिंगे विकत असतात . त्यामुळे यांना व्यापाराची अधिक संधी मिळत असे . शिवाय लहान मुले पोट तिडकी ने माहिती सांगत आहेत हे पाहून लोक देखील डोळे झाकून खरेदी करत .  त्या मुलांनी मला देखील काही शिवलिंगे भेट दिली . यांच्या घरातून नर्मदा मातेचे आणि बघावा गावाचे खूप सुंदर दर्शन होत असे . मुलांनी घरातील फोनवर काही फोटो काढले ते आपल्या माहितीकरता सोबत जोडत आहे . 
राम शाम केवट बंधूं सोबत प्रस्तुत लेखक . अकाली पडलेल्या जबाबदारीमुळे ह्या मुलांचे बालपण थोडेसे हिरावले गेले असून ती पोक्त वाटत आहेत परंतु ती वयाने लहानच होती . मागे दिसणारे बकावा गाव .
गावातील सर्व घरे बैठी असताना यांनी मात्र स्वकमाईने आणि स्वकष्टाने घरावर माडी चढविली होती . त्यातून सुंदर असे नर्मदा मातेचे दर्शन होत असे . मागे आपल्याला जे बेट दिसते आहे त्याच्या समोरच बाजीराव पेशवा यांची समाधी आहे .
हे परम सुंदर दर्शन घेताना मन भरून आले ! गावावर पसरलेली धुळीची चादर दिसते आहे का पहा ! 
अकरा बारा वर्षाचा राम केवट . या मुलाला मनापासून दंडवत ! नर्मदेचे पाणीच निराळे आहे हेच खरे ! 
मानसशास्त्र किंवा बाल मानसशास्त्र हा ज्यांचा अभ्यासाचा विषय आहे अशा लोकांनी नर्मदा खंडातील मुलांचे मानसशास्त्र आणि त्याच्यावर नर्मदा परिक्रमेचा होणारा परिणाम या विषयावर अवश्य संशोधन करावे असे मी त्यांना सुचवेन . मला चहा पाजून पुन्हा बाहेर सोडायला ही मुले आली तेव्हा त्यांनी सांगितले की अशा पद्धतीने त्यांच्या घरामध्ये ते कुठल्याही परिक्रमा वासीला कधी बोलवत नाहीत . कारण घरामध्ये त्यांची तरुण माताजी एकटी असते . परंतु यांना माणसाची पारख देखील चांगली होती . इतक्या कमी वयामध्ये इतकी जाण पाहून मी खरोखरीच थक्क झालो ! भल्या भल्या लोकांना जे साध्य होत नाही ते शहाणपण त्यांना नर्मदा मातेने वडिलांच्या मृत्यू सोबत सहज बहाल करून टाकले होते . इथून पुढे रमेश जाधव मला अजून एका मित्राकडे घेऊन गेला . याच्याकडे छोट्या छोट्या आकाराची हजारो शिवलिंगे होती . हे घेऊ का ते घेऊ असे व्हावे इतकी सुंदर शिवलिंगे इथे सापडतात . परंतु वजनाची मर्यादा असल्यामुळे मोजकीच घेता येतात . याने मला अतिशय सुंदर असे शिवलिंग भेट दिले . त्याच्या बदल्यात मी त्याला बसल्या बसल्या त्याच्या संपूर्ण व्यवसायाची सुंदर अशी वेबसाईट बनवून दिली . त्याला अतिशय आनंद झाला आणि लगेच त्याने प्रचार प्रसार सुरू केला . या गावामध्ये एका तरुण साधूचा मृत्यू झाल्यामुळे त्याची समाधी गावकऱ्यांनी उभी केली होती . या समाधीवर जे शिवलिंग स्थापित करण्यात आले त्याच्यावर रात्री अचानक त्या साधूचा चेहरा उठला ! हा चमत्कार पाहण्यासाठी आठवडाभर बकावा गावामध्ये प्रचंड गर्दी झाली होती . या प्रकारापासून या गावातील शिवलिंगांचे महत्त्व फार वाढले असे मला रमेशने सांगितले . त्याने मला ते शिवलिंग नर्मदे काठी नेऊन दाखवले आणि खरोखरच माझ्या अंगावर काटा आला कारण त्या साधूचा सुस्पष्ट चेहरा त्या शिवलिंगावर फोटो छापल्याप्रमाणे उठलेला होता ! ज्याला इंग्रजीमध्ये सिलोव्हेट असे म्हणतात त्या प्रकारचे हे चित्र होते . शिवाजी महाराजांचा जाणता राजा असे लिहिलेला अर्धा चेहरा आठवून पहा त्याला सिलोवेट असे म्हणतात . 
रमेश जाधव ला मला भेटून फारच आनंद झाला होता हे तो दर दहा-बारा वाक्याने बोलून दाखवायचा ! त्याच्या घरी गेल्यावर त्याने बालभोग देऊन चहा पजला . गावात नर्मदा परिक्रमा वाशींची सेवा करणारी एक धर्मशाळा होती तिथे एका आपला राम केवट सेवा करायचा . त्याने मला मस्तपैकी भोजन वाढले ! एका वयोवृद्ध मातारामनी भोजन बनवले होते .
एखाद्या जुन्या हवेली सारखी असलेली सुंदर धर्मशाळा . येथे परिक्रमावस्यांची खूप आगत्याने सेवा केली जाते
त्याच्यासोबत असलेल्या सर्व परिक्रमावस्यांसोबत त्याच्या फोनवरून बोलणे झाले . माणिक पाटील यांची परिक्रमा दुर्दैवाने प्रकृती अस्वास्थ्यामुळे अर्धवट राहिली . बाकी जळगावचे परिक्रमावासी नामदेवराव भोळे असोदेकर आणि नगरचे गायक पं. पवन श्रीकांत नाईक या दोघांशी प्रेमाचे बोलणे झाले . मी रमेश जाधव यांना भेटल्याचा दोघांना आनंद झाला . दमगड च्या रामकुटी च्या प्रकरणात मी जो व्हिडिओ टाकला आहे (नर्मदा मातेच्या दर्शनाचा ) त्याच्यामध्ये या चौघांचे दर्शन आपल्याला होते पहा . 
बकावा गावातील शिवलिंगे कशी असतात याची थोडीशी झलक आपल्याला खाली देत आहे .



 बकावा चा किनारा
 नर्मदाजीका हर कंकर शंकर होता है !
रमेश जाधव ने मला या व्यवसायातील आर्थिक गणित देखील समजावून सांगितले परंतु ते मुद्दाम येथे देत नाही कारण या लोकांचा जीव घेणा धंदा बसावा असे मला वाटत नाही . हा व्यवसाय केल्यास लवकरच आपला मृत्यू होणार हे निश्चित आहे हे माहिती असून देखील केवळ देवाची सेवा करायला मिळते आहे म्हणून लोक हा व्यवसाय करत आहे ही किती मोठी गोष्ट आहे विचार करून पहा . अशा या ज्ञात अज्ञात , जीवित , दिवंगत सर्वच बकावा वासियांना साष्टांग नमस्कार ! नर्मदे हर !



लेखांक बाहत्तर समाप्त (क्रमशः )

मागील लेखांक

पुढील लेखांक


टिप्पण्या

  1. खूप वेगवेगळ्या रंगांची, प्राकृतिक रचनेची शिवलिंगे बघायला मिळाली ह्या लेखात, धन्यवाद. नर्मदे हर 🙏🏻

    उत्तर द्याहटवा
  2. थोरले बाजीराव पेशवे यांचे समाधीदर्शन व ऐतिहासिक मराठ्यांचा त्रोटक पण नेमके महत्त्व विशद करणारा आढावा तसेच प्रेरणादायी ओजस्वी वर्णन लेखकाने उत्कटपणे मांडले आहे. बकावा गांवाचे शब्दचित्र ही छानच. नर्मदे हर।

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर